बिशनसिंग बेदीची बहाली १९७८ : आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासात एखाद्या संघाने सामना सुरू ठेवण्यास नकार दिल्याने एकदिवसीय सामना बहाल झाल्याची पहिली घटना. साहिवालमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात सर्फराज नवाजच्या गोलंदाजीचा निषेध म्हणून भारतीय कर्णधार बिशनसिंग बेदीने आपल्या फलंदाजांना माघारी बोलावून घेतले. नवाझने नुकतेच चार सलग उसळे चेंडू टाकले होते आणि त्यापैकी एकही वाईड दिला गेला नव्हता. त्यावेळी भारताला विजयासाठी १४ चेंडूंमध्ये २३ धावांची आवश्यकता होती आणि आठ गडी शिल्लक होते. तत्त्वांशी बेदीने कधीही तडजोड केली नाही. १९७५-७६ साली विंडीजविरुद्धच्या मालिकेत चौथ्या सामन्यात (जमैका) त्याने ‘घाबरविणार्या’ गोलंदाजीच्या निषेधार्थ संघाचा पहिला डाव घोषित केला होता. यानंतर खर्या अर्थाने अशा प्रकारची घटना फक्त एकदाच घडली आहे : २००१ मध्ये अलेक स्टेवर्टने हेडींग्लेचा सामना सोडून दिला. काही थोडे सामने मात्र प्रेक्षकांच्या गोंधळामुळे सोडून द्यावे लागले आहेत आणि यात १९९६ च्या विश्वचषकातील भारत-श्रीलंका सामना उल्लेखनीय आहे.
सर्वात ‘लांब’ डाव १९९९ : प्रथमश्रेणीतील सर्वात लांब डावाची अखेर. राजीव नय्यर या एकतीस वर्षीय मधल्या फळीतील फलंदाजाने कारकिर्दीतील सर्वोत्तम २७१ धावांची खेळी करण्यासाठी १,०१५ मिनिटे (१७ तासांना पाच मिनिटे कमी) घेतली. रणजी चषकाच्या या सामन्यात हिमाचल प्रदेशाकडून जम्मू-काश्मीरविरुद्ध तो खेळत होता. त्याने ७२८ चेंडूंचा सामना केला आणि १ षटकार व २६ चौकार मारले.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply