वर्ष १९२८
अखेर हॅल हूकर बाद झाला आणि अॅलन किप्पॅक्स-हॅल हूकर ही जोडी फुटली ! न्यू साऊथ वेल्स सर्वबाद ४२०. ९ बाद ११३ धावांवर ही जोडी एकत्र आली होती. तब्बल ३०७ धावा अखेरच्या जोडीसाठी जोडून या जोडीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
हा सामना होता १९२८-२९ च्या हंगामातील शेफिल्ड शील्ड स्पर्धेचा. विक्टोरिया विरुद्ध न्यू साऊथ वेल्स. मैदान- मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड.
विक्टोरियाचा पहिला डाव ३७६ धावांवर संपुष्टात आला होता आणि उत्तरादाखल न्यूसावेने दिलेला डाव जवळपास कोसळलेला होता. चौथ्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार किप्पॅक्सचा अपवाद वगळता सर्व फलंदाज स्वस्तात परतले होते. डॉन ब्रॅडमन एक धाव काढून त्रिफळाबाद झालेले होते तिथे इतरांची काय कथा.
अखेर कर्णधाराला क्रमांक अकराच्या फलंदाजाने साथ दिली. तिसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा किप्पॅक्स २२१ आणि हूकर ५१ धावांवर खेळत होते आणि त्यांच्या संघाने ३६७ धावा झालेल्या होत्या. चौथ्या दिवशी वैयक्तिक ६२ धावांवर हूकर बाद झाला. सामना अखेर अनिर्णित राहिला.
शेवटच्या जोडीसाठी ३०७ धावा हा आजही प्रथमश्रेणी सामन्यांमधील विक्रम आहे.
कसोटी सामन्यांमधील शेवटच्या जोडीची सर्वोत्तम भागीदारी : १५१ धावा, भिडू- ब्रायन हेस्टिंग्ज-रिचर्ड कोलिंज (न्यूझीलंड), पाकिस्तानविरुद्ध, ऑकलंड, फेब्रुवारी १९७३. आणि १५१ धावा, अझर मेहमूद-मुश्ताक अहमद, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, रावळपिंडी, ऑक्टोबर १९९७.
भारतीय विक्रम : १३३ धावा, सचिन तेंडुलकर-झहीर खान, बांग्लादेशविरुद्ध, ढाका, डिसेंबर २००४.
प्रथमश्रेणीतील सामन्यांमधील शेवटच्या जोडीची सर्वोत्तम भागीदारी : उपरोल्लेखित.
भारतीय विक्रम : २४९ धावा (हा विक्रम जागतिक यादीत दुसर्या क्रमांकाचा आहे), चंदू सरवटे-शूते बॅनर्जी, सरेविरुद्ध ओवलवर, १९४६.
भार तीय भूमीवरील विक्रम : २३३ धावा, अजय शर्मा-मनिंदर सिंग, दिल्ली वि. मुंबई, मुंबईमध्ये, १९९१-९२.
एकदिवसीय सामने
: विविअन रिचर्ड्स-मायकल होल्डिंग, इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरवर अखंडित १०६ धावा, मे १९८४.
भारतीय विक्रम : हरभजन सिंग-लक्ष्मीपती बालाजी, इंग्लंडविरुद्ध ओवलवर ६४ धावा, सप्टेंबर २००४.
वर्ष १९३५.
रोहन भोलालाल कन्हाईचा जन्म. स्थळ ब्रिटिश गियाना.
१९६० च्या दशकातील वेस्ट इंडीज संघात सर गारफील्ड सोबर्स, रॉय फ्रेड्रिक्स, लान्स गिब्ज, अल्विन कालिचरण असे गुणवान खेळाडू होते. या खेळाडूंच्या बरोबरीचा आणखी एक शैलीदार फलंदाज म्हणजे रोहन कन्हाई. पहिलावहिला एकदिवसीय विश्वचषक ज्या विंडीज संघाने जिंकला त्या संघात कन्हाईचा समावेश होता.
१९५७ साली इंग्लंडविरुद्ध कन्हाईचे कसोटीपदार्पण झाले आणि सलामी देण्याबरोबरच पहिल्या तीन सामन्यांमध्ये यष्टीरक्षणाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. नंतर मात्र निव्वळ फलंदाज म्हणून वेस्ट इंडीज संघात ते चमकत राहिले.
१९५७ ते १९७४ या कालावधीतील ७९ कसोट्यांमधून ४७.५३ च्या सरासरीने १५ शतके आणि २८ अर्धशतकांसह एकूण ६,२२७ धावा कन्हाईने जमविल्या. कलकत्त्यातील २५६ धावा ही त्याची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी. पन्नाशीच्या जवळ जाणार्या सरासरीसोबतच कन्हाई त्याच्या काही अपारंपारिक फटक्यांसाठी सुविख्यात आहे.
कारकिर्दीच्या उत्तरार्धात कन्हाई वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार बनला आणि महान गॅरी सोबर्सची जागा त्याने घेतली.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply