पुणे मुंबई प्रवास करणार्या प्रत्येकाच्या मनाचा एक कोपरा दख्खनच्या राणीने व्यापलायं. दख्खनची राणी हे बिरूद मिरविणारी मुंबई-पुणे डेक्कन क्वीन आज (१ जून २०११ रोजी) ८१ वर्षांची झाली…कोळशाच्या जागी विजेवर धावणारे इंजिन जोडण्यात आले, प्रवासी संख्येबरोबर डब्यांची संख्या वाढत गेली, रंगसंगती बदलली.. आणि दिवसेंदिवस ही दख्खनची राणी तरूणच होत गेली… आज या तरूण राणीच वय ८१ झालं.. पण तिच्यावर प्रवासी अजुनही फिदा होतात..
डेक्कन क्वीन १ जून १९३० पासून खंडाळा घाटातून अप-डाऊन करीत मुंबई-पुण्याला जोडीत आहे. चंदेरी-निळ्या रंगसंगतीच्या सात डब्यांनी तिचा प्रवास सुरू झाला. भारतातील पहिली डीलक्स ट्रेन असलेल्या या गाडीची रंगसंगती आता पांढरी-निळी झाली असून डब्यांच्या संख्येतही १२ ने भर पडली आहे. ‘ग्रेट इंडियन पेनिन्स्युला रेल्वे’च्या (जीआयपीआर) सोनेरी इतिहासाची साक्ष देणार्या गाडीचा थाटमाट आजही कायम आहे.
आधी केवळ पहिल्या आणि दुसर्या वर्गाचे डबे या गाडीला जोडण्यात येत होते. १ जानेवारी १९४९ पासून पहिल्या वर्गाचे डबे बाद करून त्याजागी दुयार्या वर्गाच्या डब्यांचा दर्जा उंचावण्यात आला. थ्री टायर बैठक व्यवस्थाही प्रथम डेक्कन क्वीनपासूनच अस्तित्वात आली. गाडीचे मूळ डबे १९६६ मध्ये बदलून त्याऐवजी चेन्नई येथील ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’मध्ये बांधलेले ‘अॅन्टी टेलिस्कोपिक डिझाईन’चे डबे रूळांवर आणण्यात आले. मात्र दख्खनच्या राणीचा थाट किंचितही कमी झाला नाही. आता विजेच्या इंजिन जोडण्यात येणार्या या गाडीचे विद्यमान डबे १९९५ पासून जोडण्यात आलेले आहेत. एअर ब्रेक,खेरीज चेअर कार डबे, आधुनिक पेन्ट्री कार अशी अनेक वैशिष्टय़े या गाडीमध्ये आहेत. नोव्हेंबर २००३ मध्ये डेक्कन क्वीनला आयएसओ ९००१-२००० प्रमाणपत्र मिळाले आहे. काळानुरूप डेक्कन क्वीनमध्ये अनेक बदल झाले असले तरी गेल्या ८१ वर्षांपासून तिची मोहिनी किंचितही कमी झालेली नाही. त्याचप्रमाणे आजही ही गाडी
मुंबई-पुणे या राज्यातील महत्त्वाच्या शहरांदरम्यानचा प्रमुख दुवा मानली जात आहे..
दख्खनराणीच्या पोटात कुशीत
शेकडो पिले ही चालली खुषीत
मनाने खुरटी दिसाया मोठाली
विसाव्या तिसाव्या वर्षीही आंधळी
बाहेर असू दे ऊन वा चांदणे
संततधार वा धुक्याचे वेढणे..
या कवी वसंत बापट यांच्या काव्यपंक्ती सार्थ ठरवत या क्वीनने आज पर्यंत 34 वर्ल्ड रेकॉर्ड तयार केले आहेत. अशा प्रवाश्यांच्या लाडक्या क्वीनचा पुणे स्टेशनवर केक कापून वाढदिवस साजरा केला. डेक्कन क्वीन सोबतच उद्या शंभर वर्षे पूर्ण करणार्या पंजाब मेलचाही वाढदिवस आहे. पंजाब मेल 1 जून 1912 वर्षात सुरू झाली होती. इंग्रजांनी ही रेल्वे सुरू केली होती.
— स्नेहा जैन
Leave a Reply