नवीन लेखन...

ऑक्टोबर ०७ – जहीर खान आणि सगळे एकेकदा बाद

७ ऑक्टोबर १९७८ रोजी महाराष्ट्रातील श्रीरामपुरात जहीर खानचा जन्म झाला. मुंबई हा क्रिकेटमध्ये सवतासुभा असल्याने तो वगळता महाराष्ट्रात जन्मलेला खेळाडू भारतीय संघात निवडला जाणे ही आता महामुश्किल बाब झाली आहे. महाराष्ट्राकडून खेळणार्‍या रणजीपटूंनी तर महाराष्ट्राकडून खेळणे म्हणजे राष्ट्रीय संघात निवड होणार नाही असे समजून चालण्यासारखेच आहे. जहीर मात्र महाराष्ट्राकडून कधीही खेळला नाही. तो खेळला मुंबई आणि बडोद्याकडून.

एका वेगवान गोलंदाजाला यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी सारी आयुधे जहीरजवळ आहेत. नवा चेंडू तो डुलवू शकतो आणि जुन्या चेंडूला उलटी डूल देऊ शकतो. त्याची अनेकदा वसिम अक्रमबरोबर तुलना झालेली आहे पण सध्यातरी फक्त मानसिक कणखरता ह्या एकाच बाबीच तो अक्रमतुल्य दिसतो.
नव्या वेगवान गोलंदाजांकडे असणारा आक्रस्ताळेपणा आणि मैदानावर नाचण्याची वृत्ती जहीरकडे नाही. फलंदाजाचा कच्चा दुवा हेरून तुटून पडायचे ही त्याची खासियत आहे. तळाच्या फलंदाजांचे गबाळ झटकन गुंडाळायला त्याचे बुंधे (यॉर्कर्स) फारच उपयुक्त ठरतात.

ऑक्टोबर २००० मध्ये जहीरचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले. २००३-०४ च्या हंगामात तो जायबंदी झाला. एक दुखणे बरे होता होता त्याला आणखी एक दुखणे झाले. पुनरागमन केल्यानंतरही दुखापतीमुळे त्याला पुन्हा क्रिकेटला मुकावे लागले.

२००६ मध्ये आपली फेकीपूर्वीची धाव कमी करून जहीरने पुनरागमन केले. वोर्सेस्टरशायरकडून त्याने हंगामात ७८ बळी मिळविले. संघभाऊंनी त्याचे नाव ठेवले झिप्पी झॅकी !

आजवर ७२ कसोट्यांमधून २४२ तर १७५ एदिसांमधून २४१ बळी जहीरने मिळविले आहेत. वेगाने धावा जमविण्याची क्षमताही त्याने वारंवार सिद्ध केलेली आहे. स्वतःला तंदुरुस्त राखू शकला तर जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक बनण्याची क्षमता त्याच्याजवळ नक्कीच आहे.

अगदी काटेकोरपणाने जरी बोलायचे झाले तरी चेंडूफळीचा खेळच असा आहे की, त्याच्यातील विक्रमांना आणि आकडेवारीला मर्यादाच नाही. सामना संपल्यानंतरही अनेक वर्षे त्याच्यातील विक्रमांचे विश्लेषण सुरू राहू शकते आणि कधी कधी अगदी शतकभराच्या खंडानंतरही त्याच्यातील विक्रम सुसंबद्ध ठरू शकतात.

७ ऑक्टोबर १९७९ रोजी कानपुरातील ग्रीन पार्कवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही कसोटी भारताने १५३ धावांनी जिंकली. जिंकण्यासाठी एका दिवसाच्या खेळात २७९ धावांचे आव्हान कांगारूंना मिळालेले असताना ते १२५ धावाच करू शकले.

खेळाच्या चौथ्या दिवसाखेर भारताच्या ८ बाद ३१० धावा झालेल्या होत्या. पाचव्या दिवशी सकाळी अकराव्या क्रमांकाचा फलंदाज दिलीप दोशी शून्यावर त्रिफळाबाद झाला. गोलंदाज होता ज्योफ डायमॉक.

डायमॉकने पहिल्या डावात ५ बळी मिळविले होते : सुनील गावसकर, गुंडाप्पा विश्वनाथ, करसन घावरी, शिवलाल यादव आणि एस वेंकटराघवन्‌.
दुसर्‍या डावात त्याने ७ गडी बाद केले : चेतन चौहान, दिलीप वेंगसरकर, यशपाल शर्मा, कपिल देव, सय्यद किरमाणी, दिलीप दोशी आणि पुन्हा शिवलाल यादव.

दोन्ही डावांचा विचार करता – म्हणजे एकाच कसोटीत – त्याने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना किमान एकदा बाद केले होते ! अशी कामगिरी करणारा डायमॉक हा कसोटिहासातील तिसरा आणि पहिलाच कांगारू खेळाडू ठरला.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..