नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारणार्या पहिल्यावहिल्या कसोटी कर्णधाराचा जन्म या दिवशी १८५८ मध्ये लंडनच्या केन्सिंग्टनमध्ये झाला. पर्सी स्टॅनिस्लॉस मॅक्डॉनेल हे या कर्णधाराचे नाव. पर्सीने कप्तानी मात्र केली ती ऑस्ट्रेलियासाठी.
पर्सी हा एक आक्रमक सलामीवीर होता. १९ कसोट्यांमधून तीन शतकांसह त्याने साडेनऊशे धावा जमविल्या. त्याचा १४७ धावांचा डाव बहुउल्लेखित आहे. या डावादरम्यान सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर त्याने चार्ल्स बॅनरमनसोबत (हे ‘आद्य’ कसोटी फलंदाज होत) १९० धावांची सलामी दिली होती. उरलेल्या नऊ ब्रिटिशांना मिळून केवळ २९ धावाच जमविता आल्या होत्या.
क्रिकेट कर्णधार असण्याबरोबरच पर्सी मॅक्डॉनेल हे एक अभिजात ग्रीक विद्वान ‘होते’. त्यांच्यापूर्वीच्या प्रत्येक कसोटी कर्णधाराने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचाच निर्णय घेतला होता. पर्सींनी मात्र इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत नाणेफेक जिंकून गोलंदाजी पत्करली. अवघ्या ४५ धावांमध्ये इंग्लंडचा डाव संपुष्टात आला खरा पण अखेर हा सामना इंग्लंडने जिंकला. वयाच्या अवघ्या सदतिसाव्या वर्षी आजाराने त्यांचा बळी घेतला.
मैदान आणि एकेका खेळाडूचे ऋणानुबंध अत्यंत अनोखे असतात. अरविंद डिसिल्वा आणि कोलंबोचे सिंहलीज् स्पोर्ट्स क्लब मैदान हे स्मरणीय या गटातील तर आजवर ४९ कसोटी शतके काढणार्या सचिन तेंडुलकरला लॉर्ड्स मैदानावर शतक न काढता येणे हे दुसर्या गटातील उदाहरण म्हणून सांगता येईल.
शेन वॉर्न आणि गाबा मैदानाचा संबंधही असाच आहे. १९९४ मध्ये गाबावर (ब्रिस्बेनमधील एक मैदान) इंग्लंडविरुद्ध त्याने ११० धावांमध्ये ११ गडी बाद केले होते. एक वर्षानंतर या तारखेला कांगारूंनी पाकिस्तानचा एक डाव राखून वर १२६ धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर गाबावरील ३ सामन्यांमधून त्याने ३० बळी मिळविले होते, केवळ १०.४० च्या सरासरीने. ऑस्ट्रेलियाने प्रारंभापासून या सामन्यावर वरचष्मा राखला. स्टीव वॉच्या ११२ धावांच्या जोरावर कांगारूंनी ४६३
धावा केल्या. पाकिस्तानच्या डावात १६.१ षटकात अवघ्या २३ धावा देत ७ गडी शेन वॉर्नने बाद
केले. सलीम मलिक या डावात फलंदाजीस उतरूच शकला नाही. मालिकेतील ह्या पहिल्या सामन्यापूर्वीच त्याने ‘शेन वॉर्नने आपल्याला लाच देऊ केली होती’ असा आरोप केलेला होता. दुसर्या डावात तो चौथ्याच चेंडूवर वॉर्नची शिकार ठरला. फॉलोऑन मिळालेला पाकिस्तान दुसर्या डावात काहीसा सावरला पण हा सामना अखेर पाकने गमावला. सलीम इलाहीसाठी हा पदार्पणाचा सामना होता.
वॉर्नीची ‘गाबा’गिरी कारकिर्दीत पुढेही टिकून राहिली. समग्र कारकिर्दीत एकूण ११ सामन्यांमधून या मैदानावर त्याने ६८ गडी बाद केले, २०.४० च्या सरासरीने.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply