भारत आणि पाकिस्तान या राष्ट्रांच्या क्रिकेटिहासातील साम्य असे की, या दोन्ही राष्ट्रांच्या क्रिकेट संघांनी प्रत्येकी दोनदा विश्वचषक स्पर्धा जिंकलेली आहे. प्रत्येकी एकेकदा निर्धारित षटकांची एदिसांची स्पर्धा आणि विसविशीत स्पर्धा.
२९ नोव्हेंबर १९७७ रोजी पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतात (नॉर्थ-वेस्ट फंटियर प्रॉव्हिन्स) युनूस खानचा जन्म झाला. “माझे नाव युनूस खान आहे” असे जिथे-तिथे या खानाने स्पष्ट केलेले असूनही त्याचे नाव युनिस खान असेच लिहिले आणि टाईपले जाते. विसविशीत विश्वचषकामध्ये पाकिस्तानने त्याच्या नेतृत्वाखालीच विजय मिळविलेला आहे.
चांगला फलंदाज असण्याबरोबरच युनूस स्लीपमधला एक चपळ क्षेत्ररक्षक आणि कामचलाऊ लेगस्पिनरदेखील आहे. पाकिस्तानपेक्षा परदेशांमध्येच त्याची कामगिरी अधिक बहरलेली आहे. भारताविरुद्ध आजवर सहा कसोट्यांमधून युनूस खेळलेला असून या सामन्यांमधून त्याची सरासरी १०६ इतकी प्रचंड भरते. भारताविरुद्ध सर्वाधिक सरासरी राखणारा पाकिस्तानी खेळाडू असा विक्रम त्याच्या नावावर आहे. बंगळुरात २६७ आणि कोलकत्यात २००५ मध्ये १४७ धावा काढण्याबरोबरच २००६ ला भारताविरुद्ध मायदेशात त्याने दोन शतकेही काढली आहेत.
कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात युनूस खानने ३१३ धावांची खेळी केली (श्रीलंकेविरुद्ध कराचीच्या नॅशनल स्टेडिअमवर २००९ मध्ये). पाकिस्तानचा पराभव या त्रिशतकामुळे वाचला. त्याच्या कारकिर्दीत अनेकदा त्याला पाकिस्तानी मंडळाकडून कर्णधारपदाची ऑफर देण्यात आली आणि अनेकदा युनूसने ती नाकारली. अखेर २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एजाज बट्ट यांनी कसोट्या आणि एदिसा या दोहोंसाठी कर्णधार म्हणून युनूस खानची नियुक्ती जाहीर केली आणि या खेपेला युनूसने हा काटेरी मुकूट स्वीकारण्याचे ठरवले.
या स्वीकृतीनंतर दहाव्याच महिन्यात युनूसने आपले मोहरे मागे फिरवले. त्याच्या कप्तानीच्या काळात झालेल्या कथित सामनानिश्चितीच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी संसदीय समिती नियुक्त करण्यात
आल्यानंतर युनूसने कप्तानी सोडली. मार्च २०१० मध्ये संघात दुही माजविण्याच्या आरोपाखाली युनूस खानवर अनिश्चित काळासाठी बंदी
घालण्यात आली. तीन महिन्यांनंतर ही कारवाई मागे घेण्यात आली पण इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली नाही. पाकिस्तानमध्ये कप्तानीसाठी त्याला पहिली पसंती असूनही मिस्बा-उल-हककडे कर्णधारपद आता सोपविण्यात आलेले आहे. आता संघात युनूसचा समावेशही करण्यात आलेला आहे.
नॉटिंगहॅमशायर आणि यॉर्कशायरकडून काऊंटी स्पर्धांमध्ये आणि ऑस्ट्रेलियातील सदर्न रेडबॅक्सकडून युनूस खान खेळलेला आहे. पहिल्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून तो एका सामन्यातही खेळला होता.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply