९ ऑक्टोबर १९७६ हा दिवस प्रतिस्पर्धी संघांमधील दोन कसोटीपदार्पणवीरांसाठी अत्यंत संस्मरणीय ठरला. लाहोरात पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघांदरम्यान या दिवशी सुरू झालेला कसोटी सामना पाकिस्तानकडून पदार्पण करणार्या एका फलंदाजाने आणि किवींकडून पदार्पण करणार्या एका गोलंदाजाने गाजविला.पाकचा डाव ४ बाद ५५ असा अडखळलेला असताना १९ वर्षांचा जावेद मियाँदाद पहिल्यांदाच कसोटी डाव खेळण्यास उतरला आणि त्याने राजेशाही थाटात १६३ धावा काढल्या. आसिफ इक्बालसोबत त्याने पाचव्या जोडीसाठी २८२ धावा जोडल्या. वयाच्या चौतिसाव्या वर्षी याच कसोटीद्वारे पदार्पण करणार्या पीटर पेथ्रिकने अखेर जावेदला बाद केले. तो एवढ्यावरच थांबला नाही. पुढच्या सलग दोन चेंडूंवर त्याने वासिम रझा आणि इंतिखाब आलमला आल्या पावली परत पाठवत त्रिक्रम पूर्ण केला. इंग्लंडच्या मॉरिस अलमनंतर पदार्पणातच त्रिक्रम साधणारा तो दुसराच गोलंदाज ठरला. नियतीने मात्र दोघांच्या पदरात वेगवेगळी मापे टाकली. मियाँ जावेदसाहेबांनी आपल्या कारकिर्दीत ९,००० हून अधिक धावा जमविल्या. मिस्टर पीटर आणखी पाचच सामने खेळले.९ ऑक्टोबर १९८७ हा एकदिवसीय सामन्यांच्या चौथ्या विश्वचषकाचा पहिलाच दिवस होता. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज (गुजरांवाला) आणि भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (मद्रास) असे दोन सामने या दिवशी झाले. अलन लँबच्या समयोचित फटकेबाजीमुळे इंग्लंडने वेस्ट इंडिजचा पराभव केला. नऊ षटकांमध्ये विजयासाठी ८२ धावांची गरज असताना इंग्लंडची अवस्था ७ बाद १६२ अशी झाली होती. कोर्टनी वॉल्श ऐन भरात होता : ५-०-११-०. अलन लँब त्यावेळी कुणाच्या फारशा परिचयाचादेखील नव्हता. त्याने अंगात वीज संचारल्याप्रमाणे फलंदाजी केली आणि नाबाद ६७ धावा काढल्या. वॉल्शच्या शेवटच्या २७ चेंडूंवर तब्बल ५४ धावा ब्रिटिश फलंदाजांनी काढल्या. दो
न गडी राखून आणि तीन चेंडू शिल्लक असताना इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.तिकडे मद्रासमधील सामना मात्र याच्याहून अधिक रोमांचक झाला. कांगारूंनी निर्धारित ५० षटकांमध्ये २७० धावा काढल्या.
२ बाद २०७ अशी धावसंख्या असताना
गतविजेत्यांना ९५ चेंडूंमध्ये अवघ्या ६४ धावा काढायच्या होत्या. त्यांचा विजय जवळजवळ निश्चित होता. नवज्योतसिंग सिद्धू अत्यंत आक्रमक फलंदाजी करीत होता. सामन्याचे पारडे मात्र क्रेग मॅक्डरमॉटची गोलंदाजी आणि भारतीयांच्या ‘पळण्यामुळे’ फिरले; रॉजर बिन्नी आणि मनोज प्रभाकर धावबाद झाले, सिद्धू क्रेगकडून त्रिफळाबाद झाला आणि अखेर केवळ एका धावेने भारताला पराभव पत्करावा लागला. पन्नासाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर स्टीव वॉने मनिंदराचा मामा केला.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply