रे लिंड्वॉल ३ ऑक्टोबर १९२१ रोजी रेमंड रसेल लिंड्वॉलचा जन्म झाला. संक्षिप्तपणे रे लिंड्वॉल म्हणून ओळखला जाणारा रेमंड हा सार्वकालिक द्रुतगती गोलंदाजांच्या ताफ्यातील सर्वोत्तमांपैकी एक म्हणून सार्थपणे क्रिकेटिहासात आपली जागा कमावून आहे. १९४६ ते १९६० या कालावधीत ऑस्ट्रेलियाकडून ६१ कसोट्यांमध्ये तो खेळला. किथ मिलर हा त्याच्या नव्या चेंडूचा भिडूही गाजला.
लिंड्वॉल-मिलर ही सलामीच्या गोलंदाजांची इतिहासातील सर्वोत्तम जोडगोळी मानली जाते. फलंदाजाजवळून उशिरा आणि झपकन निघणारा बहिर्डुल्या (आऊटस्विंगर) ही लिंड्वॉलची खासियत होती. अचूक बुंध्या (यॉर्कर) हे त्याचे आणखी एक मारक अस्त्र. यांच्या जोडीला वेग कमीजास्त करण्याची हातोटी आणि आदळला तर कवटीच फोडेल असा उसळ्याबाऊंसर) !!! त्याच्या गोलंदाजीला तोंड देण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे बिनटोल्या टोकाला उभे राहणे ! आपल्या भात्यातील अस्त्रांमध्ये नंतर त्याने आंतर्डुल्याची (इन्स्विंगर) भर टाकली.त्याची फलंदाजीही ‘दखलपात्र’ होती. कसोट्यांमध्ये त्याने दोन शतके काढलेली आहेत आणि पाच अर्धशतके. डॉन ब्रॅडमन यांच्या नेतृत्वाखाली १९४८ साली इंग्लंडच्या दौर्यावर गेलेल्या संघाने दौर्यावरील सर्वच्या सर्व सामने जिंकले होते. या संघाला दि इन्विन्सिबल्स (अजिंक्य) असे नामाभिधानच चिकटले होते. लिंड्वॉलचे बालपण मात्र नियतीच्या उसळ्यांनी करपवलेले होते. तो हायस्कुलात जाण्यापूर्वीच त्याचे जन्मदाते काळाच्या पडद्याआड गेले होते. १९३२-३३ च्या शरीरवेधी (बॉडीलाईन) मालिकेत इंग्लंडच्या हॅरॉल्ड लार्वूडने निर्माण केलेली दहशत पाहून लिंड्वॉलने वेगवान गोलंदाज बनण्याचे निश्चित केले. १९४६ साली न्यूझीलंड दौर्यावर तो पहिली कसोटी खेळला. पहिल्या मालिकेनंतर तो पुन्हा (पूर्वी खेळत होताच) स्पर्ध
ात्मकरग्बीही खेळला. मिलरसोबतची त्याची विख्यात भिडूगिरी १९४६-४७ च्या हंगामात सुरू झाली. दुसर्याच कसोटीत लिंड्वॉलने त्याचे पहिले कसोटी शतक काढले. ‘अजिक्य’ दौर्यात त्याने एकूण ८६ बळी मिळविले होते – त्यांपैकी २७ कसोटी सामन्यांमधील होते. सर्वाधिक बळी मिळविणारा गोलंदाज तोच होता.वारंवार होणार्या पराभवांना कंटाळून १९५७-५८ च्या हंगामात ऑस्ट्रेलियाने युवा खेळाडूंना संधी
देण्याचे ठरविले आणि रे संघाबाहेर गेला पण वयाच्या सदतिसाव्या वर्षी पुनरागमन करून त्याने क्लॅरी ग्रिमेटचा २१६ बळींचा विक्रम मोडला. एकूण २२८ कसोटी बळींसह तो निवृत्त झाला. डेनिस लिली ह्या आणखी एका झंझावाताला आवाज देण्याचे काम लिंड्वॉलने निवृत्तीनंतर केले. मुंबईत झालेल्या एका कसोटी सामन्यात (नियमित कर्णधार इअन जॉन्सन खेळत नसताना) त्याने ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे नेतृत्वही केले आहे.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply