१९८३ : मॅकोच्या आयुष्यातील संस्मरणीय दिवस. कानपूरमध्ये भारताविरुद्ध माल्कम मार्शलने ९२ धावा काढून सर्वोच्च कामगिरी तर नोंदविलीच पण पहिल्याच हप्त्यात गोलंदाजी केली ८-५-९-४. सुनील गावसकर दुसर्याच चेंडूवर बदक. वेस्ट इंडीजच्या ४५४ धावांच्या प्रत्युत्तरात दुसर्या दिवसाखेर भारताने ५ बाद ३४ धावा केल्या. चौथ्या दिवशी विंडिजने हा सामना डावाने जिंकला. हा काहीसा सूडाचा प्रकार होता कारण चारच महिन्यांपूर्वी भारताने विंडीजचा विश्वविजेतेपदाचा त्रिक्रम हुकविला होता. १९८३ ते १९८६ यादरम्यान खेळल्या गेलेल्या सलग सात कसोटी मालिकांमध्ये वीसहून अधिक बळी मिळविण्याची कामगिरी मॅकोने केली आहे. ८१ कसोटी सामन्यांमधून त्याने ३७६ बळी मिळविले. विंडीजतर्फे फक्त कोर्टनी वॉल्श आणि कर्टली अम्ब्रोजच त्याच्याहून अधिक बळी मिळवू शकले आहेत. प्रथमश्रेणीमध्ये सहा शतकांसह अकरा हजारांवर धावा काढताना केवळ १९ च्या सरासरीने त्याने १,६५१ बळीही घेतले. नंतर तो विंडीजचा प्रशिक्षकही बनला. नोव्हेंबर १९९९ मध्ये अकस्मात त्याचे कर्करोगाने निधन झाले.
१९६७ : इअन ब्रेशॉ (ब्रॅडशॉ नाही) या पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने ‘दस्कटाचा’ मान मिळविला- व्हिक्टोरियाचे दहाच्या दहा गडी बाद केले. (फ्लॅशबॅकमध्ये दाहीच्या दाही असा फोकस काहीसा वारंवार येत असला तरी तो अत्यंत दुर्मिळ ‘इव्हेन्ट’ असल्यामुळेच आहे.) शेफिल्ड शील्ड स्पर्धेच्या इतिहासातील हा केवळ तिसराच प्रसंग होता. पर्थमध्ये हा पराक्रम करताना ब्रेशॉने ४४ धावा मोजल्या. १७.६ ‘अष्टके’ एवढी गोलंदाजी त्याला करावी लागली. त्याने बाद केलेल्या खेळाडूंमध्ये बिल लॉरी, बॉब काऊपर आणि कीथ स्टॅकपोल असे दिग्गज होते.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply