२० नोव्हेंबर १९७१ रोजी न्यूझीलंडमधील ऑक्लंड शहरी डिऑन जोसेफ नॅशचा जन्म झाला. १९९२ ते २००१ अशा दहा वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत ३२ कसोट्यांमधून त्याने ९३ बळी मिळविले. नॅशने आपल्या पदार्पणाच्या काळात ज्या अपेक्षा निर्माण केलेल्या होत्या त्या मात्र कधीही पूर्ण झाल्या नाहीत. वेगवान गोलंदाजांना पाठीचा त्रास नेहमीच सतावतो, नॅश याला अपवाद नव्हता. त्याने खेळलेल्या कसोट्यांहून कित्येक अधिक कसोट्या त्याला पाठीच्या दुखण्यामुळे खेळता आल्या नाहीत. न्यूझीलंडकडून सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या गोलंदाजांपैकी एक ठरण्याची पात्रता त्याच्यात नक्कीच होती पण पाठ आडवी आली असेच म्हणावे लागेल. इतरांच्या कारकिर्दीकडे यश पाठ फिरवते, इथे मात्र पाठ त्याच्याकडे तोंड करून भिंतीसारखा अडथळा बनली. १९९२-९३ च्या हंगामात नॅशने कसोटीपदार्पण केले. आपल्या कारकिर्दीतील पाचवी कसोटी त्याने गाजविली. क्रिकेटची मक्का / पंढरी समजल्या जाणार्या लॉर्ड्स मैदानावर न्यूझीलंडच्या पहिल्या डावात नवव्या क्रमांकावर येऊन त्याने ५६ धावा काढल्या. इंग्लंडच्या पहिल्या डावात त्याने ७६ धावांमध्ये सहा तर दुसर्या डावात ९३ धावांमध्ये पाच गडी त्याने बाद केले. अर्धशतक आणि किमान दहा बळी अशी कामगिरी क्रिकेटच्या पवित्र तीर्थक्षेत्रात करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. १९९८-९९ च्या हंगामात नियमित कर्णधार स्टीफन फ्लेमिंग जखमी असताना नॅशने न्यूझीलंडचे नेतृत्वही केले. फलंदाजीत तो कच्चा नव्हताच. कसोट्यांमध्ये त्याची सरासरी २३.५२ इतकी प्रचंड आहे- तो नवव्या क्रमांकावर खेळायला येत असे हे पाहता. २००१-०२ च्या हंगामातच त्याने निवृत्तीची घोषणा केली. काही काळ त्याने राष्ट्रीय निवडकर्ता म्हणूनही काम केलेले आहे.
आजपासून दोन वर्षांपूर्वी, २० नोव्हेंबर २००९ रोजी सचिन रमेश तेंडुलकर तीस हजार आंतरराष्ट्रीय धावांचा भोज्या गाठणारा आणि ओलांडणारा भूतलावर घडलेल्या ज्ञात इतिहासातील पहिला मानव ठरला. भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या मालिकेतील पहिल्या कसोटीतील हा अखेरचा दिवस होता. मैदान होते, अहमदबादमध्ये मोटेरा या
स्थानिक
नावाने ओळखल्या जाणार्या भागात साबरमतीकाठी वसलेले सरदार पटेल स्टेडिअम (आताचे सरदार पटेल गुजरात स्टेडिअम). पहिल्या डावात भारताने ४२६ धावा केलेल्या असल्या तरी त्यात सचिनचा वाटा केवळ चार धावांचा होता. श्रीलंकेने २०० षटकांहून अधिक फलंदाजी करीत ७ बाद ७६० धावांचा डोंगर उभारून डाव घोषित केला होता. ३३४ धावांच्या पिछाडीने दुसर्या डावात मैदानात उतरलेल्या भारताला ८१ धावांची सलामी लाभली. ५१ धावा काढून सेहवाग बाद झाला. दुसरा सलामीवीर गंभीरने ११४ धावा केल्या. तोवर खेळलेल्या एदिसांमधून सचिनने एकूण १७,१७८ धावा जमविलेल्या होत्या. एकमेव विसविशीत सामन्यातून त्याने १० धावा केलेल्या होत्या. मोटेरामध्ये दुसर्या डावात फलंदाजीला येण्यापूर्वी त्याच्या कारकिर्दीतील आंतरराष्ट्रीय धावांची संख्या ३५-कमी-३०,००० होती. ३०,००० धावांचा टप्पा त्याने गाठलाच पण या डावात शंभरी गाठून त्याने या टप्प्याला ६५ धावांचे मोरपीसही लावले. पाचव्या दिवसाखेर सचिन शंभर धावांवर तर लक्ष्मण ५१ धावांवर नाबाद राहिला. कसोट्यांमध्ये सचिनचे हे त्रेचाळिसावे शतक होते. एदिसा आणि कसोट्यांचा एकत्रित विचार करता सचिनचे हे अठ्ठ्याऐंशिवे ‘इन्टरनॅशनल हंड्रेड’ होते.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply