नाव अन्थनी असूनही ‘टोनी’ या नावाने जगद्विख्यात झालेल्या ‘टोनी ग्रेग’चा जन्म या तारखेला १९४६ मध्ये झाला. सध्या तो उत्साही आणि रंजक समालोचक म्हणून मैदाने गाजवितो आहे.
विल्यम ग्रेग हे स्कॉटलंडच्या भूमीशी नाते असणारे व्यक्तिमत्त्व टोनीचे पिताश्री होते. जन्म दक्षिण आफ्रिकेत होऊनही वडिलांच्या इतिहासामुळे आणि त्या काळच्या नागरिकत्वाच्या नियमांमुळे टोनी इंग्लंडकडून कसोट्या खेळण्यास पात्र ठरला. ६ फूट ७ इंच उंचीच्या टोनीच्या हातात बॅट म्हणजे एखादे आखूड खेळणे दिसे.
१९७२ मध्ये टोनीने कसोटीप्रवेश केला. १९७४ चा विंडीज दौरा त्याने गाजविला. पहिल्या कसोटी सामन्यात अल्विन कालिचरणच्या शतकाच्या जोरावर विंडीजने आघाडी घेतलेली असताना दिवसातील खेळाचा शेवटचा चेंडू बर्नार्ड ज्युलिअनने तटवून काढला आणि तो तंबूकडे परत निघाला. टोनी ग्रेगने चेंडू अडवून यष्ट्यांवर फेकला. नेम लागला आणि इंग्लिश संघाने धावबादचा आग्रह केला. बिनटोल्या आल्विन कालिचरण धावबाद दिला गेला…
झाले … जवळपास दंगा सुरू झाला प्रेक्षकांमध्ये. ते मैदानावर उतरले आणि निर्णय बदलविण्याची गळ घालू लागले. तांत्रिकदृष्ट्या पंच सँग ह्यू यांचा निर्णय बरोबर होता कारण त्यांनी खेळ संपल्याची घोषणा केलेली नव्हती. (खेळाचे प्रत्येक सत्र संपताना पंच तसे फलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना सांगतात. आता विट्या – बेल्स – त्यांच्या जागेवरून हलविण्याची किंवा खाली टाकण्याची प्रथा आहे.)
येऊया पुन्हा क्वीन्स पार्क ओवलवर …. त्या गडबडगोंधळात सर्व खेळाडूंना सुरक्षितपणे मैदानाबाहेर नेण्यात आले. त्यानंतर इंग्लिश संघाने आपला आग्रह मागे घेतला. कालिचरण पुन्हा खेळला. दुसर्या दिवशी आणखी १६ धावा काढून (एकूण १५८) तो बाद झाला. ही कसोटी इंग्लिश संघाने गमावली. टोनी ग्रेग आता हास्यास्पद ठरला होता…खेळाडू म्हणूनही तो या सामन्यात फारसा प्रभावी ठरला नाही.
पण टोनी तो टोनीच. आपली कृती ठरवून केलेली नव्हती हे त्याने ठासून सांगितले. मालिकेतील उरलेल्या चार्ही कसोट्यांवर त्याची अमीट छाप उमटली. ४७.७० च्या सरासरीने त्याने त्या ४ सामन्यांमधून ४३० धावा काढल्या, २४ गडी बाद केले (ऑफस्पिन तो नव्यानेच शिकला होता) आणि ७ झेल घेतले !! बार्बडोसमधील तिसर्या सामन्यात १४८ धावा, गुयानातील तिसर्या सामन्यात १२१ धावा. अखेरच्या सामन्यात ८-८६ आणि ५-७० अशी गोलंदाजी करताना त्याने इंग्लंडला विजयी करून मालिका बरोबरीत सोडविली.
पहिल्या सामन्यानंतर चेष्टेचा विषय झालेला टोनी ग्रेग मालिकेनंतर जगातील सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू ठरला होता. पुढे त्याने इंग्लिश संघाचे नेतृत्वही केले.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply