इसवी सनाचे एक हजार नऊशे पासष्टावे वर्ष सरता सरता मद्रासमध्ये एक बालक जन्माला आले. अनेक देवतांची नावे एकत्र गुंफून त्याला नाव देण्यात आले- शिवरामकृष्णन. एवढे लांबलचक नाव जसेच्या तसे ‘प्रसिद्ध’ होणे शक्य नव्हतेच. हे बालक एल शिवा, नुसताच शिवा किंवा एल एस या नावाने विख्यात झाले. हा एल अर्थात लक्ष्मण हे त्याच्या वडलांचे नाव. आजकाल समालोचक म्हणून त्याचा वाहिन्यांवर वावर आहे.
मद्रासमधील एका आंतरशालेय स्पर्धेच्या सामन्यात २ धावांमध्ये सात गडी बाद करून शिवा प्रकाशात आला. १९८० मध्ये रवी शास्त्रीच्या नेतृत्वाखालील अंडर-१९ संघाने श्रीलंकेचा दौरा केला. या संघात १५ वर्षांचा एल शिवा हा सर्वात लहान खेळाडू होता. वयाच्या सोळाव्या वर्षीच शिवाने प्रथमश्रेणी खेळण्यास प्रारंभ केला. त्याचा पदार्पणाचा सामना हा त्या हंगामातील रणजी करंडकाचा उप-उपांत्य फेरीचा सामना होता. दिल्लीविरुद्धच्या या सामन्यात शिवाने दुसर्या डावात २८ धावांमध्ये ७ गडी बाद केले. यानंतर लगेचच त्याची दुलीप चषकासाठीच्या दक्षिण विभाग संघात निवड झाली. पश्चिम विभागाविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात त्याला बळी मिळाला नाही पण दुसर्या डावात सुनील गावसकरसह पाच जणांना त्याने बाद केले.
वयाच्या अठराव्या वर्षातील चौथ्या महिन्यात शिवाने कसोटीपदार्पण केले. सेंट जॉन्समध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध. तोपर्यंत भारतातर्फे टेस्ट कॅप मिळविलेल्या खेळाडूंमध्ये एल शिवा सर्वात लहान होता. पदार्पणाच्या कसोटीत शिवाकडून काहीही उल्लेखनीय झाले नाही.
कारकिर्दीतील दुसर्या कसोटीत शिवाला पहिला बळी मिळाला. एका फुल्टॉस चेंडूवर इंग्लंडचा ग्रॅएम फाऊलर शिवाकडेच झेल देऊन बाद झाला. याच डावात शिवाने ६४ मध्ये ६ तर पुढच्याच डावात ११७ धावांमध्ये पुन्हा सहा गडी बाद केले. भारताने मुंबईतील हा सामना आठ गडी राखून जिंकला. १९८१ नंतर भारताने जिंकलेला हा पहिला कसोटी सामना होता. दिल्लीतील पुढच्या सामन्याच्या
पहिल्या डावातही शिवाने सहा
बळी मिळविले.
या झंझावातानंतर मात्र या उजव्या हाताने गोलंदाजी करणार्या लेगस्पिनरला कधीही चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. नऊ कसोटी सामन्यांमधून २६ बळी शिवाने मिळविले.
नंतर शिवा फलंदाज बनला. १९८७-८८ च्या हंगामात तामिळनाडूने रणजी करंडक जिंकला त्या मोसमात शिवाने तीन शतके काढली होती. तो राष्ट्रीय संघात परतणार असल्याची हवा अनेकदा आली. १९८७ च्या विश्वचषकात त्याने अचानक पुनरागमनही केले पण कसोटी म्हणून त्याच्या वाट्याला आली नाही.
भारताचे सर्वात लहान कसोटीपदार्पणवीर :
१. सचिन तेंडुलकर : वयाच्या सतराव्या वर्षाचा सातवा महिना.
२. पीयूष चावला : वयाच्या अठराव्या वर्षाचा तिसरा महिना.
३. एल शिवा : वयाच्या अठराव्या वर्षाचा चौथा महिना.
४. पार्थिव पटेल : वयाच्या अठराव्या वर्षाचा सहावा महिना.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply