एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना परोपकाराची महती पटवून देताना इतरांना आपण कशा-कशाप्रकारे मदत करू शकतो, याची अनेक उदाहरणे सांगितली. बाळबोध विद्यार्थी ही महती ऐकून चांगलेच प्रभावित झाले. आपण परोपकार केलाच पाहिजे, असे त्या विद्यार्थ्यांच्या मनात ठसले. दुसऱ्या दिवशी एक विद्यार्थी थोडा उशिराच शाळेत आला. तो चांगलाच घामाघूम झालेला होता. शिक्षकांनी उशिरा येण्याचे कारण विचारले. विद्यार्थी म्हणाला,”तुम्ही काल सांगितल्याप्रमाणे आज मी एक परोपकार केला. एका आजोबांना रस्ता ओलांडायला मदत केली. त्यामुळेच शाळेत यायला उशीर झाला”, ”परंतु एवढे घामाघूम होण्याचे कारण काय”, शिक्षकांनी विचारले. त्यावर तो विद्यार्थी म्हणाला, ”मी प्रयत्न केला, परंतु त्यासाठी मला प्रचंड कष्ट पडले, त्यामुळेच मी घामाघूम झालो.” ”यात घामाघूम होण्यासारखे काय झाले”, शिक्षकांनी विचारले. त्यावर तो विद्यार्थी म्हणाला, ”मला परोपकार करायचा होता, परंतु त्या आजोबांनी प्रतिसाद दिला नाही. शेवटी मला जबरदस्तीने त्या आजोबांना रस्त्याच्या पलीकडे न्यावे लागले. त्या आजोबांना रस्ता पार करायचाच नव्हता, परंतु मला मात्र परोपकार करायचा होता, या सगळ्या गोंधळातच मला शाळेत यायला उशीर झाला आणि मी घामाघूमसुध्दा झालो.” हे ऐकून शिक्षकांनी कपाळाला हात लावला. शब्दांचे अर्थ किंवा त्या शब्दांमागची संकल्पना नीट समजून न घेता केवळ शब्दांचेच अनुकरण केले असता, काय गोंधळ होऊ शकतो, याचा बोलका प्रत्यय वरील उदाहरणातून स्पष्ट होतो. तो विद्यार्थी बाळबोध वृत्तीचा, लहान होता. शिक्षकांनी जे सांगितले त्यातील अर्थ समजून घेण्याची बौध्दिक कुवत त्याच्यात नव्हती, परंतु शहाणी म्हटली जाणारी, मोठी माणसे तरी शब्दांचे अर्थ नीट समजून घेतात का? शब्दांमागील संकल्पना अथवा त्या शब्दातून व्यक्त होणारा आशय समजून न घेता अनेकदा शब्
ांचा बाऊ केल्या जातो. निर्जीव शब्दामुळेच रक्ताचे पाट वाहतात. जातीचे निदर्शक असलेल्या शब्दांनी तर उभा भारत खंडित झाला आहे.
या देशात केवळ शब्दप्रामाण्य मानणाऱ्यांची
संख्या काही कमी नाही. देशातील प्रत्येक व्यक्तीची ओळख त्याच्या जातीचा संकेत देणाऱ्या शब्दाने निश्चित होते. वास्तविक व्यक्तीपेक्षा मोठ्या ठरलेल्या या जाती मुळात केवळ संकेतदर्शक शब्द आहेत. पूर्वी बरेचसे व्यवसाय वंशपरंपरेने चालत. ठाामीण भागात बारा बलुतेदारी होती. सुतारी, लोहारी, कुंभारी असे वेगवेगळे व्यवसाय गावातील वेगवेगळी कुंटुंबे करायची. वंशपरंपरेने तोच व्यवसाय केला जायचा. पुढे त्या कुंटुंबांची ओळख त्यांच्या व्यवसायाने होऊ लागली आणि त्या लोकांना एक नवे संबोधन मिळाले. कुणी सुतार म्हणून तर कुणी लोहार म्हणून ओळखला जाऊ लागला. फार पूर्वी समाजाची विभागणी ब्राह्यण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार प्रमुख गटात झाली होती. ही विभागणी गुण – कर्मानुसार होती, परंतु पुढे वंशपरंपरेच्या चक्रात अडकून या विभागणीला जातीचे बांधीव स्वरूप प्राप्त झाले. प्रामुख्याने शेतीव्यवसाय करणाऱ्याला या विभागणीत नेमके स्थान नव्हते. या चार वर्णात नसलेल्या कोणालाही शेती करण्याची मुभा असायची किंवा त्याच्यासाठी तोच एक पर्याय असायचा. या चार वर्णात नसलेला कुणीही शेतकरी व्हायचा. या ‘कुणीही’चे पुढे कुणी बी आणि त्याच्याही पुढे ‘कुणबी’ झाले असावे. याचाच अर्थ केवळ अपभ्रंशातून एक जात निर्माण झाली. पूर्वी जी व्यक्ती गावाचा कारभार पाहायची, अर्थात एक प्रकारे गावाचा स्वामी म्हणून ओळखली जायची, त्याला पाटील संबोधन होते. पुढे ती जात झाली. या पाटलाकडे गढी, जमीनजुमला असायचा. पुढे जे पाटील होते, परंतु ज्यांच्याकडे गढी किंवा इतर मालमत्ता नव्हती, जे गावाचे स्वामी नव्हते, त्यांना अस्वामी संबोधले जाऊ लागले. याच अस्वामीच
ा पुढे असामी असा अपभ्रंश झाला आणि असामी नावाची एक नवीच जात निर्माण झाली. कालांतराने केवळ संकेतदर्शक असलेले शब्द जातीचे निदर्शक ठरले. ही जात माणसापेक्षा मोठी झाली. माणूस त्याच्या गुणांपेक्षा जातीने अधिक ओळखला जाऊ लागला. जातीच्या भिंतीत माणुसकी बंदिस्त झाली. पुढे या जातींना उपजाती आणि पोटजातींच्या असंख्य शाखा फुटल्या. ओलिताची शेती करणारा माळी आणि त्यातही फुलांची शेती करणारा तो फुलमाळी. लोहारी काम करणारा लोहार, पुढे त्याची विभागणी गाडीचे काम करत असेल तर गाडीलोहार, खेड्यावरचा खात्यालोहार अशी झाली. पूर्वीची व्यावसायिक ओळख आता जातीची ओळख बनली. जातीची ही ओळख आता इतकी घट्ट झाली आहे की, व्यवसाय बदलले तरी जात कायम आहे. एखाद्या सुताराचा मुलगा डॉक्टर झाला तरी त्याची जात सुतारच असते. एखाद्या ब्राह्यणाने सलूनचा (ब्युटी पालर्र) व्यवसाय केला तरी तो ब्राह्यणच राहतो. मडके घडविणाऱ्या कुंभाराचा मुलगा इंजिनीअर होऊन मोठमोठ्या इमारती उभारू लागला तरी त्याच्या नावापुढची कुंभार ही जातीदर्शक ओळख बदलत नाही. फार पूर्वी गुणकर्मानुसार केवळ संकेतदर्शक असलेली ओळख आता जन्मानुसार निश्चित होणारी जात ठरली आहे. या जाती-उपजातीच्या विभागणीने समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या जातीभेदातूनच सामाजिक आणि आर्थिक विषमता जन्माला आली आहे. एकसंघ समाजनिर्मितीत मोठा अडसर असलेली ही जातीव्यवस्था नष्ट करण्याचे आजवर अनेक महात्म्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु या प्रयत्नांना यश तर आले नाहीच, उलट या महात्म्यांच्या नावाने नव्या जाती निर्माण झाल्या किंवा त्या समाजाने त्यांना त्यांच्या जातीपुरते मर्यादित केले.
आज आमची राजव्यवस्था धर्मनिरपेक्ष, पंथनिरपेक्ष, जातीनिरपेक्ष म्हणून ओळखली जाते. कायद्याने सगळ्यांना समान अधिकार दिला आहे. देशाचे पहिले नागरिक म्हणून ओळखल्या जाणाऱ
या राष्ट्रपतींपासून शेवटच्या माणसापर्यंत सगळ्यांचे संवैधानिक अधिकार सारखे आहेत, परंतु समाजातील जातीयतेची विषवल्ली अद्यापही कायम आहे. कायदा करून अथवा प्रबोधनाने ही जातीव्यवस्था नष्ट करता येईल, परंतु त्यासाठी समाजातील धुरीणांनी, राजकीय पुढाऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा. दुर्दैवाने सत्तेच्या राजकारणात मश्गूल असलेल्या नेत्यांना असा पुढाकार कधी घ्यावासा वाटलाच नाही. जातींचे अस्तित्व त्यांच्या राजकारणाचा आधार आहे. अपभ्रंशातून
आणि अपघाताने निर्माण झालेल्या जाती आणि त्या जातीमागील निव्वळ स्वार्थमूलक
भ्रम आज समाजाला विनाशाच्या उंबरठ्यावर घेऊन आला आहे. अशा परिस्थितीत जातींचा हा भ्रम तोडून निखळ सत्य समाजासमोर आदर्शरूपाने उभे करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ज्याकाळी व्यवसाय परंपरेने चालत होते, त्याकाळी त्या व्यवसायाचा केवळ संकेतदर्शक होणारा उल्लेख कदाचित उचित होता. तेव्हा लोहार लोहारीचे, कुंभार कुंभारीचे, सुतार सुतारीचे काम करीत होता. आज परिस्थिती तशी नाही. शिक्षण आणि स्वातंत्र्यामुळे व्यवसायाचे पारंपरिक स्वरूप नष्ट झाले आहे. त्यामुळे जातीची संकेतदर्शक ओळखही कायम ठेवण्याची गरज नाही. आता या सगळ्या जाती ‘भारतीय’ या एकाच महाजातीत विलीन करण्याची वेळ आली आहे.आज भारतातील कोणत्याही व्यक्तीला ‘आपण कोण?’ म्हणून ओळख विचारली तर तो आधी त्याची जात सांगतो. इंग्लंड, अमेरिका, जपानमध्ये मात्र कुठलीही व्यक्ती आपली ओळख ‘ब्रिटिश’,’अमेरिकन’ किंवा ‘जापनिज’ म्हणूनच करून देत. हा फरक खूप मोठा आहे. ‘आम्ही जपानी आहोत’ या एकाच भावनेने संपूर्ण देश प्रेरित झाल्यानेच जपानचा विकास अतिशय झपाट्याने झाला. मी जे काही करतो त्याचा माझ्या देशावर काय परिणाम होईल, याचा प्रत्येक जपानी माणूस आधी विचार करतो. आमच्याकडे मात्र आमचा विचार जातीची मर्यादित कुंपणे ओलांडायला
तयार नसतो. जातीची – उपजातीची ओळख कमी वाटते म्हणून की काय आम्ही आमची विभागणी भाषा आणि प्रांतानुसारही करून घेतली आहे. आम्ही मराठी असतो, पंजाबी असतो, गुजराती असतो, तामिळी असतो, ब्राह्यण असतो, मराठा असतो, अजून काय-काय असतो, परंतु या सगळ्या असण्यात आमच्या भारतीयत्वाला कुठेच जागा उरलेली नसते. जाती, प्रांत, भाषा ही विभागणी गाडून केवळ भारतीय हीच एक ओळख कायम करण्यात आम्ही यशस्वी झालो नाही तर एक दिवस या देशाचाही सोव्हिएत रशिया व्हायला वेळ लागणार नाही. आता सरकारनेच पुढाकार घ्यायला हवा. कायदा करून सगळ्या जाती कायमच्या निकाली काढायला हव्यात. राजकीय बेरीज-वजाबाकी थोडी बाजूला ठेवायला हवी. देशाची एकता, अखंडता आणि प्रगती राजकारणापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. हे समजून घेण्याची कुवत असणारे नेतृत्व आपल्याला लाभेल तो सुदिनच म्हणायला हवा.खरे तर असे नेतृत्व लाभण्याची वाट पाहण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांनी सक्रीय पुढाकार घेऊन आपल्यातूनच असे नेतृत्व उभे करायला हवे. माणसाला माणसापासून तोडणारे जातीचे हे भ्रमजाल उद्या देशाचेही तुकडे करू शकते. हा धोका सध्या उंबरठ्यावर आहे. उंबरठा ओलांडण्यापूर्वीच त्याचा नि:पात झाला नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाहीत. वैचारिक अपभ्रंशातून निर्माण झालेल्या भ्रमाची एवढी मोठी किंमत चुकविणे आपल्याला खचितच परवडणारे नाही.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply