चांगली माणसे आजकाल दुर्मळ झाली आहेत, अशी सगळ्यांची तक्रार असते. अर्थात ही तक्रार करताना आपण तेवढे चांगले आहोत, आणि बाकीचे तेवढे नालायक आहेत, हा भाव मनात अंतर्भूत असतो. चांगल्या माणसांच्या दुर्मिळतेची तक्रार करणारे सगळेच जर चांगले असतील तर मग चांगली माणसे दुर्मिळ झाली आहेत, या तक्रारीत अर्थच उरत नाही. सांगायचे तात्पर्य माणसांचे चांगले अथवा वाईट असणे हे बरेचदा सापेक्ष असते. एखाद्यात काही वाईटपणा असेल तर त्याच्यातच काही चांगूलपणाही असतो, फत्त* त्याच्यातील कोणता गुण अधिक प्रकट होतो त्यावर तो वाईट की चांगला हे ठरत असते आणि यातही बरेचदा आजूबाजूची परिस्थिती, एखाद्याच्या संपर्कात येणारी माणसे आदी अनेक बाबींचा समावेश होतो. आपण लोकांशी मोकळ्या मनाने संवाद साधला तर आपल्या लक्षात येईल की बहुतेक लोक मूळात वाईट नसतातच. त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीला तोंड देताना किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या वाईट वृत्तीशी झगडताना त्यांना नाईलाजाने आपल्यातला चांगूलपणा बाजूला ठेवावा लागतो. मला कामानिमित्त खूप प्रवास करावा लागतो. कधी रेल्वेने तर कधी विमानाने हा प्रवास करताना साहाजिकच सहप्रवाशांशी हितगुज होते. प्रवासात माणसे खूप मोकळपणाने बोलतात. कदाचित कोणताही परिचय किंवा संबंध नसल्याने बोलण्यातून काहीही नुकसान होण्याची शक्यता नसते, हे त्यामागचे एक कारण असावे. प्रवास लांबचा असेल, कंटाळवाणा असेल तर वेळ घालविण्यासाठी सहप्रवाशांशी संवाद साधणे हा सर्वोत्तम उपाय असतो. काही लोक स्वत:हून संवाद साधण्यात फारसे उत्सुक नसतात, परंतु आपण पुढाकार घेतला तर ते बोलके होतात आणि मग अगदी धबधब्यासारखे कोसळतात. तेवढ्या चार-दोन तासांच्या प्रवासात हे लोक आपल्या इतक्या जवळ येतात की जणू काही ते आपले कुटुंबीयच आहेत, असे आपल्याला आणि अर्थातच त्यांनाही वाट
लागते. प्रवासात जवळ केलेल्या अशा कुटुंबीयांची खूप मोठी जंत्री माझ्याजवळ आहे.
या सगळ्या लोकांशी बोलताना एक
गोष्ट मला आवर्जून जाणवली आणि ती म्हणजे ही सगळीच माणसे मुळातून अतिशय प्रामाणिक आहेत. परिस्थितीनुरूप त्यांच्यात काही बदल घडले असले तरी ते अतिशय वरवरचे आहेत. त्यांचे मन मात्र अतिशय स्वच्छ आहे. समाजातील अन्यायाविरूद्ध त्यांच्यात चीड आहे, समाजातील वाईट प्रवृत्ती नष्ट व्हाव्यात असे त्यांना मनापासून वाटते. परंतु हे लोक सामान्य आहेत, काही करू शकत नाहीत आणि काही केले तरी त्याची दखल कुणी घेत नाहीत. अशावेळी या सामान्य लोकांच्या भावना समजून घेणारा, त्यांची भाषा समजणारा, त्यांच्यात रमणारा, त्यांच्यात मिसळणारा आणि स्वत:ला त्यांच्यातलाच एक म्हणवणारा कुणी नेता त्यांना मिळाला तर ते त्याला उचलून घेतात. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण निकाल समोर येण्यापूर्वीच सगळ्या पत्रकारांना एक ‘एसएमएस’ पाठवला. त्यात त्यांनी ‘मैं सीएम था, सीएम हूं और सीएम रहूंगा’ असे म्हटले होते. ‘सीएम’ याचा आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ ‘कॉमन मॅन’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. नरेंद्र मोदींना लागोपाठ दुसऱ्यांदा गुजरातच्या जनतेने मोठ्या फरकाने सत्ता सोपवली त्यामागची राजकीय विश्लेषणे काहीही असू देत, परंतु त्यांच्या या मोठ्या विजयासाठी त्यांच्यात दडलेला हा सामान्य माणूस कारणीभूत ठरला आहे, एवढे नक्की. मुख्यमंत्री म्हणून जवळपास सहा वर्षांच्या कारकिर्दीत मोदींवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. सत्तेचा वापर करीत त्यांनी संपत्ती गोळा केली नाही. त्यांनी स्वत: भ्रष्टाचार केला नाही आणि मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांनाही भ्रष्टाचारापासून परावृत्त केले. निवडणुकीच्या काळात त्यांच्या काही सहकाऱ्यांनी बंडखोरी केली त्यामागे हे
एक कारण असू शकते. प्रशासकीय कामकाजात सामान्य माणसाची अडवणूक होणार नाही, याची खबरदारी त्यांनी घेतली. विकासाच्या अनेक योजना राबविताना त्यांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचेल याची काळजी त्यांनी स्वत: घेतली. सांगायचे तात्पर्य मुख्यमंत्री असूनही त्यांनी आपल्यातला सामान्य माणूस मरू दिला नाही. या सामान्य माणसाच्या समस्यांची, त्यांच्या गरजांची त्यांनी नेहमी जाण ठेवली, आपण मुख्यमंत्री आहोत हा अहंभाव त्यांनी कधी बाळगला नाही आणि म्हणूनच ते ‘सीएम’ होते आणि ‘सीएम’ म्हणून कायम राहिले. आज मोदी यशस्वी राजकारणी ठरले असतील तर ते केवळ सामान्य माणसाशी त्यांनी आपली नाळ तुटू दिली नाही म्हणूनच. काही वर्षांपूर्वी एक हिंदी चित्रपट येऊन गेला. त्यातील नायक एका दिवसासाठी मुख्यमंत्री होतो आणि एकाच दिवसात एवढी कामे करतो की लोक त्याला पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी अक्षरश: रस्त्यावर उतरतात. तो सुरूवातीला नकार देतो, परंतु लोकांच्या हट्टापुढे त्याला हे पद स्वीकारावे लागते. नंतर तो चौकाचौकात लोकांच्या तक्रारी गोळा करण्यासाठी पेट्या ठेवतो. कुणाची कोणतीही तक्रार असली तरी त्याने ती त्या पेटीत टाकायची, त्या तक्रारीचा ताबडतोब सोक्षमोक्ष लावल्या जाईल अशी ती संकल्पना असते. या पेट्यांमध्ये ज्या दिवशी एकही तक्रार जमा होणार नाही, त्या दिवशी मी खऱ्या अर्थाने माझ्या पदाला न्याय देण्यात यशस्वी झालो असे समजेन, असे तो नायक म्हणतो. आणि एकदिवस असा उजाडतोच की त्या दिवसापासून पेटीत तक्रारी जमा होणे बंद होते. सामान्य लोकांशी अशाप्रकारे जुळवून घेणाऱ्या नेत्यांनाच लोक डोक्यावर घेतात. जे अशाप्रकारे सामान्यांचे होऊन राहतात तेच असामान्य ठरतात. समाजात जर काही चांगूलपणा शिल्लक असेल तर तो याच सामान्य लोकांमध्ये आहे. या लोकांना बोलते केले पाहिजे. त्यांच्याशी संवाद साध
णे गरजेचे आहे. लोक स्वत:हून बोलत नाहीत, पुढे येत नाहीत. सगळीकडे ‘पहिले आप’ हा प्रकार दिसून येतो. अशावेळी प्रत्येकाने ‘पहिले आप’ ऐवजी ‘पहिले मैं’ची भूमिका स्वीकारून संवाद साधायला सुरूवात केली तर एक चांगले वैचारिक मंथन समाजात सुरू होईल. या मंथनातून सर्वसामान्य माणसातला चांगूलपणा समोर येईल, त्याला विधायक आणि कार्यक्षम
स्वरूप देता येईल. सगळंच काही संपले आहे, असे नाही. खूप काही आणि
खूप चांगले अजूनही बाकी आहे. फत्त* ते सुप्त स्वरूपात आहे. हे चांगूलपण बाहेर काढावे लागेल. समाजात वाईटपणा असेल, वाईट प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात असतील तर त्याचा अर्थ एवढाच की त्या वाईट प्रवृत्तींमध्येच कुठेतरी सत्प्रवृत्ती दडल्या आहेत. वाईट प्रवृत्तींचा कचरा बाजूला सारून त्या सत्प्रवृत्तींपर्यंत पोहचता आले पाहिजे. संवाद हे त्यासाठी एक सर्वोत्तम माध्यम आहे. हिरे कोळशाच्या खाणीतच सापडतात, कमळ चिखलातच फुलते; प्रत्येक चांगली गोष्ट ही वाईटाच्या वेष्टनातच गुंडाळलेली असते. हे वेष्टन दूर करता आले पाहिजे. प्रवासात लोकांशी संवाद साधताना समाजात जीवंत असलेल्या या चांगूलपणाचा नेहमीच प्रत्यय आला. ही माणसे चांगली आहेत, फत्त* त्यांच्यातील चांगूलपणाला वाव मिळण्याची संधी समाजाने दिली नाही, हे लक्षात आले. अजूनही आशा आहेत आणि त्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत, एवढे नक्की!
— प्रकाश पोहरे
Leave a Reply