१९५५ : बीफी या लाडनावाने प्रसिद्ध झालेल्या सर इअन टेरेन्स बोथमचा जन्म. बोथमने आपल्य अष्टपैलू आणि नवरंगी कारकिर्दीत अनेक कसोटी विक्रम स्वतःच्या नावावर करून घेतले. इंग्लंडतर्फे सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा त्याचा विक्रम आजही अस्पर्शित (३८३) आहे.
१९७४ मध्ये बोथमने सॉमरसेट संघात खेळून प्रथमश्रेणीत पदार्पण केले. हॅम्पशायरविरुद्ध खेळताना त्याची गाठ वेस्ट इंडीजच्या अँडी रॉबर्ट्स या गोलंदाजाशी पडली. सॉमरसेट संघाला जिंकण्यासाठी ३२ धावांची गरज असताना रॉबर्ट्सचा एक बाऊन्सर बोथमच्या तोंडाला लागला. या प्रसंगाबाबत बोथमने लिहिले आहे :
“आम्हाला ३२ धावांची गरज होती. शेवटचा चेंडू विसरून जाण्याचे मी स्वतःला बजावले (त्यावर बोथमने षटकार ठोकलेला होता) आणि चेंडूचा सामना त्याच्या दर्जानुसार करण्याचे ठरविले. बॅट हलकेच आपटून मी क्रीजवर पवित्रा घेतला आणि रॉबर्ट्सकडे पाहू लागलो. चेंडू त्याच्या हातातून सुटताना मी पाहिला, चकाकणारी बाजू मला दिसली, शिवणीचे (सीम) पांढरे टाके उर्ध्वलंबापासून (वर्टिकल) काही अंशावर होते. मग तो माझ्या चेहर्यापासून फूटभर अंतरावर येईपर्यंत काही मला दिसला नाही.
सेकंदाच्या त्या काही दशांशांमध्ये माझ्या मेंदूच्या काही भागाने ताडले की हा आणखी एक आखूड टप्प्याचा चेंडू आहे , मग मी हूकच्या प्रयत्नात बॅकफूटवर गेलो पण मोठा फरक हा होता : तोपर्यंत मी सामना केलेला हा सर्वात वेगवान चेंडू होता. हूक मारता-मारताच मला जाणवले की आता उशीर झालेला आहे. हे सत्य पचायच्या आतच संरक्षक हेल्मेटे नसणार्या त्या काळात चेंडू माझ्या तोंडावर येऊन थडकला. स्वसंरक्षणासाठी बुद्ध्याच मी उजवा हात झटकलेला होता आणि इम्पॅक्ट काहीसा शोषलेला होता तरीही चेंडू थांबला नाही. बॅट टाकून शिव्याशाप देत आणि रक्त थुंकत मी बाजूला झालो तेव्हा मला जाणवले की मी रक्तच नाही तर दातही थुंकतो आहे. दोन दात उखळून निघाले होते आणि दोन हिरड्यांच्या
रेषेपासून तुटून निघाले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे दोन-दोन दात माझ्या तोंडाच्या दोन विरुद्ध बाजूंचे होते आणि त्यांच्यामधील दात आता खिळखिळे झालेले होते.”
हे वर्णन खरेतर मुळातूनच संपूर्णपणे वाचण्यासारखे आहे. बाराव्या गड्याने आणलेले पाणी पिल्यानंतर (की प्यायल्यानंतर?) आपल्याला एक प्रकारचा अलिप्तपणा (डिटॅचमन्ट) जाणवला आणि आपण पुढे खेळण्याचा निर्णय घेतला असे बोथम लिहितो. शेवटच्या दोन जोड्यांनी जोडलेल्या ७० पैकी ४५ धावा बोथमने केल्या आणि संघाला हा सामना जिंकून दिला.
विव रिचर्ड्स आणि जोएल गार्नरला वगळल्याच्या निषेधार्थ १९८६ मध्ये इअनने सॉमरसेटला नारळ दिला आणि वुर्सेस्टरशायरकडून तो खेळू लागला.
१९७७ च्या उत्तरार्धात बोथम कसोटीपटू झाला. बोथमच्या नावावरचे काही खरोखरच ‘अद्वितीय’ विक्रम असे आहेत :
कसोट्यांमध्ये १,००० धावा आणि १०० बळी; २,००० धावा आणि २०० बळी; ३,००० धावा आणि ३०० बळी सर्वात कमी कसोट्यांमधून जमविण्या-घेण्याचा विक्रम.
एकाच कसोटी सामन्यात फलंदाजीत शतक आणि गोलंदाजीत एकाच डावात पाच बळी अशी कामगिरी बोथमने पाच वेळा केलेली आहे. इतर कुणालाही दोनाहून अधिकदा ही कामगिरी साधलेली नाही.
१९८० मध्ये भारताविरुद्ध खेळताना बोथमने एकाच सामन्यात शतक काढण्याचा आणि १० बळी घेण्याचा बोथमपराक्रम केला. त्यापूर्वी अलन डेविडसनने कसोटीच्या दोन्ही डावांत मिळून १०० धावा जमविण्याचा आणि १० बळी घेण्याचा पराक्रम केलेला होता.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply