देशाची सार्वभौमता अखंड राखणे ही कोणत्याही देशाची सर्वाधिक प्राथमिकता असते. ही अखंडता कायम ठेवण्यासाठी केवळ लष्करानेच दक्ष राहून चालत नाही आणि अलीकडील काळात तर लष्करापेक्षा राजकीय नेते आणि सर्वसामान्य जनतेनेच आपल्या देशाची सार्वभौमता अक्षय राखण्यासाठी अधिक दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे. लष्करी आक्रमण करून एखादा देश पादाक्रांत करणे आज जागतिक स्तरावरील बदलत्या परिमाणाच्या पार्श्वभूमीवर अगदीच अशक्य आणि कालबाह्य ठरले आहे. अमेरिकेसारख्या महासत्तेलादेखील ते शक्य नाही. परंतु साम्राज्यविस्ताराची लालसा किंवा स्वत:चे पोट भरले असतानासुध्दा दुसऱ्याची भाकर बळकाविण्याची वृत्ती मात्र कायमच आहे. त्यामुळेच लष्करी आक्रमणाला पर्यायी आणि तुलनेत कितीतरी पटीने अधिक प्रभावी ठरू शकतील असे मार्ग विविध देशांनी विशेषत: पुढारलेल्या पाश्चिमात्य देशांनी चोखाळायला सुरूवात केली आहे. भारतासारखा देश तर अशा राष्ट्रांसाठी ‘नरम आघात लक्ष्य’ (ेदिू ूर्ीीुाू) ठरत आहे. त्यामुळेच लष्करापेक्षा अधिक सावधानता या देशातील राजकारण्यांनी आणि सामान्य नागरिकांनी बाळगण्याची गरज आज कधी नव्हे इतकी प्रकर्षाने जाणवत आहे. सुप्त साम्राज्यवादी किंवा आक्रमक प्रवृत्तीच्या राष्ट्रांनी लष्करी आक्रमणाला शोधलेला पर्याय किती घातक आणि भारतासारख्या विकसनशील देशावर दूरगामी परिणाम करणारा आहे, हे हळूहळू स्पष्ट होत आहे. व्यापार, तंत्रज्ञान तसेच वैचारिक बुध्दिभेदाच्या माध्यमातून हे देश आपली साम्राज्यवादाची, आर्थिक शोषणाची भूक भागवित आहेत आणि हे अप्रत्यक्ष आक्रमण बंदुकीच्या जोरावर थोपविल्या जाऊ शकत नाही. या युध्दाचे मैदानच वेगळे आहे आणि त्या मैदानावर शत्रूचा नि:पात करण्यासाठी प्रखर राष्ट्रवाद, दृढ इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी ही शस्त्रेच परिणामकारक ठरू शकतात. परंतु सांप्रत आपल्या देशातील परिस्थिती अतिशय विचित्र आहे. राष्ट्राविषयीचा स्वाभिमान हे लष्करासाठीचे राखीव क्षेत्र समजल्या जात आहे. राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्य जनतेपर्यंत राष्ट्रवादाची प्रखरता अगदी निस्तेज झाल्यासारखी दिसत आहे. दिल्लीत पोलिसांनी दोन अतिरेक्यांना ठार केल्यानंतर, ही चकमकच बनावट होती, पोलिसांनी निशस्त्र लोकांना ठार केले, असा आरोप करणारा डॉक्टर आणि त्या आरोपाची गंभीर दखल घेणारे मानवाधिकार आयोगाचे सदस्य या राष्ट्राचेच नागरिक आहेत, हे दुर्दैव म्हणावे की अजून काही? सांगायचे तात्पर्य आपल्याला कायमचे पंगू बनविण्यासाठी वेगळ्या प्रकारची शस्त्रे घेऊन मैदानात उतरलेल्या शत्रूचा नि:पात करण्यासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रवादाच्या तलवारीची धार आज बोथट झाल्यासारखी वाटत आहे, ती तलवार पुन्हा तेजाने पाजळून प्रत्येकाने हाती घ्यायची वेळ आली आहे, आणि हे युध्द लढताना केवळ जोश दाखवून चालणार नाही, होशही ठेवावा लागेल. आक्रमण अनेक बाजूंनी होत आहे, आक्रमकांकडे बहुविध हत्यारे आहेत आणि बुध्दिभेद करण्याचे प्रचंड कसबदेखील, त्यामुळेच अतिशय दक्ष राहण्याची गरज आहे. बलाढ्य इंग्रज सत्तेला भारतातून हुसकावून लावण्यासाठी महात्मा गांधींनी शस्त्र म्हणून चरख्याचा वापर केला. त्यांच्या टकळीची आणि सुतकताईची तेव्हा भरपूर कुचेष्टा झाली, आजही होते. परंतु शत्रूच्या नेमक्या बलस्थानावर आघात करण्याची त्यांची दूरदृष्टी फार कमी लोकांच्या लक्षात आली. इंग्रजांचा जीव व्यापारात होता, विशेषत: कापडाचा व्यापार त्यांच्या ताकदीचा कणा होता. खादीच्या माध्यमातून हा कणाच मोडून काढला तर इंग्रज सत्ता कोलमडायला वेळ लागणार नाही शिवाय पारंपरिक पध्दतीने संघर्ष करून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मोजावी लागणारी प्रचंड प्राणहानीची किंमतही टाळता येईल, हा गांधीजींचा दृष्टिकोन चूक कसा म्हणता येईल? खरे तर गांधीजींनी चरख्याच्या माध्यमातून दिलेला विचार इतका मौलिक होता की, आजही त्याच विचाराची कास धरल्याशिवाय आपल्यासमोर दुसरा पर्याय नाही. राष्ट्रवाद किंवा देशभक्ती म्हणजे केवळ जमिनीच्या तुकड्यावरचे प्रेम नसते, तर ते त्या जमिनीत फुलणार्या संस्कृतीवरचे, जमिनीतून उपजणार्या प्रत्येक गोष्टीवरचे, त्या जमिनीतून पसरवणार्या विचारांवरचे प्रेम असते आणि या प्रेमाशी एकनिष्ठ राहणे हीच शत्रूचे कोणतेही आक्रमण थोपवून धरणारी ढाल ठरते. खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाच्या माध्यमातून आज आपल्या देशावरचे पाश्चिमात्य आक्रमण अधिक तेज झाले आहे. ढोबळ रूपाने या आक्रमणाचे जे पैलू किंवा परिणाम आपल्याला दिसून येत आहेत त्यापेक्षा कितीतरी पट अधिक गंभीर स्वरूप सूक्ष्म रूपाने होत असलेल्या आक्रमणाचे आहे. शत्रू समोर दिसत असेल तर त्याच्याशी युध्द करता येते, परंतु न दिसणार्या शत्रूचा मुकाबला कसा करता येईल? आपल्याच वेशात आपल्यात वावरण्याला कसे शोधता येईल? आज परिस्थिती नेमकी तशीच आहे. विदेशी वस्तूंनी, उत्पादनांनी येथील बाजारपेठा पर्यायाने अर्थव्यवस्था काबीज करायला सुरूवात केली आहे. स्वदेशी जागरण मंच किंवा आजादी बचाव आंदोलनसारख्या संघटना आपल्यापरीने या संदर्भात जनजागरण करीत आहेत. या संघटना करीत असलेले कार्य योग्य असले तरी या संघटनांचा रोख प्रामुख्याने शीतपेये, सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू किंवा साबणी इतर तांत्रिक वस्तू जसे टेलिफोन, घड्याळी, जोडे वगैरे आदी ढोबळ रूपाने समोर असलेल्या वस्तूंवर आहे. या वस्तूंमुळे फारसे नुकसान संभवत नाही आणि संभवत असले तरी या सगळ्या वस्तूंसाठी देशी पर्याय केव्हांही उभे राहू शकतात. बरेचदा तर अशी शंका येते की, उत्पादनाचा दर्जा वाढवून विदेशी वस्तूंशी स्पर्धा करण्याची हिंमत नसलेल्या उद्योजक वर्गाकडून या संघटनांचा वापर तर केला जात नसावा. सांगायचे तात्पर्य खरा धोका कुठून आहे हे ओळखण्याचे भान प्रत्येकाला असायला हवे. केवळ भिंती, दरवाजे शाबूत असले म्हणजे घर मजबूत नसते. भिंती, दरवाजे तसेच ठेवून संपूर्ण घर पोखरणार्या वाळवीचा बंदोबस्त आधी करावा लागतो. वाळवीचे आक्रमण सूक्ष्म असते, कळत नाही, दिसत नाही. घराचा संपूर्ण डोलारा कोसळल्यावरच ते लक्षात येते. या वाळवीसारखेच सूक्ष्म आणि अत्याधिक परिणामकारक आक्रमण आपल्या देशावर होत आहे. अशा विदेशी आक्रमणाला विरोध करणयार्यांची संख्या आधीच कमी आहे आणि त्यातील बरीचशी साबण, शीतपेयांशी लढण्यात गुंतून पडली आहे. गेल्या काही वर्षात आपल्या देशातील युवकवर्गात वाढलेले विविध ‘डे’ साजरे करण्याचे वेड लक्षणीय नाही का? वृध्दाश्रमांची संख्या का वाढत आहे, याचा कोणी विचार करतात का? इंग्रजीने हळूहळू राष्ट्रीय भाषेचा दर्जा पटकाविला आहे, हे कोणाच्या का लक्षात येत नाही? एवढेच नव्हे तर पारजनुक बियाण्यांच्या माध्यमातून इथली शेती, शेतकरी आणि उत्पादकता संपविण्याचा प्रयत्न आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली केला जातोय याची किती लोकांना जाणीव आहे? या न दिसणार्या सूक्ष्म आक्रमणाचे किती भयंकर परिणाम भविष्यात होऊ शकतील हे सांगणार्या जाणकाराचे म्हणणे ऐकायला किती लोकांजवळ वेळ आहे? बापूंच्या चरखा – टकळीची जशी कुचेष्टा झाली तशीच कुचेष्टा सध्या अशा लोकांच्या वाट्याला येत आहे. पाश्चात्त्यांनी बुध्दिभेदाचे अस्त्र किती प्रभावीपणे वापरले असेल त्याची कल्पना आपल्याला त्यावरून येऊ शकते. जे आधुनिक किंवा विकसित आणि तेही पाश्चात्त्य देशांकडून आलेले असेल ते चांगलेच असेल असे मानणारा फार मोठा वर्ग आपल्या देशात नांदत आहे. या वर्गाची अशी मानसिकता तयार करून पाश्चिमात्यांनी अर्धी लढाई आधीच जिंकली आहे. उर्वरित मूठभरांचा निष्फळ प्रतिकार मोडून काढणे त्यांना फारसे जड जाणार नाही. परंतु अद्यापही वेळ गेलेली नाही. आजही विदेशी आक्रमणाचे खरे स्वरूप ओळखून योग्य दिशेने प्रयत्न केल्यास बरेच काही साध्य होऊ शकते, त्यासाठी खरा राष्ट्रवाद आपल्या मनात जागला पाहिजे आणि कृतीतून उतरला पाहिजे. खरे तर निसर्गाने बहाल केलेली सर्वोत्तम संपत्ती, पूर्वजांच्या चिंतनातून निर्माण झालेली बौध्दिक समृध्दी आपल्याजवळ असताना आपण कोणाच्या दयेवर जगण्याचा प्रश्नच कुठे निर्माण होतो? आज आपल्या हजार समस्या असतील तर त्याची लाख उत्तरे देण्याची क्षमतासुध्दा आपल्यातच आहे. फक्त त्याची आपल्याला जाणीव नाही आणि जाणीव नाही म्हणूनच ही लाचारी आली आहे. पश्चिमेकडून येणारा वाराही सुखद मानणारी ही लाचारी आपल्याला टाकायलाच हवी.
युध्दाला प्रारंभ झाला आहे. खरे तर फार पूर्वीच झाला होता. आपल्या लक्षात आले. शत्रू थेट माजघरात घुसल्यावर. त्यामुळे आता शस्त्र हाती घेणे भाग आहे आणि आधीच म्हटल्याप्रमाणे या शस्त्राला प्रखर राष्ट्रवादाची धार असणे आवश्यक आहे. सोबतच शत्रू नेमका कुठे आहे, कोणता आहे हे ओळखण्याचा विवेकसुध्दा असणे आवश्यक आहे. अन्यथा आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी आपली गत व्हायची.
— प्रकाश पोहरे
प्रकाशन दिनांक :- 24/11/2002
Leave a Reply