क्रिकेटविश्वात चांगल्या पंचगिरीसाठी विख्यात असलेल्या व्यक्तींची संख्या खूपच कमी आहे. डेविड रॉबर्ट शेफर्ड हे त्या नगण्यांपैकी एक. २७ डिसेंबर १९४० रोजी त्यांचा जन्म झाला. ब्याण्णव कसोट्या आणि १७२ एकदिवसीय सामन्यांमध्ये शेफर्ड लवाद म्हणून उभे राहिले. तीन विश्वचषक स्पर्धांच्या अंतिम सामन्यांमध्ये आणि एकूण सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये
पंचगिरी करण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
शेफर्ड हे बर्यापैकी चांगले प्रथमश्रेणी खेळाडू होते. ग्लुसेस्टरशायरकडून १४ वर्षे ते खेळले. २८२ प्रथमश्रेणी सामन्यांमधून १२ शतके आणि ५५ अर्धशतकांसह १०,६७२ त्यांनी जमविलेल्या होत्या. पदार्पणाच्या प्रथमश्रेणी सामन्यातच त्यांनी शतक काढले होते.
१९८१ मध्ये सर्वप्रथम शेफर्डांची प्रथमश्रेणी पंच म्हणून नियुक्ती झाली. दोन वर्षांच्या आतच त्यांच्या अचूकतेने आणि वेगवान निर्णय देण्याच्या पद्धतीने लक्ष वेधून घेतले आणि १९८३ च्या विश्वचषकात पंचगिरीची संधी त्यांना मिळाली. आणखी दोन वर्षांनी ते कसोटीत ‘उभे राहिले’. पदार्पणाच्या कसोटीत त्यांचे भिडू होते आणखी एक नावाजलेले पंच डिकी बर्ड.
चौकार दर्शविण्याची शेफर्डांची ‘हातोटी’ पाहण्याजोगी होती पण त्याहीपेक्षा ते प्रसिद्ध आहेत- एका पायावर उभे राहून पंचगिरी करण्यासाठी. १११ हा आकडा जगाच्या काही भागांमध्ये अशुभ मानला जातो आणि पंचगिरी करीत असलेल्या सामन्यात संघाची धावसंख्या १११ किंवा १११ च्या पटीत आली की धावफलक पुढे सरकेपर्यंत डेविड शेफर्ड एका पायावर उभे राहत असत- अरिष्टनिवारणासाठी !! १११ हा आकडा ‘नेल्सन नंबर’ म्हणून विख्यात आहे. (ऑस्ट्रेलियात १३-कमी-१०० अर्थात ८७ हा आकडा ‘डेविल्स नंबर’ म्हणून ओळखला जातो.)
२७ ऑक्टोबर २००९ रोजी फुफ्फुसाच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले.
<पंच म्हण न सर्वाधिक कसोट्या
१. स्टीव बकनर, विंडीज- १२८.
२. रुडी कर्ट्झन, द. आफ्रिका- १०८.
३. डॅरेल हार्पर, ऑस्ट्रेलिया- ९२.
४. डेविड शेफर्ड, इंग्लंड- ९२.
५. डॅरेल हेअर, ऑस्ट्रेलिया- ७८.
६. श्रीनिवास वेंकटराघवन, भारत- ७३.
७. डिकी बर्ड, इंग्लंड- ६६.
८. सायमन टोफेल, ऑस्ट्रेलिया- ६६.
९. बिली बाव्डन, न्यूझीलंड- ६४.
१०. अलीम दर, पाकिस्तान- ६१.
<पंच म्हणून सर्वाधिक एदिसा
१. रुडी कर्ट्झन- २०९
२. स्टीव बकनर- १८१
३. डेविड शेफर्ड- १७२
४. डॅरेल हार्पर- १६८
५. सायमन टोफेल- १५४
६. बिली बाव्डन- १४९
७. डॅरेल हेअर- १३९
८. अलीम दर- १३८
९. रसेल टिफिन, झिम्बाब्वे- ११८
१०. अशोका डिसिल्वा, श्रीलंका- १०८.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply