इंडीयन प्रिमिअर लीगचा पहिलाच सामना आपल्या नेत्रदीपक फटकेबाजीने गाजविणार्या ब्रेन्डन बॅरी मॅक्कलमचा जन्म २७ सप्टेंबर १९८१ रोजी ओटागोत झाला. अत्यंत स्फोटक फळकूटवीर असण्याबरोबरच तो एक चपळ यष्टीरक्षकही आहे. प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजीदरम्यान तो यष्ट्यांमागे उभा असतो म्हणून तो कॅमेर्याच्या फोकसमध्ये येतो आणि स्वतः फलंदाजीसाठी आल्यावर तर विचारायचीच सोय नाही. तो खेळपट्टीवर असला म्हणजे सगळे लक्ष आपोआप त्याच्या आसपासच खेचले जाते आणि लक्षावधी डोळयांचे पारणे फिटते…१८ एप्रिल २००८ रोजी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना त्याने अवघ्या ७३ कंदुकांवर नाबाद राहत १५८ धावा उधळल्या. एका विसविशीत डावातील फलंदाजाचा हा सर्वोच्च वैयक्तिक डाव ठरला. आंतरराष्ट्रीय विसविशीत स्पर्धांमध्ये आजवर केवळ दोनच पुरुषांनी शतके काढलेली आहेत. पहिला कॅरिबिअन बेटांचा ‘बेट्या’ क्रिस गेल आणि दुसरा ब्रेन्डन. २७-०२-२०१० रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्राईस्टचर्चमध्ये विसविशीत सामन्यात ब्रेन्डन ११६ धावा काढून नाबाद राहिला. क्रिस गेलच्या शतकीय धावसंख्येला गाठण्यास तो एकने कमी पडला. मे २०१० मध्ये ब्रेन्डनने १,००० आंतरराष्ट्रीय विसविशीत धावांचा टप्पा पार केला. तिथे पोहचणारा अर्थातच तो पहिला. आणखी काही केले नाही तरी एका ‘फटक्यासरशी’ तो क्रिकेटिहासात अजरामर होणार आहे – ‘झडप्या’ टोला.दोन पायांवर उकिडवे बसून चेंडूची वाट बघून तो यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून षटकारासाठी टोलविणे !! मागच्या दोन पायांवर उभे राहत ज्याप्रमाणे एखादे हिंस्र श्वापद तयारीत दबा धरून राहते आणि सावज पट्ट्यात येताच झडप घालते – अगदी तशाच पद्धतीने आपल्या शतकीय खेळीत ब्रेन्डनने शॉन टेटसारख्या वेगवान गोलंदाजाला ब्रॅड हॅदिनच्या डोक्यावरून कैकदा टोलविले.आजमितीला ४० आंतरराष्ट्रीय विस
िशीत सामन्यांमधून (केवळ) ८५७ चेंडूंचा फडशा पाडताना १,१०० त्याने काढलेल्या आहेत. एक शतक, सहा निमशतके, ११२ चौकार आणि ३९ षटकार. त्याच्या खेळण्याचा धडाका आणि सातत्य पाहता
त्याला आंतरराष्ट्रीय विसविशीत स्पर्धांमधील ‘सचिन’ किंवा ‘डॉन’ म्हणायला हरकत नाही. आताशा तो यष्टीरक्षण कमी
करतो आणि ऑफस्पिन गोलंदाजीचा रियाझ जास्त करतो.
ब्रेन्डन मॅक्कलमच्या जन्मानंतर बरोबर एका वर्षाने कॅरिबिअन बेटांवरील जमैकातील किंग्स्टन शहरातील सबिना पार्क मैदानावर एडी हेमिंग्जने एकाच प्रथमश्रेणी डावात दाहीच्या दाही गडी बाद करण्याचा पराक्रम केला. तेरा वर्षांच्या खंडानंतर क्रिकेटिहासात हे घडले. सामना होता वेस्ट इंडीज एकादश विरुद्ध आंतरराष्ट्रीय एकादश. दुसर्या डावात हेमिंग्जने वेस्ट इंडीजच्या एका फलंदाजाचा त्रिफळा उडविला, एकाला यष्टीचित करविले आणि इतर आठ जणांना झेलबाद करविले. ४९.३ षटके – १४ निर्धाव – १७५ धावा आणि १० बळी. प्रथमश्रेणी सामन्याच्या एकाच डावात दाही गडी बाद करण्यासाठी गोलंदाजाने मोजलेल्या १७५ धावा या सर्वाधिक आहेत.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply