नवीन लेखन...

डिसेंबर ०३ : मार्क बाऊचर आणि इतर आंतरराष्ट्रीय यष्टीरक्षक

 

३४ वर्षांपूर्वी या तारखेला दक्षिण आफ्रिकेतील ईस्टर्न केप प्रांतातील ईस्ट लंडनमध्ये मार्क वर्डन बाऊचरचा जन्म झाला. अँडी फ्लॉवर, अडम गिल्क्रिस्ट यासारख्या त्याच्या समकालीन यष्टीरक्षकांमुळे बाऊचर झाकोळला गेला आहे खरा पण आजमितीला यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक बळी मिळविण्याची कामगिरी बाऊचरच्याच नावावर आहे आणि फलंदाजीतही त्याला ‘कच्चे लिंबू’ म्हणण्यासारखी परिस्थिती

नाही.

१९९७-९८ च्या हंगामात बाऊचरने डेव रिचर्डसनची जागा घेतली आणि तेव्हापासून आजतागायत तो प्रोटियांचा क्रमांक एकचा यष्टीरक्षक राहिला आहे. ऑक्टोबर २००७ मध्ये कराची कसोटीत पाकिस्तानच्या उमर गुलला पॉल हॅरिसच्या गोलंदाजीवर यष्टीचित करवून बाऊचरने इअन हिलीचा यष्ट्यांमागील सर्वाधिक शिकारींचा विक्रम मागे टाकला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्याच गिल्क्रिस्टने बाऊचरला मागे टाकले. पुढल्या वर्षाच्या दुसर्‍याच महिन्यात बांग्लादेशच्या मुश्फिकर रहिमला झेलबाद करीत बाऊचरने विश्वविक्रम पुन्हा आपल्या नावे केला, तेव्हापासून हा विक्रम बाऊचरच्या ग्लव्ह्जमध्ये सुरक्षित आहे.

एदिसांमध्ये मात्र यष्ट्यांमागील बळींमध्ये गिल्क्रिस्टचाच पहिला क्रमांक लागतो, बाऊचर येतो दुसरा. संध्यारक्षक (नाईट-वॉचमन) म्हणून खेळायला येऊन एका डावात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम काही काळ बाऊचरच्या नावावर होता. सव्वाचारशे धावांचे लक्ष्य पार करून प्रोटियांनी जिंकलेल्या कांगारूंविरुद्धच्या एदिसात बाऊचरनेच विजयी धावा काढलेल्या होत्या.

सप्टेंबर २००६ मध्ये बाऊचरचे पहिले एदिसा शतक आले. धडाक्यात. अवघ्या ४४ चेंडूंवर. किमान सहा वेळा झिम्मी क्षेत्ररक्षकांनी त्याचा झेल सोडला. एकूण ६८ चेंडूंवर नाबाद १४७ धावा. दक्षिण आफ्रिकेने खेळलेल्या सामन्यांपैकी सलग शंभर सामन्यांमधून (एदिसा) खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. हर्शेल गिब्जने एका षटकात ३६ धावा चोपण्यापूर्वी प्रोटियांकडून एका षटकात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम बाऊचर आणि कॅलिसच्या नावावर होता.

या वयातही प्रोटियांच्या विसविशीत संघात बाऊचरचा समावेश आहे ही कौतुकाची गोष्ट आहे. २०११ च्या विश्वचषकातही त्याचा आणि हर्शेल गिब्जचा समावेश असू शकतो असे अलीकडेच दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक कोरी फॉन झिल यांनी स्पष्ट केलेले आहे.

आजवर १३६ कसोटी सामन्यांमधून पाच शतकांसह ५,२४० धावा मार्क बाऊचरने जमविलेल्या आहेत. यष्ट्यांमागून ४८५ झेल आणि २२ यष्टीचित असे एकूण ५०७ बळी यष्ट्यांमागून त्याने मिळविलेले आहेत. २९२ एदिसांमधून त्याने ४०० झेल आणि २२ यष्टीचित अशी कामगिरी केलेली आहे.

आंतरराष्ट्रीय यष्टीरक्षकांच्या शिकारींवर एक नजर :

कसोटी सामने : १. मार्क बाऊचर ५०७ बळी (४८५ + २२), २. अडम गिल्क्रिस्ट ४१६ बळी (३७९ + ३७), ३. इअन हिली ३९५ बळी (३६६ + २९). भारताकडून सय्यद किरमाणी १९८ बळी (१६० + ३८).

एदिसा : १. अडम गिल्क्रिस्ट ४७२ बळी (४१७ + ५५), २. मार्क बाऊचर ४२१ बळी (३९९ + २२), ३. कुमार संगक्कारा ३२५ बळी (२५५ + ७०). भारताकडून महेंद्रसिंग धोनी २२५ बळी (१७० + ५५).

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..