‘रंगीत’ बेसिल
पाव शतकभर न सुटलेला एक प्रश्न निर्माण करणार्या एका प्रतिभावान खेळाडूचा जन्म ४ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. बेसिल लुईस डि ऑलिव्हेराचा जन्म या दिवशी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये झाला.
आफ्रिकेतील वर्णभेदी धोरणानुसार बेसिल काळा ठरत असल्याने त्याला द. आफ्रिकेत प्रथमश्रेणी खेळण्यास मनाई करण्यात आली. १९६० मध्ये त्याने आपली मातृभूमी सोडून इंग्लंडला प्रयाण केले. तिथे तो मिडलटन आणि वोर्सोस्टर्शायरकडून प्रथमश्रेणी खेळला. १९६४ मध्ये त्याला इंग्लंडचे नागरिकत्व मिळाले. १९६६ मध्ये त्याची इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाली. १९६७ मध्ये विज्डेनने निवडलेल्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंच्या यादीत बेसिल होता.
१९६८ च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पहिल्या आणि पाचव्या कसोटीत तो खेळला. ओवलवरील (५ व्या) कसोटीत त्याने दीडशतकी खेळी केली. द. आफ्रिकेच्या दौर्यावर जाणार्या संघात त्याला खरेतर राजरोसपणे जागा मिळावयास हवी होती पण मायदेशात त्याची गोलंदाजी प्रभावी ठरणार नाही या कारणासाठी त्याला स्थान नाकारण्यात आले. बेसिलचा संघात समावेश केल्यास द. आफ्रिकेकडून दौराच रद्द केला जाण्याची शक्यता होती आणि बहुधा हेच बेसिलची निवड न होण्याचे कारण होते.
वृत्तपत्रांनी इंग्लिश मंडळावर टीकेची झोड उठवली. संघात निवडला गेलेला एक खेळाडू नादुरुस्त आढळल्याने अखेर बेसिलचा संघात समावेश केला गेला. बेसिल संघात असणे ‘अवांछनीय’ आहे असे द. आफ्रिकेच्या तत्कालीन पंतप्रधानांनी स्पष्ट केले होते.
अखेर होऊ घातलेला दौरा रद्द झाला. ह्यानंतर सुमारे २५ वर्षे द. आफ्रिका क्रिकेटच्या देशात वाळीत टाकली गेली.
२००० मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शतकातील सर्वोत्तम द. आफ्रिकी क्रिकेटपटूंच्या यादीत बेसिलचे नाव होते – द. आफ्रिकेकडून कधीही खेळलेला नसूनही !
बूम बूम १००
४ ऑक्टोबर १९९६ रोजी केनिया शताब्दी स्पर्धेत नैरोबीत पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने एकदिवसीय सामन्यांमधील सर्वात कमी कंदुकांवर आलेले शतक झळकावले. श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात वेगाने धावा जमविण्याच्या उद्देशाने त्याला तिसर्या क्रमांकावर पाठविण्यात आले होते.
३७ चेंडूंमध्ये या पठ्ठ्याने शंभराचा आकडा गाठला. त्यापूर्वी हा विक्रम नावावर असलेल्या सनथ जयसुरियाच्या एका षटकात आफ्रिदीने २८ धावा चोपल्या. जयसुरियाला तीनाकडी गाठण्यासाठी आफ्रिदीपेक्षा ११ चेंडू जास्त लागले होते. जयसुरियाइतकेच ११ षटकार आफ्रिदीने मारले.
एकूण ४० चेंडूंमध्ये ११ षटकार आणि ६ चौकारांसह १०२ धावा चोपून आफ्रिदी बाद झाला.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे शाहीद आफ्रिदीचा एदिसांमधील हा पहिलाच डाव होता. दोनच दिवसांपूर्वी झालेल्या केनियाविरुद्धच्या सामन्यातून त्याने पदार्पण केलेले होते पण त्या सामन्यात त्याने फलंदाजी केलेली नव्हती.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply