प्रथमश्रेणी क्रिकेटच्या इतिहासात आजवर केवळ दोनच वेळा ‘एखाद्या’ संघाने १,००० धावांचा टप्पा पार करण्याची घटना घडलेली आहे. हा ‘एखादा’ संघही दोन्ही वेळा एकच होता- ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया प्रांताचा संघ. मैदानही तेच- मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड.
शेफिल्ड शील्ड ही ऑस्ट्रेलियातील एक चुरशीने खेळली जाणारी प्रथमश्रेणी स्पर्धा. २४ डिसेंबर १९२६ रोजी या स्पर्धेतील विक्टोरिया वि. न्यू साऊथ वेल्स हा सामना सुरू झाला. ८१ अष्टकांमध्ये न्यूसावे (न्यू साऊथ वेल्स) संघाने सर्वबाद २२१ धावा काढल्या.
बिल वुडफूल आणि पॉन्सफर्ड या विक्टोरियाच्या सलामी जोडीने पावणेचारशे धावांची भक्कम सलामी दिली. वैयक्तिक १३३ धावांवर वुडफूल बाद झाला. दुसरा सलामीवीर पॉन्सफर्ड मात्र तिथवर त्याला साथ देऊन आणि मग इतरांना सोबतीला घेत वैयक्तिक ३५२ धावा जमवता झाला. जॅक रायडरचे त्रिशतक अवघ्या पाच धावांनी हुकले. आणखी एका फलंदाजाने शतक काढले.
अखेर साडेदहा तास आणि १९०.७ अष्टकांच्या खेळानंतर विक्टोरियाचा संघ सर्वबाद झाला एक हजार १०७ धावा काढून. आर्थर मेली या गोलंदाजाने ३६२ धावा दिल्या. चार वर्षांपूर्वी तास्मानियाविरुद्ध विक्टोरियाच्या संघाने एक हजार एकोणसाठ धावा काढल्या होत्या. २८ डिसेंबर १९२६ रोजी या संघाने स्वतःचाच विक्रम मोडला.
एका डावात संघाच्या सर्वाधिक धावा :
कसोटी सामने- ९५२ (६ बाद, घोषित). भारताविरुद्ध श्रीलंका. आर प्रेमदासा मैदान.
भारतीय विक्रम- ७२६ (९ बाद, घोषित). श्रीलंकेविरुद्ध मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानावर.
प्रथमश्रेणी सामने- जागतिक विक्रम उपरोल्लेखित.
भारतीय विक्रम- ९४४ (६ बाद, घोषित). आंध्र प्रदेशविरुद्ध श्रीलंका.
महिला कसोट्या- ६ बाद ५६९ घोषित. ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंडविरुद्ध.
भारतीय महिला- सर्वबाद ४६७ इंग्लंडविरुद्ध.
एकदिवसीय सामने
जागतिक विक्रम- ५० षटकांमध्ये ९ बाद ४४३. नेदरलँड्सविरुद्ध श्रीलंका.
भारतीय विक्रम-
५० षटकांमध्ये ७ बाद ४१४. श्रीलंकेविरुद्ध.
महिला- ५ बाद ४५५. न्यूझीलंडच्या पाकिस्तानविरुद्ध.
भारतीय महिला- २ बाद २९८ वेस्ट इंडीजविरुद्ध.
यादी अ मधील सामने
५० षटकांत ४ बाद ४९६. ग्लुसेस्टरशायरविरुद्ध सरे.
विसविशीत सामने
आंतरराष्ट्रीय- ६ बाद २६०. (पुन्हा ‘दुसर्यांदा’) श्रीलंका केनियाविरुद्ध.
भारतीय संघाचा विक्रम- ४ बाद २१८. इंग्लंडविरुद्ध.
महिला- १ बाद २०५. दक्षिण आफ्रिका नेदरलँड्सविरुद्ध.
भारतीय महिला- ३ बाद १४४. श्रीलंकेविरुद्ध.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply