२९ डिसेंबर १९४९ रोजी मद्रासमध्ये सय्यद किरमानीचा जन्म झाला. भारताकडून यष्टीरक्षक म्हणून देखणी कारकीर्द लाभलेला किरमानी कर्नाटक संघातर्फे स्थानिक स्पर्धांमध्ये सहभागी होई.
खेळाडूंची कुठल्याही प्रकारची क्रमवारी ही अखेर सापेक्षच असणार पण भारताकडून खेळलेल्या यष्टीरक्षकांची दर्जानुसार क्रमवारी लावायचीच झाली तर किरमानींना तिसर्या स्थानाहून अधिक खाली झुकवता येणार नाही.
तीन मालिकांमध्ये किरमानीचा समावेश अभ्यासासाठी झाला होता असेच म्हणावे लागेल. १९७१ आणि १९७४ चे इंग्लंड दौरे आणि १९७५ चा विश्वचषक या मालिकांमध्ये किरीच्या वाट्याला एकही सामना आला नाही. अखेर २४ जानेवारी १९७६ रोजी किरमानीने ईडन पार्कवर (न्यूझीलंड) पदार्पण साजरे केले. कारकिर्दीतील दुसर्याच कसोटीत एका डावात सहा शिकारी लपकून जागतिक विक्रमाची बरोबरी किरीने केली. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मालिकेत मात्र किरी काहीसा गांगरलेला दिसला. याच मालिकेत विविअन रिचर्ड्सने सलग तीन कसोट्यांमध्ये शतके काढण्याचा विक्रम केलेला होता. किरीच्या हातून सुटलेले त्याचे काही झेल लोकांच्या नजरेत भरल्यावाचून राहिले नाहीत.
एव्हाना त्याच्याकडे फलंदाजीचीही चांगली क्षमता असल्याची चुणूक दिसली होती. मात्र यष्ट्यांमागील त्याच्या कामगिरीत म्हणावे तसे सातत्य नव्हते. १९७९ च्या विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात आणि त्यानंतरच्या इंग्लंड दौर्यासाठीच्या संघात किरमानीला स्थान मिळाले नाही. सुनील गावसकरचीही कर्णधारपदावरून हकालपट्टी झाली. या दोघांच्या पदावनतीमागील खरे कारण वेगळेच असल्याचे बोलले जाते. केरी पॅकरच्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटसाठी या दोघांना विचारणा करण्यात आलेली होती हे ते कारण असल्याचे बोलले जाते.
१९७९-८० च्या हंगामात किरी संघात परत आला. मुंबईत संध्यारक्षक म्हणून त्याने शतकही काढले (ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १०१). याच हंगामात पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याने १७ झेल अधिक दोन यष्टीचित अशा एकोणीस शिकारी साधून नरेन ताम्हाणेंच्या एका मालिकेत यष्टीमागून सर्वाधिक बळी मिळविण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. इंग्लंडविरुद्धच्या १९८१-८२ च्या मालिकेत
तीन सलग कसोट्यांमध्ये किरीने
एकही ‘बाय’ची धाव दिली नाही. तब्बल एक हजार ९६४ धावा इंग्लंडने या तीन कसोट्यांमध्ये मिळून जमविल्या होत्या.
१९८३ च्या विश्वचषकातील सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून किरमानीला गौरविण्यात आले होते. या विश्वचषकातील पहिल्याच साखळी सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध यष्ट्यांमागून पाच बळी किरीने मिळविले होते.
वानखेडेवर इंग्लंडविरुद्ध किरीने १०२ धावांची एक खेळी नोव्हेंबर १९८४ मध्ये केली आणि या खेळीदरम्यान रवी शास्त्रीबरोबर २३५ धावांची भागीदारी केली. त्यावेळी ही भागीदारी विश्वविक्रमी ठरली. याच मालिकेदरम्यान मद्रास कसोटीत किरीकडून काही मोक्याचे झेल सुटले आणि निवडकर्त्यांनी सदानंद विश्वनाथला संधी दिली.
पुन्हा एकदा किरमानीने संघात प्रवेश मिळवला आणि वर्ल्ड सिरीज कपमध्ये त्याने अॅलन बॉर्डरचा अफलातून झेल घेतला. याच सामन्यात त्याच्या पायाला दुखापत झाली आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट.
नंतर स्थानिक स्पर्धांमधून वारंवार चांगली कामगिरी किरमानीने केली पण किरण मोरे आणि चंद्रकांत पंडित यांसारख्या ताज्या दमाच्या रक्षकांना संधी देण्यात आली.
कभी अजनबी थे या नावाच्या हिंदी चित्रपटात अंडरवर्ल्डमधील एक पात्र किरमानीने साकारले आहे. (या चित्रपटात संदीप पाटीलचीही भूमिका होती.)
नोंद म्हणून : तुळतुळीत टक्कल हे सय्यद किरमानीचे परिचयचिन्ह. जाणूनबुजून डोक्यावर अजिबात केस न ठेवण्यासाठी तो ओळखला जातो.
कारकीर्द :
८८ कसोट्या, १२४ डाव, २२ वेळा नाबाद, २७.०४ च्या सरासरीने २ हजार ७५९ धावा, २ शतके, १२ अर्धशतके. १६० झेल आणि ३८ यष्टीचित.
४९ एदिसा, ३१ डाव, १३ वेळा नाबाद, ३७३ धावा, सरासरी २०.७२. नाबाद ४८ सर्वोच्च. २७ झेल आणि ९ यष्टीचित.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply