नवीन लेखन...

अनाकलनीय पण सत्य!




प्रकाशन दिनांक :- 05/09/2004

आयुष्य डोळसपणे जगताना मानवी स्वभावाचे अनेकविध कंगोरे पदोपदी अनुभवास येतात. अनेक वेळा एखादी व्यक्ती अशी का वागली, या प्रश्नाचे उत्तर प्रयत्न करूनही सापडत नाही. जर आपण सार्वजनिक जीवनात अधिक सक्रिय असलो तर असे अनुभव ही नित्याचीच बाब बनते. अगदी साध्या-साध्या घटनातून मानवी स्वभावाची ही अनाकलनीयता दृष्टीस पडत असते. कुठल्यातरी अनुदानातून शेतकऱ्यांना हजार-पाचशेच्या शेतीपयोगी वस्तू अर्ध्या किंमतीत मिळत असतात. त्या वस्तू प्राप्त करण्यासाठी गरीब शेतकरी आपल्या गावकुसातून तालुक्याच्या गावाला, पंचायत समितीत आठ-दहा चकरा मारतो. पटवाऱ्यापासून साहेबापर्यंत प्रत्येकाला पैसे खाऊ घालतो आणि येनकेनप्रकारे ती वस्तू, मग ती बियाण्यांची थैली , खताची गोणी किंवा साधे शिलाई मशिन असो आपल्या पदरात पाडून घेतो. वास्तविक कुठलाही खर्च न करता केवळ एका चकरेत त्याला ती वस्तू मिळायला पाहिजे. तो त्याचा हक्क आहे आणि तसा नियमही आहे; परंतु मधला सगळा सोपस्कार केल्याशिवाय आपल्याला ती वस्तू मिळणार नाही, या ठाम समजूतीतून तो शेतकरी एरवी शंभर रूपयात मिळणाऱ्या वस्तूसाठी दोनशे रूपये खर्च करून बसतो आणि अमूक साहेबामुळे माझे काम झाले, अशी कतज्ञता व्यक्त करायलाही विसरत नाही. ‘गरिबाला कुणीबी लुटते’, अशी ओरड एकीकडे करायची आणि दुसरीकडे एखादी वस्तू फुकट किंवा कमी किमतीत मिळते म्हटल्यावर सरकारी कार्यालयातला ‘चहा-पाण्या’चा खर्च करायचा, शेतकरी संघटनेला जर वर्षातून 50/- रु निधी मागितला तर कोण जीवावर आल्यासारखा तो चेहरा करणार या मानसिकतेला नेमके कोणते नाव द्यावे? कदाचित प्रत्येक व्यक्ती विचारांच्या बाबतीत नेहमी दोन भिन्न स्तरावर वावरत असावी. त्यापैकी स्वत:शी संबंधित असलेल्या पहिल्या स्तरावर तत्त्व; आदर्श, सिद्धान्त, वगैरेंना स्थान नसावे. त्या स्तरावर केव
स्वार्थ, फायदा, स्वत:चा अधिकाधिक लाभ किवा अज्ञान वा मजबुरी या बाबींचाच विचार होत

असावा.
दुसऱ्या स्तरावर, ज्याचा संबंध

इतरांशी येतो किवा जे जगाला दाखविण्यासाठी असते, तिथे मात्र तत्त्व, सिद्धान्त, आदर्शांची अगदी रेलचेल असते. स्वत:ला हानी पोहचत नाही किंवा आपल्या स्वार्थाला अडथळा निर्माण होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती वैचारिकदृष्ट्या नेहमीच दुसऱ्या (बाहेरच्या) स्तरावर असते, परंतु जिथे स्वार्थ साधायचा असतो तिथे मात्र तात्काळ गाडीचा ‘गिअर’ बदलावा त्याप्रमाणे विचारांच्या पहिल्या (आतल्या) स्तरावर येतात. हे अगदी यांत्रिकपणे घडून येते. ‘गरिबाला सगळेच लुटतात हो’, अशी ओरड करणारी मंडळी आपले काम असले की अगदी आनंदाने चिरीमिरी आणि वरून धन्यवाद द्यायला तयार होतात. मी प्रसिद्धीलोलूप नाही, मला प्रसिद्धीची हाव नाही, मी केवळ समाजसेवा म्हणून हे करतो, असे जाहीर सभेत सांगणारे महानुभाव संध्याकाळी प्रत्येक वृत्तपत्राच्या कार्यालयात दूरध्वनी करून कार्यक्रमाची बातमी जरा सविस्तर द्या, फोटो मोठा द्या, पहिल्या पानावर बातमी घेतली तर फार उपकार होतील, हे कळवायला विसरत नाहीत. एकूण काय तर साध्या शेतकऱ्यापासून ते अगदी मोठ्या नेत्यापर्यंत, प्रत्येकाच्या वागण्यात, प्रत्येकाच्या विचारात एकप्रकारचा तऱ्हेवाईकपणा, एकप्रकारची अनाकलनीयता दिसून येते.
आम्ही शेतकरी संघटनेत काम करीत होतो तेव्हाचा आमचा अनुभव असाच होता. कापसाला भाव मिळावा म्हणून आम्ही पोलिसांच्या विरोधात दंड थोपटून ‘सीमापार कापूस’ आंदोलन केले. त्यात फायदा शेतकऱ्यांचाच होता. संघटनेचा किंवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा त्यात कोणताच स्वार्थ नव्हता; परंतु एखादी संघटना चालवायची म्हणजे मनुष्य बळासोबतच आर्थिक बळाचीही तितकीच गरज असते. त्या उद्देशानेच मदत निधीच्या स्वरूपात रीतसर पावती देऊन शेतकऱ्याकडून द
हा-दहा रूपये गोळा करायचे ठरविले. हा पैसा आंदोलनात पोलिसी रोषाला बळी पडलेल्यांच्या केसेस कोर्टात लढण्यासाठी, संघटनेचे प्रचार साहित्य तयार करण्यासाठी आणि इतर तत्सम खर्चासाठी वापरला जाणार होता; परंतु सीमापार आंदोलनामुळे कापसाला भरभरून भाव मिळालेल्या शेतकऱ्यांनीही संघटनेला अल्पशी मदत करण्याचे टाळले. फार थोड्या शेतकऱ्यांनी संघटनेला फायद्या- तोट्याचा विचार न करता सहर्ष मदत केली. इतरांनी केली; परंतु नाना शंका उपस्थित केल्यात आणि बऱ्याच जणांनी तर चक्क पाठ फिरवली. संघटनेला दहा-वीस रूपयांची मदत करताना कां-कू करणारा शेतकरी एखाद्या खाकी डगलेवाल्याने साधे हटकले तरी मुकाटपणे शे-पाचशे काढून देतो. या मानसिकतेला तर्काच्या कोणत्या कसोटीवर तपासून बघायचे?
यवतमाळ परिसरात शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी यशस्वी आंदोलन छेडणाऱ्या ‘प्रहार’ संघटनेच्या प्रकाश बुटलंेचा अनुभवसुद्धा वेगळा नाही. आंदोलन यशस्वी झाले आणि शेतकऱ्यांना 1 लाखाची मदत मिळाल्या नंतर शेतकरी ‘प्रहार’ आणि प्रकाश बुटले या दोघांनाही विसरले. अगदी अलीकडील अनुभव सांगायचा तर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातला सांगता येईल. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा म्हणून देशोन्नतीने अगदी सुरूवातीपासून प्रयत्नांची पराकाष्ठा केली. विविध पातळीवर त्यासाठी संघर्ष केला. विरोधी पक्षनेत्यांनीसुद्धा देशोन्नतीची भूमिका उचलून धरली. या सामूहिक प्रयत्नांमुळेच शेतकऱ्यांनी वैचारिक कारणांमुळे आत्महत्या केल्या, या आपल्या आधीच्या भूमिकेवरून माघार घेऊन सरकारला शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची वस्तुस्थिती स्वीकारावी लागली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पुरेशी नसली तरी काही प्रमाणात मदतही मिळाली. मात्

ज्या शेतकरी कुटुंबांना अशी मदत प्राप्त झाली त्यांच्याकडून आपल्याला सरकारकडून मदत प्राप्त झाल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहचविण्याची तसदीही कुणी घेतली नाही. सरकारतर्फे तशी काही माहिती आमच्यापर्यंत पोहचविण्याचा अपेक्षा या नोकरशाहीप्रधान देशात बाळगणे मूर्खपणाचे ठरेल. अर्थात शेतकऱ्यांनी आमचे आभार मानावे किंवा सरकारने कौतुक करावे, हा आमचा उद्देश कधीच नव्हता. तशी अपेक्षाही आम्ही कधी बाळगली नाही. सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेपोटी आम्ही हे सगळे केले आणि यापुढेही आमची निरपेक्ष धडपड अशीच सुरू राहील. केवळ मानवी स्वभावाच्या अनाकलनीय पैलूवर प्रकाश टाकण्याच्या ओघात हे अनुभव विषद केले. असे अनुभव एखाद्या व्यक्तिविशेषाच्या संदर्भातच येतात, असे नव्हे तर हा स्वभावगुण (की

दोष?) बहुतेक सगळ्यांच्याच ठायी कमी-अधिक प्रमाणात असतो. दूधवाल्याने दुधाचा भाव लीटरमागे एका

रुपयानेही वाढविला की महागाईच्या नावाने कडाकडा बोटे मोडणारी सामान्य गृहिणी ‘शॉपिंग’ ला गेल्यावर मात्र हजार-पाचशेची फालतू खरेदी सहज करून जाते. दिवसभर पान गुटक्याचे रवंथ करणारी मंडळी भाजीपाल्याचे भाव दोन-चार रूपयांनी वाढले की तोंडातून पिचकाऱ्या टाकीत वाढत्या महागाईवर गंभीर चर्चा करताना दिसतात. केबल चालकाला दीड-दोनशे रूपये महिना उपकार केल्याच्या भावनेतून देणारी मंडळी रेल्वेत ऐनवेळी आरक्षण मिळविण्यासाठी टीसीला दोन-पाचशे रूपये सहज देऊन जातात. दुकानावर, प्रतिष्ठानावर धाड टाकण्याची धमकी देणाऱ्या सेल टॅक्स, इन्कम टॅक्स ऑफिसरला किंवा इन्स्पेक्टरला हजारो रूपये स्वखुषीने चारणारे व्यापारी त्यांच्या हितासाठी झगडणाऱ्या संघटनेला साधे नोंदणी शुल्क देण्याचे औदार्यही दाखवित नाही. कुठेतरी लावून द्या म्हणत, मला भेटायला येणाऱ्यांची संख्या कमी नाही. एखादी व्यक्ती खरोखर योग्यतेची वाट
ी की मी त्याच्या नोकरीसाठी शब्द टाकतो, बरेचदा माझ्या शब्दावर त्याला नोकरी मिळतेसुद्धा; परंतु अनुभव हा आहे की आपले काम झाल्यावर त्या व्यक्तीला माझी साधी आठवणही होत नाही. या उलट एखाद्याने पैसे घेऊन नोकरी लावून दिली तर मात्र ‘साहेबांनी पैसे घेतले; परंतु माझे काम केले’, असे म्हणत त्या पैसे घेणाऱ्या साहेबांच्या उपकाराचे नेहमीच स्मरण केले जाते. एखाद्यावर अन्याय झाला असेल आणि आपण वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्या अन्यायाला वाचा फोडली तर त्या व्यक्तीच्या लेखी ते वर्तमानपत्राचे कर्तव्य ठरते; परंतु त्याच व्यक्तीची एखादी बातमी चुकून प्रकाशित झाली नाही तर मात्र ती व्यक्ती या वर्तमानपत्रात बातम्या मॅनेज केल्या जातात, पैसे घेऊन बातम्या छापतात अशी गावभर बोंब मारते.
या सगळ्या अनुभवाचे सार काढायचे झाल्यास एवढेच म्हणता येईल की, मानवी स्वभाव ही एक अनाकलनीय बाब आहे. तर्काची कोणतीही कसोटी इथे लागू होत नाही. एखाद्या विशिष्टप्रसंगी एखादी व्यक्ती अशीच का वागली, या प्रश्नाचे तर्कसंगत उत्तर देता येणार नाही. एरवी प्रचंड उंचीची, कुवतीची, योग्यतेची माणसं एखाद्यावेळी मात्र अतिशय संकुचित मनोवृत्तीचे प्रदर्शन करून जातात. आयुष्यभर केवळ स्वार्थच साधणारी माणसे आयुष्याच्या शेवटी मात्र अविश्वसनीय त्याग करून जातात. स्वभावाची ही दोन्ही टोके प्रत्येक व्यक्तीत असतातच. प्रसंगपरत्वे ती उघड होत जातात, इतकेच. त्यामुळे कृतज्ञ व्यक्ती कधी कृतघ्न ठरली तर आश्चर्य वाटायला नको. मानवी स्वभावाच्या या वैशिष्ट्यांमुळेच तर वाल्याचा वाल्मीकी होऊ शकला. परस्परविरोधी विचारांची सरमिसळच मानवी स्वभावाचे अंगभूत वैशिष्ट्य आहे, हे एक वेळ लक्षात घेतले की एखाद्याच्या अनपेक्षित वागण्याचा धक्का बसणार नाही. एकूण काय तर प्रत्येक व्यक्तीत प्रेम-द्वेष, निष्ठा-प्रतारणा, स्वार्थ-त्याग,
कृतज्ञता-कृतघ्नता या परस्परविरोधी भावना सारख्याच प्रभावाने नांदत असतात. जीवन अधिक डोळसपणे जगता आले तर या स्वभावछटा अधिक सूक्ष्मपणे अनुभवास येतील. मानवी स्वभावाचे हे अंतरंग, स्थळ-काळ-वेळ-व्यक्तिपरत्वे बदलत जाणारे त्याचे विचार, त्याची वर्तणूक हे सगळे अनाकलनीय असले तरी माणसे परिस्थितीनुरूप बदलतात हे सत्य स्वीकारावेच लागेल.
‘भ्दल् म्र्ीहहदू ेूाज् ग्ह ूैग्ेा ग्ह ूप ेर्ीस ीग्नी’ हे बोधपर तत्त्वज्ञान सत्यच म्हणावे लागेल. एकदा भेटलेली व्यक्ती पुन्हा आपल्याला भेटते तेव्हा ती व्यक्ती आधी भेटलेलीच असेल, असे ठामपणे म्हणता येत नाही.किंबहुना आधीची व्यक्ती पुन्हा कधीच भेटत नाही, हेच सत्य आहे.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..