साबा करीम, हृषिकेश कानिटकर, हेमांग बदानी या भारतीयांबरोबरच अडम गिल्क्रिस्ट आणि हॅरल्ड लार्वूड यांची जन्मतारीख १४ नोव्हेंबर ही आहे.
१९०४ हे लार्वूड यांचे जन्मवर्ष. अतिशय अचूक वेगवान गोलंदाज असलेल्या लार्वूड यांची इतिहासात नोंद मात्र बॉडीलाईन थिअरीतील एक महत्त्वपूर्ण कडी अशी झालेली आहे.
लार्वूडचे आई-वडील त्या श्रमिक वर्गातील होते. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी शाळा सोडली, खाणीमध्ये काम करण्यासाठी. याच वेळी त्यांनी आपल्या गावच्या क्रिकेट संघासाठी खेळण्यास प्रारंभ केला होता. यानंतर चार वर्षांच्या आतच त्यांना नॉटिंगहॅमशायरकडून खेळण्याचे आमंत्रण मिळाले. या चार वर्षांच्या अवकाशातच अत्यत वेगवान अशी ख्याती त्यांनी मिळविली. त्या काळी वेगमापक साधने अचूक नसली तरी अनेक प्रत्यक्षदर्शींनी नोंदविलेल्या अनुभवांनुसार लार्वूड यांचा वेग १४५ किमी प्रतितास इतका होता. हा वेग आजच्या शोएब अख्तर आणि ब्रेट ली यांच्याशी तुलना करण्याजोगा आहे. अचूकतेच्या बाबतीत मात्र लार्वूड बेजोडच ठरतात.
द्वितीय महायुद्धापूर्वीचा इंग्लिश क्रिकेट संघ हा श्रमिकांनी बनलेला आणि एखाद्या हौशी कर्णधाराच्या नेतृत्वाखालील असे. १९३२-३३ च्या हंगामात कांगारूंचा संघ इंग्लंड दौर्यावर आला. डॉन ब्रॅडमन यांना रोखण्यासाठी आखूड टप्प्याचे चेंडू उपयुक्त ठरतील अशी अटकळ बेरकी ब्रिटिश कप्तान डग्लस जार्डिनने बांधली आणि त्याप्रमाणे लार्वूडसहित आपल्या द्रुतगती गोलंदाजांना ‘बॉडीलाईन’साठी राबविले. या मालिकेतील पाच सामन्यांमधून त्यांनी ३३ गडी बाद केले. या मालिकेनंतर टीकेचे जे मोहळ उठले त्याच्या बळींमध्ये लार्वूडचा समावेश होतो. इंग्लंड संघात पुन्हा कधीही त्यांची निवड झाली नाही.
‘इतरांनी तयार केलेल्या व्यूहतंत्रासाठी आपण माफी मागणार नाही’ ही लार्वूडची भूमिका राहिली. नंतर लार्वूड ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. ‘संध्यारक्षक’ म्हणून त्यांनी एकदा ९८ धावा केलेल्या होत्या.
१९७१ : अडम क्रेग गिल्क्रिस्ट ऊर्फ गिली ऊर्फ चर्च याचा जन्म. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट रक्षक-फलंदाज म्हणून सार्थपणे त्याच्या नावाचा
प्रस्ताव
मांडला जातो. एकदिवसीय सामन्यांमधील यष्टीरक्षकाचे सर्वाधिक बळी त्याच्या नावावर आहेत. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक कसोटी बळी मिळविणारा रक्षकही तोच. कसोटी कारकिर्दीत षटकारांचे शतक पूर्ण करणारा तो एकमेव फलंदाज आहे. १९९९, २००३ आणि २००७ मध्ये झालेल्या –अर्थात तीन सलग एकदिवसीय विश्वचषक स्पर्धांच्या अंतिम सामन्यांमध्ये अर्धशतके काढण्याचा अनोखा विक्रम गिल्क्रिस्टच्या नावावर आहे. २००९ च्या इंडियन प्रिमिअर लीग स्पर्धेत गिल्क्रिस्टच्या नेतृत्वाखालील डेक्कन चार्जर्स संघाने अजिंक्यपद मिळविले.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply