एका विजय दहियाचा अपवाद वगळता नावात ‘विजय’ असलेल्या इतर सर्व जणांनी कसोट्यांमध्ये भारताकडून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. विजय हजारे, विजय मर्चंट, विजय मांजरेकर आणि अगदी आत्त्ताच्या मुरली विजयची सुरुवातही आश्वासक आहे.
१२ ऑक्टोबर १९११ रोजी विजय माधवजी मर्चंट (ठाकरसी) यांचा जन्म झाला मुंबईत. मुंबई संघाकडून प्रथम श्रेणी सामने, भारताकडून १० कसोटी सामने आणि हिंदूंच्या संघाकडून काही सामने ही त्यांची उल्लेखनीय क्रिकेट कारकीर्द.
दीडशे प्रथम श्रेणी सामन्यांमधून तब्बल ७१.६४ च्या सरासरीने ४५ शतके आणि ५२ अर्धशतकांसह त्यांनी १३,७४० धावा जमविल्या. नाबाद ३५९ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या. प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सरासरीचा विचार करता त्यांच्याहून सरस एकच फलंदाज ठरतो – डॉन ब्रॅडमन ९५.१४!
फलंदाजीच्या मुंबई प्रशालेचे ते संस्थापक मानले जातात. मुंबईची शैली समुचित तंत्र, पोलादी मनोबल आणि बॅटच्या मुक्त संचारापेक्षा पारंपरिक तंत्राला महत्त्व देते. सचिन तेंडुलकरच्या आगमनापर्यंत हे तंत्र टिकून राहिले. या प्रशालेचे आदर्श उदाहरण म्हणजे सुनील गावसकर.
आपले १० कसोटी सामने मर्चंट खेळले इंग्लंडविरुद्ध तेही १८ वर्षांच्या विराट अंतराळात. १९११ मध्ये जन्म – त्यांच्या ऐन उमेदीची वर्षे दुसर्या महायुद्धात कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने वाया गेली. एवढ्याशा कारकिर्दीतही त्यांनी लौकिक कमावला होता. चार्ल्स फ्राय त्यांच्याबद्दल म्हणाले होते “आपण त्यांना पांढरा रंग देऊ आणि ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर सलामीवीर म्हणून घेऊन जाऊ!” रंगभेदाच्या भीषणतेची आणि मर्चंटांच्या खेळाची या वाक्यावरून जाणवते.
विजय हजारे हे त्यांचे समकालीन. चौरंगी स्पर्धामध्ये त्यांची एकमेकांशी निरोगी स्पर्धा चाले. वेस्ट इंडीजचा जॉर्ज हेडली ‘काळा ब्रॅडमन’ म्हणून प्रसिद्ध आहे. सरासरी आणि सातत्य विचारात घेता खर्या अर्थाने ‘दुसरे’ ब्रॅडमन मात्र विजय मर्चंटच ठरतात. रणजी करंडकाच्या सामन्यांमधील त्यांची सरासरी ९८.७५ एवढी प्रचंड आहे.
अवघ्या दुसर्याच दिवशी संपलेली एक कसोटी १२ ऑक्टोबर २००२ रोजी शारजात सुरू झाली. वकार युनिसने नाणेफेक जिंकली. पाकचा पहिला डाव ५९ धावांवर आटोपला. दोन्ही सलामीवीर आणि आणखी दोघे शून्यावर बाद. १ जण १ वर, १ जण २ वर, १ जण ४ वर, १ जण ५ वर, १ जण ८ वर बाद, १ जण ४ वर नाबाद, १४ अवांतर, अब्दुल रझाक तब्बल २१ धावा! शेन वॉर्न : अत्यंत ‘लयबद्ध’ गोलंदाजी अकरा-चार, अकरा-चार.
कांगारूंनी ३१० धावा केल्या आणि पहिल्या डावापेक्षा ६ कमी धावा जमवून सगळे जण पुन्हा एकदा बाद झाले. शेन वॉर्न : ६.५-२-१३-४.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply