१९८९ : आपल्या सातत्यपूर्ण कारकिर्दीने क्रिकेटच्या इतिहासालाच एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवणार्या सचिन तेंडुलकरच्या कसोटी कारकिर्दीचा आरंभ या दिवशी झाला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील १५ नोव्हेंबर १९८९ रोजी कराचीतील नॅशनल स्टेडिअमवर सुरू झालेला भारत वि. पाकिस्तान हा सामना आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या यादीतील सामना क्र. ११२७ होता. भारताकडून सचिन तेंडुलकर आणि सलील अंकोला यांनी तर पाकिस्तानकडून शाहिद सईद आणि वकार युनिस यांनी या सामन्याद्वारे कसोटी पदार्पण साजरे केले.
सचिन तेंडुलकरने पहिल्या डावात १५ धावा काढल्या. पदार्पणवीर वकार युनिसने त्याला त्रिफळाबाद केले. पहिल्याच कसोटीतील पहिल्याच डावात ४ गडी बाद करण्याची कामगिरी युनिसने केली. पाकिस्तानच्या ४०९ धावांना उत्तर देताना भारताने पहिल्या डावात २६२ धावा केल्या. पाकिस्तानने आपला दुसरा डाव ५ बाद ३०५ धावांवर घोषित केला आणि भारतासमोर विजयासाठी ४५३ धावांचे आव्हान ठेवले. ३ बाद ३०३ अशी मजल मारीत भारतीयांनी हा सामना अनिर्णित राखला. नवज्योतसिंग सिद्धूने ८५ तर संजय मांजरेकरने नाबाद ११३ धावा काढल्या. पहिल्या डावात ४ बळी, दुसर्या डावात ३ बळी आणि फलंदाजीत पहिल्या डावात आठव्या क्रमांकावर येऊन ५५ धावा काढणारा कपिलदेव निखंज कसोटीवीर ठरला.
भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधांमधील इतिहासाकडे पाहून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या मालिकेसाठी तटस्थ पंच नेमण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या पहिल्या डावात कुणीही ‘पायचित’ झाले नाही. भारताच्या पहिल्या डावात तिघेजण तर दुसर्या डावात बाद झालेल्या तिघांपैकी एकजण पायचित झाला होता. पाकिस्तानच्या दुसर्या डावात बाद झालेल्या पाचांपैकी एकच जण पायचित होता. जॉन हॅम्पशायर आणि जॉन होल्डर (दोघेही जेएच) यांच्या तटस्थतेची कल्पना येण्यास ही आकडेवारी पुरेशी आहे. सामने अनिर्णित राहण्याची परंपरा या मालिकेत पुढेही चालू राहिली.
सचिन तेंडुलकरच्या पदार्पणावर बरोब्बर तीन वर्षांनी (१९९२) रमाकांत आचरेकर सरांच्या आणखी एका चेल्याने
कसोटी
पदार्पण साजरे केले आणि अगदी दणक्यात शतक ठोकून. १५ नोव्हेंबर १९९२ रोजी डर्बनमधील किंग्जमीडवर प्रवीण आमरेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६४ धावा काढल्या. आदल्या दिवशीचा खेळ संपताना तो ३९ धावांवर नाबाद होता.
पदार्पणात शतक काढून आमरे प्रकाशात आला तर दक्षिण आफ्रिकेच्या एका पदार्पणवीराने याआधी निराळाच इतिहास रचला होता. मार्च १९७० नंतर प्रथमच प्रोटियांचा संघ घरच्या मैदानावर कसोटी सामना खेळत असल्याने एकूणात ही कसोटीच ऐतिहासिक होती. जिमी कुकचा हा पहिलाच कसोटी सामना होता आणि पहिल्याच डावात पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला !! झेल सचिन तेंडुलकर गोलंदाज कपिल देव. वयाच्या एकोणचाळिसाव्या वर्षी जिमी पदार्पण करता झाला होता. आंतरराष्ट्रीय कसोट्यांच्या अधिकृत यादीतील हा १२०० वा कसोटी सामना होता आणि आजवर कोणताही पदार्पणवीर पहिल्याच चेंडूवर बाद झालेला नव्हता. ज्या वर्णद्वेषी धोरणामुळे दक्षिण आफ्रिकेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वाने वाळीत टाकले होते, त्या पार्श्वभूमीवर ओमार हेन्रीचे पदार्पणही क्रांतिकारी ठरले. वयाची पावणेएक्केचाळीस वर्षे ओलांडलेला हेन्री हा दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण करणारा पहिला कृष्णवर्णीय आणि सर्वाधिक ‘वयस्कर’ खेळाडू ठरला.
क्रिकेटमधील आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनुप्रयोगासाठीही (अप्लिकेशन) हा सामना लक्षात राहतो. दूरचित्रवाणी संचावर पुनर्दृष्य पाहून (रिप्ले) बाद दिला गेलेला सचिन तेंडुलकर हा पहिला फलंदाज ठरला.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply