२७ नोव्हेंबर १९८६ रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये सुरेश कुमार रैनाचा जन्म झाला. पाच भावंडांमधील शेंडेफळ असणार्या सुरेशने वयाच्या १३ व्या वर्षीच चेंडूफळीचा खेळ गंभीरतेने घेण्याचे ठरविले आणि लखनौच्या स्पोर्ट्स कॉलेजात तो दाखल झाला. १६ वर्षांखालील उत्तर प्रदेश संघाचा तो कर्णधार लवकरच बनला. वयाच्या सोळाव्या वर्षी इंग्लंड दौर्यावर जाणार्या १९ वर्षांखालच्या संघात त्याची निवड झाली.
२००३ मध्ये त्याने आसाम संघाविरुद्ध खेळून रणजी पदार्पण साजरे केले पण पुढचा सामना मिळण्यासाठी त्याला पुढच्या हंगामापर्यंत वाट पहावी लागली. वाट पाहण्याचा त्याचा सराव अशा रीतीने वयाची १७ वर्षे पूर्ण होण्याआधीच सुरू झाला. मग अंडर-१९ चा विश्वचषक त्याने गाजविला, ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकादमीत प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली, २००५ च्या चॅलेंजर चषकात त्याची निवड झाली आणि त्यानंतर श्रीलंकेतील इंडिअन ऑईल कपसाठी रैना भारतीय संघात आला.
पहिल्याच सामन्यात रैना पहिल्या चेंडूवर बाद झाला – सोन्याचे बदक त्याला मिळाले. मुरलीदरनचा दूसरा त्याच्या पहिल्याच डावाचा कर्दनकाळ ठरला. या स्पर्धेमधून त्याला अवघ्या ३७ धावाच जमविता आल्या. सौरव गांगुली तंदुरुस्त झाल्याने पुढची मालिका झिम्बाब्वेविरुद्ध असूनही रैनाला संघात स्थान मिळाले नाही. गुरू ग्रेग चॅपेल यांच्याशी झालेल्या मतभेदांनंतर गांगुलीचे संघातील स्थान गेले. तशात मोहम्मद कैफ जखमी झाल्याने रैनाला संधी मिळाली. त्या काळी प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या राखीव खेळाडूच्या ‘सुपरसब’ नावाच्या प्रकारात रैना चमकला. २००६ च्या पाकिस्तान दौर्यानंतरच रैना भारताच्या मधल्या फळीचा नियमित घटक बनला असे म्हणावे लागेल.
या पाक दौर्यानंतर कसोटी संघात त्याची निवड झाली पण प्रत्यक्ष खेळण्याची संधी त्याला मिळाली नाही. इंग्लंडच्या या दौर्यात रैनाने एदिसांमध्ये चमक दाखविली. विंडीज दौर्यासाठीच्या कसोटी चमूतही तो होता पण सामना त्याला खेळावयास मिळाला नाही. नंतर त्याला एदिसांसाठीच्या संघात समावेश असूनही बाकावरच बसून सर्व एदिसा
पाहण्याचा
बाका प्रसंगही सहन करावा लागला.
२०१० च्या पाचव्या महिन्यात झालेल्या आंक्रिपच्या विसविशीत विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या ६० चेंडूंमध्ये १०१ धावा तडकावून सुरेश रैना विसविशीत सामन्यात शतक झळकावणारा तिसरा आंतरराष्ट्रीय खेळाडू बनला. पहिले दोघे आहेत- विंडीजचा क्रिस गेल आणि न्यूझीलंडचा ‘झडप्या’ ब्रेंडन मॅक्कलम. याच वर्षाच्या आठव्या महिन्यात श्रीलंका दौर्यावर अखेर त्याला कसोटीत पदार्पण करता आले. कारकिर्दीतील पहिली कसोटी खेळण्यापूर्वी सर्वाधिक एदिसा खेळण्याचा विक्रम रैनाच्या नावावर झाला. आपल्याच पहिल्याच कसोटी डावात रैनाने शतक पूर्ण केले आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत २०० हून अधिक धावांची भागीदारीही त्याने केली.
अगदी अलीकडे संडे टाईम्स या ब्रिटिश दैनिकाने श्रीलंका दौर्यादरम्यान सुरेश रैना एका ‘बुकी’ महिलेसोबत फिरताना आढळल्याचे वृत्त दिले होते आणि श्रीलंका क्रिकेट मंडळाने तसा अहवालही आंक्रिपला (आयसीसी) दिल्याचे म्हटले होते. भारतीय मंडळाने मात्र असे काही घडल्याचा इन्कार केला. आयसीसी आणि / किंवा बीसीसीआय या प्रकरणाची चौकशी करीत आहेत की नाहीत याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply