शहारविणारे शतक १९८२ : सर्वात कमी चेंडूंमध्ये झळकाविले गेलेले प्रथमश्रेणीतील निर्विवाद (आणि सर्वमान्य) शतक. व्हिक्टोरियाविरुद्ध अडलेडमध्ये डेविड हूक्सने अवघ्या ३४ चेंडूंमध्ये शतक काढले. विजयासाठी दक्षिण ऑस्ट्रेलियाला ३० षटकांमध्ये २७० धावांची गरज होती आणि पहिल्या १० षटकांमध्ये डेविडच्या जोराच्या जोरावर १२८ धावा निघाल्या होत्या. वैयक्तिक १०७ धावांवर (५५ मिनिटे) हूक्स बाद झाला आणि त्याच्या संघाच्या विजयाच्या आशाही मावळल्या. प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकदिवसीय सामन्यांचा समावेश होत नाही. प्रथमश्रेणी सामना हा कमीत कमी तीन दिवसांच्या नियोजित खेळाचा असतो. त्यामुळेच हूक्सच्या या वेगवान खेळीचे महत्त्व आहे. शतकाचा वेग ठरविण्यासाठी चेंडू आणि खेळपट्टीवर घालविलेला वेळ अशी दोन मानके वापरली जातात. प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये फलंदाजाने सामना केलेल्या चेंडूंची नोंद ठेवली जातेच असे नाही, मिनिटे बाजूलाच राहिली. यामुळेच ‘निर्विवाद’ हे विशेषण हूक्सच्या शतकाला लावलेले आहे. (सचिन तेंडुलकरच्या कसोटी कारकिर्दीच्या प्रारंभातील एका कसोटीत त्याने सामना केलेल्या चेंडूंची संख्या माहिती नाही आणि चौकार-षटकारही, त्याबद्दल लवकरच आणि डॉन ब्रॅडमनच्या ४ धावा मोजलेल्या नाहीत हे दाखवून त्यांची सरासरी १०० करविण्याचा प्रयत्नही एकदा झालेला आहे त्यावद्दल पुन्हा कधीतरी.) ऑस्ट्रेलियाकडून हूक्स २३ कसोटी सामने खेळला.
झहीद-जावेद
१९९१ : आकोब जावेदच्या तोफगोळ्यांच्या जोरावर पाकिस्तानने भारताचा पराभव करीत शारजातील विल्स विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकला. आकिबने ३७ धावांमध्ये ७ बळी घेतले. मुथय्या मुरलीदरनने ऑक्टोबर २००० मध्ये ३० धावांमध्ये ७ बळी घेईपर्यंत (पुहा भारताविरुद्ध) ही सर्वोत्तम एकदिवसीय गोलंदाजी होती. तिसर्या षटकात रवी शास्त्री, मोहम्मद अझरुद्दीन आणि (विश्वास बसणार नाही पण) सचिन तेंडुलकर यांना सलग चेंडूंवर बाद करीत आकिबने त्रिक्रम साधला होता. झहीद फजलच्या ९८ धावांच्या जोरावर पाकने ६ बाद २६२ धावा केल्या होत्या. झहीदला पायातील पेटक्यांमुळे निवृत्त व्हावे लागले होते. नऊ कसोट्या आणि १९ एकदिवसीय सामन्यांमध्ये फजल शतकाच्या एवढ्या जास्त जवळ पुन्हा कधीही जाऊ शकला नाही. नशीब म्हणतात ते हेच!
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply