नवीन लेखन...

डिसेंबर १५ : बहुपेडी कार्ल हूपर

क्रिकेटसारख्या खेळात यशासाठी केवळ उपजत प्रतिभा असून भागत नाही. सातत्याने आपल्या खेळात सुधारणा करण्याची गरज फलंदाज आणि गोलंदाजांना भासते. आपल्या क्रीडाकौशल्याला सगळेच न्याय देऊ शकतात असे नाही. अंगी असलेल्या कौशल्याला कधीही उचित न्याय न देऊ शकलेल्या कार्ल लेवलिन हूपर या खेळाडुचा जन्म १५ डिसेंबर १९६६ रोजी झाला. १९८० च्या

दशकात वेस्ट इंडीज संघ अत्यंत गुणवान खेळाडूंनी भरलेला होता. गॉर्डन ग्रिनीज, डेस्मंड हेन्स, माल्कम मार्शल आणि कोर्टनी वॉल्श यासारखे दिग्गज आणि आपली क्षमता वारंवार सिद्ध केलेले खेळाडू या संघात होते. अशा संघात कार्ल हूपर प्रवेशता झाला आणि त्याने नाव कमावले.वयाचे एकविसावे वर्ष ज्या दिवशी पूर्ण झाले त्या दिवशी कार्ल आपल्या पदार्पणाच्या कसोटीचा शेवटचा दिवस खेळत होता. कारकिर्दीतील पहिला आणि अखेरचा सामना तो भारताविरुद्धच खेळला. २३३ धावांचा त्याचा कसोट्यांमधील सर्वोत्तम डाव भारताविरुद्धच आला.स्थानिक प्रथमश्रेणी स्पर्धांमध्ये हूपर गुयानाकडून खेळे. केंट आणि लँकेशायरकडून तो काऊंटी स्पर्धांमध्ये खेळला. इंग्लंडमधील सर्वच्या सर्व (१८) काऊंट्यांविरुद्ध शतके काढण्याचा पराक्रम कार्ल हूपरच्या नावे आहे. त्याला या विक्रमात दोन जोडीदार आहेत – मार्क रामप्रकाश आणि क्रिस अ‍ॅडम्स (हे दोघेही इंग्रज).आणखी एक गंभीर विक्रम हूपरच्या नावावर आहे. अत्यंत गंभीर ! एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि कसोट्या या दोहोंमध्ये (मिळून नाही !) प्रत्येकी १०० हून अधिक सामने; १०० हून अधिक बळी; १०० हून अधिक झेल आणि ५,००० हून अधिक धावा !! पण शेराला सव्वाशेर असतोच. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसने अशी कामगिरी केलेली आहे.हूपरच्या पदलालित्याचे (फूटवर्क) ऑस्ट्रेलियाई खेळाडूंना खास कौतुक वाटते. स्टीव वॉ आणि शेन वॉर्न यांनी आपापल्
ा क्रिकेटलिखाणातून त्याच्या फूटवर्कचे कौतुक केले आहे. शेन वॉर्नला ग्रेट वाटणार्‍या जगातील १०० क्रिकेटपटूंमध्ये हूपरचा समावेश आहे. समोरचा फलंदाज आक्रमण केव्हा करणार आहे याच अचूक अंदाज फिरकीपटूला असल्याशिवाय तो यशस्वी होऊ शकत नाही असे वॉर्न सांगतो. या बाबतीत हूपर मला वरचढ ठरे असे निरीक्षण वॉर्नने नोंदविले आहे. ‘१९९५ च्या मालिकेत मी हूपरमध्ये असे एखादे चिन्ह शोधण्याचा प्रयत्न केला, तो केव्हा आक्रमण करणार आहे याचा अंदाज येण्यासाठी. अनेकदा मी चेंडू टाकता-टाकता थांबून त्याच्या फूटवर्कमधील बदल शोधण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी बरेचसे फलंदाज क्रीजच्या पुढे येण्याचा प्रयत्न करतात, हूपर मात्र जागच्या जागीच उभा राही. अखेर अनेक निरीक्षणांनंतर मी त्याची एक कृती हेरली. जेव्हा त्याला चेंडू उचलून मारायचा असे तेव्हा तो नेहमीप्रमाणे खाली बघून बॅट जमिनीवर न थपथपवता माझ्याकडे पाही ! ऑफ कोर्स, तो काय करणार आहे हे मला कळूनही प्रत्येक वेळी मी त्याला ते करण्यापासून रोखू शकलो नाही.’कार्ल हूपरची कसोटी कारकीर्द : १०२ सामने, ५०६२ धावा, १३ शतके, २७ अर्धशतके, २३३ सर्वोच्च, ११४ बळी, ११५ झेल.एकदिवसीय कारकीर्द : २२७ सामने, ५७६१ धावा, ७ शतके, नाबाद ११३ सर्वोच्च, १९३ बळी, १२० झेल.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..