३० सप्टेंबर १९५२ रोजी कसोटीच्या इतिहासातील एकमेव बहिष्कृत कसोटीच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि मुरलीदरनने टाकलेले चेंडू अवैध ठरविणार्या मनुष्याचा जन्म झाला. डॅरेल ब्रूस हेअर त्याचं नाव.
बिली डॉक्ट्रोव यांच्यासोबत डॅरेल हेअर नामक कांगारू पंचाने पाकिस्तानी खेळाडूंना चेंडू कुरतड्याबद्द्ल दोषी ठरविले – ते चुकीचे होते हे नंतर दिसून आले – आणि पाकने कसोटी चालू ठेवण्यास नकार दिल्यानंतर हेअर महाशयांनी परस्परच सामना इंग्लंडला बहाल करून टाकला होता. मेलबर्नमध्ये १९९५-६५ मध्ये श्रीलंकेच्या मुरलीचे ७-८ चेंडू हेअरने ‘नो’ ठरविले. आपल्या आत्मचरित्रात मुरली फेकतो हे सांगतानाच ग्रँट फ्लॉवरही फेकाफेक करी असे त्याने लिहिले आहे.
रमीज राजा, अर्जुना रणतुंगा, इम्रान खान आणि कपिल देव यांनी वेळोवेळी हेअर ही वादग्रस्त ‘केस’ असल्याचा निर्वाळा दिला आहे. तो भारतीय उपखंडातील खेळाडूंबाबत वर्णद्वेषी आहे असे म्हटले जाते आणि त्याला सबळ पुरावेही आहेत. ‘त्या’ कसोटीनंतर कसोट्यांमध्ये हेअर यांनी पंचगिरी करू नये असे आंक्रिपने ठरविले होते पण ते फार काळ टिकले नाही. सायमन टोफेलसारख्या पंचांनी मात्र अनेकदा हेअरची तळी उचलून धरलेली आहे.
जानेवारी १९९२ मधील भारत-ऑस्ट्रेलिया सामना हा हेअरचा पहिला कसोटी सामना होता. हा सामना पायचितसाठी वादग्रस्त ठरला होता. आठ भारतीय पायचित दिले गेले होते आणि भारतीयांने केलेल्या पायचितच्या आग्रहांपैकी (अपिल्स) केवळ दोनच मानण्यात आले होते.
ब्रायन लाराच्या ३७५ धावा, माइक आथर्टनच्या १८५ धावा, कोर्टनी वॉल्शचा ५०० वा कसोटी बळी या घटनांदरम्यान हेअर तटस्थ पंच होता. क्रिकेटिहासात मात्र बहाल करण्यात आलेल्या एकमेव कसोटीचा खलनायक म्हणून त्याची नोंद होऊन ‘बरोबरली’ आहे.
अर्नी जोन्स
फेकला गेला असे आढळले म्हणून इतिहासात ज्या गोलंदाजाचा चेंडू ‘नो’ ठरविण्यात आला त्या अर्नी जोन्सचा जन्म ३० सप्टेंबर १८६९ रोजी झाला. अर्नी जोन्स हा कांगारू खत्रूड वेगवान गोलंदाज होता. १९ कसोट्यांमधून त्याने ६४ बळी मिळविले. एका सांगीवांगीच्या कथेनुसार डॉक्टरांच्या (डब्ल्यू जी ग्रेस) एका टिप्पणीमुळे चिडलेला असल्याने त्यांच्या अतिविख्यात दाढीच्या दिशेने जोन्सने मुद्दाम एक आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता. १८९७-९८ चा तो हंगाम. फेकला गेला असे कारण देऊन पंचांनी हा चेंडू अवैध ठरविला. त्याच्या शैलीबाबत नंतर दबक्या आवाजात काही गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या. विज्डेन वार्षिकांकातून इंग्लंडचा माजी कर्णधार स्टॅन्ली जॅक्सनने मात्र त्याची शैली सदोष असल्याच्या कुजबुजीचा साफ इन्कार केला.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply