भारतीय क्रिकेटमधील काही अनाकलनीय कोड्यांपैकी एक असलेल्या माधव आपट्यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९३२ रोजी तत्कालीन बॉम्बेत झाला. १९५१-५२ च्या हंगामात रणजी पदार्पणात सौराष्ट्राविरुद्ध आपट्यांनी शतक काढले. पुढच्याच हंगामात पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली. तीस, नाबाद १० आणि ४२ अशा धावांसह त्यांनी पुढच्या कॅरिबिअन बेटांवरील मालिकेसाठी जाणार्या संघात आपले स्थान निश्चित केले. या दौर्यात स्वतःच्याही अपेक्षांहून चांगली म्हणावी लागेल अशी कामगिरी त्यांनी केली. पाचही कसोट्यांमध्ये त्यांनी सलामी दिली आणि तीही भरभक्कम. त्यांचे डावच बघा : ६४ आणि ५२; ६४ आणि ९; शून्य आणि नाबाद १६३; ३० आणि ३० व १५ आणि ३३. एकूण एका दीडशतकासह ५१.११ च्या सरासरीने ४६० धावा. त्यांच्याहून अधिक धावा फक्त पॉली उम्रीगरांनी काढल्या होत्या. विजय हजारे, विनू मंकड, पंकज रॉय, विजय मांजरेकर यांच्यापेक्षा ही कामगिरी सरस होती. त्यांच्या शतकाने भारताचा पराभव वाचविला होता. महदाश्चर्य म्हणजे या दौर्यानंतर पुन्हा कधीही भारतीय कसोटी संघात निवड झाली नाही. कारकिर्दीतील १३ डावांमध्ये त्यांनी ४९.२७ धावांची सरासरी राखलेली होती तरीही…
सध्या क्रिकेट व्हिक्टोरियाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या टोनी डोडमेडचा जन्म ५ ऑक्टोबर १९६३ रोजी झाला. माधव आपट्यांप्रमाणेच काहीशी टोनीची कथा आहे. आपट्यांपेक्षा निम्म्याहूनही कमी सरासरी १० कसोट्यांमधून राखणार्या टोनीने गोलंदाजीत ३४ बळी घेऊन त्याची भरपाई केलेली होती. तरीही तो केवळ दहाच सामने खेळला.२६ डिसेंबर १९८७ रोजी न्यूझीलंडविरुद्ध त्याचे कसोटी पदार्पण झाले. पहिल्या डावात केवळ १ गडी बाद करणार्या टोनीने दुसर्या डावात ५८ धावा देत ६ गडी बाद केले. कसोटी पदार्पणातच ‘पाचाळी’ (एका डावात ५ बळी). त्याचे पदार्पण गाजणे एवढ्यावरच थांबत नाही.२ जानेवारी १९८८ : स्थळ वाका, पर्थ. ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका एदिसा. ऑस्ट्रेलिया ५० षटकांत ७ बाद २४९. श्रीलंका सर्वबाद १६८. श्रीलंकेचा अर्धा संघ मटकावणार्या गोलंदाजाचे पृथक्करण ७.२-०-२१-५. हा त्याचा पदार्पणाचाच सामना होता. एदिसा पदार्पणातच पाचाळी मिळविणारा टोनी डोडमेड हा पहिलाच गोलंदाज ठरला.कसोटी आणि एदिसा दोन्हीकडे पदार्पणातच पाचाळ्या मिळविणार्या टोनीला पुन्हा ९ कसोट्या आणि २३ एदिसा खेळूनही एकदाही पाचाळी मिळविता आली नाही. आपले पहिले चार कसोटी सामने तो वेगवेगळ्या देशांविरुद्ध खेळला होता – न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका आणि पाकिस्तान.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply