१९६२ : सर्वात जास्त काळ स्वतःची चकाकी टिकवून ठेवलेल्या द्रुतगती गोलंदाजाचा जन्म. माल्कम मार्शल आणि कर्टली अम्ब्रोजप्रमाणे त्याने पारंपरिक तत्त्वे सांभाळीत गोलंदाजी सुरू केली खरी पण कौशल्य, चातुर्य आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर तो कसोटी सामन्यांमध्ये ५०० बळी घेणारा पहिला गोलंदाज बनला. पहिल्या ६३ सामन्यांमध्ये पाच वेळाच डावात ५ बळी घेणार्या या गोलंदाजाने पुढच्या ६९ सामन्यांमध्ये १७ वेळा डावात ५ बळी घेतले. कोर्टनी वॉल्शच्या कारकिर्दीत अनेक ठळक घडामोडी घडल्या : अडलेडमध्ये १९९२-९३ च्या हंगामात क्रेग मॅक्डरमॉटला चकवीत त्याने एका धावेने संघाला विजय मिळवून दिला. पुढच्याच हंगामात जमैकात माइक आथर्टनला त्याने तुफान सतावले, अम्ब्रोजच्या अनुपस्थितीत त्याच्या पुढच्या हंगामात भारत दौर्यावर त्याने विंडीजचा दबदबा कायम राखला. वेलिंग्टनमध्ये ५५ धावांत १३ बळी, ओल्ड ट्रॅफर्डवर एका हळुवार चेंडूवर ग्रॅहम थॉर्पला मामा केल्यावर त्याने केलेला जल्लोष….त्रिनिदादमध्ये २००१ मध्ये जॅक्स कॅलिसला बाद करून त्याने आपली ऐतिहासिक पाचशेवी शिकार साधली. वॉल्श हा अत्यंत सुस्वभावी माणूस म्हणून प्रसिद्ध आहे.
१९७६: पाकिस्तान-न्यूझीलंडदरम्यानच्या तिसर्या कसोटीतील पहिला दिवस माजिद खानने गाजवला. ७४ चेंडूंमध्ये शतकी मजल मारताना भोजनकालापूर्वी (उपाहारापूर्वी) शतक पूर्ण करणारा तो एकूणात चौथा आणि पहिला बिगरकांगारू खेळाडू ठरला. त्याच्यापूर्वी व्हिक्टर ट्रम्पर, चार्ल्स मॅकर्टनी आणि डॉन ब्रॅडमन यांनी अशी कामगिरी केली होती.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply