१९८८ : भारत आणि न्यूझीलंडदरम्यानच्या मालिकेतील बंगलोरच्या चिन्नास्वामी मैदानावरील पहिल्या कसोटीचा हा अखेरचा दिवस होता. न्यूझीलंडसाठी या सामन्याचा प्रारंभ विक्रमी ठरला. वैयक्तिक तिसर्या षटकातील पहिल्या चेंडूवर अरुण लालला झेलबाद करवीत रिचर्ड हॅडलीने इअन बोथमचा ३७३ कसोटी बळींचा विक्रम मागे टाकला. अकरा महिन्यांपूर्वी त्याने ३७३वा बळी घेऊन या विक्रमाशी बरोबरी केलेली होती. १२ नोव्हेंबरला सुरू झालेल्या या सामन्यात १५ नोव्हेंबर हा विश्रांतीचा दिवस होता. या दिवशी पाहुण्या न्यूझीलंड संघातील सर्वांना एका रहस्यमय विषाणूने त्रास दिला. पोटदुखीने सर्व पाहुण्यांना भंडावून सोडले.
१६ नोव्हेंबरला भारताने न्यूझीलंडचा पहिला डाव १८९ धावांवर संपविला. आपला दुसरा डाव १ बाद १४१ धावांवर घोषित करीत किवींपुढे विजयासाठी ३३७ धावांचे आव्हान ठेवले. भारताच्या डावादरम्यान किवींसाठी विषाणूचा प्रताप सुरूच राहिला. जेरेमी कोनी या सामन्यासाठी दूरचित्रवाणी समालोचक म्हणून आलेला होता. त्याला आणि आणखी एका किवी पत्रकाराला क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरावे लागले होते !
भारताने अखेर हा सामना १७२ धावांनी जिंकला. भारतीयांसाठी ह्या मालिकेची सुरुवात वादग्रस्त ठरली होती. मोहिंदर अमरनाथला कोणतेही पटण्यासारखे कारण नसताना संघातून वगळण्यात आले होते. सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत अमरनाथने निवडकर्त्यांना ‘विदूषकांचा एक जथा’ असे म्हटले होते. त्याच्या जागी संघात आलेल्या नवज्योतसिंग सिद्धूने पहिल्या डावात ११६ आणि दुसर्या डावात नाबाद ४३ धावा करीत आपली निवड सार्थ ठरविली.
१७ नोव्हेंबर १९०५ रोजी जन्मलेल्या आर्थर चिपरफील्डच्या नावावर पदार्पणाच्या कसोटीत ९९ धावांवर ‘बाद’ होण्याचा अनोखा विक्रम आहे. ट्रेंट ब्रिजवर इंग्लंडविरुद्ध १९३४ मध्ये त्याने आपले पदार्पण साजरे केले. सातव्या क्रमांकावर आलेला आर्थर दुसर्या दिवशी उपाहारापूर्वी ९९ धावांवर खेळत होता. त्याने काय खाल्ले ते विज्डेनने नोंदविलेले नाही पण उपाहारानंतरच्या खेळात त्याच धावसंख्येवर तो यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला. या घटनेनंतर
सुमारे ७५ वर्षांचा काळ गेलेला आहे. आर्थर चिपरफील्डनंतर अशी कामगिरी केवळ दोघांना साधलेली आहे. वेस्ट इंडीजचा रॉबर्ट क्रिस्टियानी (१९४७-४८) आणि पाकिस्तानचा असिम कमाल (२००३-०४).
पुढच्याच हंगामात डर्बनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आर्थरने शतकी मजल गाठली.
कसोटी क्रिकेटच्या जन्मानंतर १३० वर्षांनी, १७ नोव्हेंबर २००७ रोजी अखेर वैयक्तिक षटकारांचे शतक पूर्ण करणारा खेळाडू विक्रमपुस्तिकांमध्ये दाखल झाला. ऑस्ट्रेलियाच्या अडम गिल्क्रिस्टने आपल्या कारकिर्दीतील शंभरावा (आणि अखेरचा) षटकार या दिवशी मारला. गिल्क्रिस्टचा हा ब्याण्णवावा कसोटी सामना होता. होबार्टमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातील या डावात दोन षटकारांसह नाबाद ६७ धावा गिलीने काढल्या.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply