१ ऑक्टोबर १९३७ रोजी जन्म झालेला सईद अहमद त्याची कसोटी सरासरी ४०.४१ एवढी असूनही नको त्या कारणांसाठी प्रसिद्ध झाला आहे आणि चर्चेत राहिला आहे.
वयाच्या एकविसाव्या वर्षी ब्रिजटाऊनमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध सईदने कसोटीपदार्पण केले. दुसर्याच डावात त्याने ६५ धावा काढल्या. पाकिस्तानच्या त्या डावात हनिफ मोहम्मदने ३३७ धावा काढल्या होत्या. पदार्पणाचीच ही मालिका सईदने ५०८ धावा काढून गाजविली. तीन कसोट्यांमध्ये त्याने पाकिस्तानचे नेतृत्वही केले.
एकूण ४१ कसोट्यांमधून ४०.४१ च्या पारंपरिक सरासरीने त्याने ९-कमी-३,००० धावा जमविल्या पाच शतकांसह. या पाच शतकांमध्ये ३ दीडशतके होती.
१९७२-७३ च्या ऑस्ट्रेलिया दौर्याने त्याची कसोटी कारकीर्द अकाली संपुष्टात आली. मेलबर्नमध्ये झालेल्या दुसर्या कसोटीत पाकिस्तान पराभूत झाले होते. २-० ने मालिका कांगारूंनी खिशात घातली होती. या सामन्यात सईदने ५० आणि ६ धावा काढल्या होत्या. दुसर्या डावात त्याला बाद करणार्या डेनिस लिलीबरोबर त्याची जोरदार ‘झाली’ होती. तिसर्या कसोटीत सूड उगविण्याची भाषा लिलीने केली होती.
पाठदुखीमुळे आपण तिसर्या कसोटीसाठी उपलब्ध नसल्याचे स्वतः सईदनेच जाहीर केले ! रीतीनुसार अशी घोषणा कर्णधार किंवा व्यवस्थापकाने करणे उचित झाले असते. सईदवर शिस्तभंगाची कारवाई झाली. त्याला मायदेशी पाठविण्यात आले. पुन्हा कधीही पाकिस्तानसठी त्याची निवड झाली नाही.
शेकडो एदिसा कालपरवा खेळले जात असले तरी सामना बरोबरीत सुटणे हा प्रसंग तसा दुर्मिळच आहे. १ ऑक्टोबर १९९७ रोजी बुलावायोत बरोबरीत सुटलेला सामना हा एदिसातिहासातील केवळ १३ वा बरोबरीत सुटलेला सामना होता. क्वीन्स स्पोर्ट्स क्लब – न्यूझीलंड = झिम्बाब्वे.
यजमान कर्णधार अलिस्टर कॅम्पबेलने नाणेकौल बरोबर ओळखून फलंदाजी स्वीकारली. निर्धारित निमशेकड्या षटकांमध्ये झिम्मींनी ८ बाद २३३ धावा जमविल्या.
शेवटच्या चेंडूवर दोन धावा काढल्या असत्या तर किवी जिंकले असते. त्यांचे दोन गडी शिल्लक होते. जॉन रेनीचा चेंडू क्रिस हॅरिसने सरळ गोलंदाजाच्या मागे मारला. प्रेक्षकांपैकी काही जण धावत मैदानात आले. एक धाव किवींनी पूर्ण केली पण दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी बिनटोल्या टोकाकडे धावणारा गेविन लार्सन धावबाद झाला. किवींच्या डावातील हा चौथा धावबाद होता. शेवटच्या दोन षटकांमध्ये ३० धावा देऊनही झिंबाब्वेचा संघ हा सामना ‘हरू’ शकला नाही.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply