नुकतीच अकोल्यात शिवधर्म परिषद पार पडली. हिंदूधर्माच्या पाखंडी जोखडातून मुक्त होऊन बहुजनांना स्वातंत्र्यांच्या अवकाशात विहरण्याची संधी मिळावी यासाठी शिवधर्म स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. शिवधर्माच्या स्थापनेचा मुहूर्त थोडा लांब असला तरी त्यादृष्टीने समाजाची वैचारिक आणि मानसिक तयारी अशा धर्मपरिषदांद्वारे करण्याचा प्रयत्न मराठा सेवा संघाकडून सुरु झाला आहे. जाचक रुढी-परंपरांच्या माध्यमातून हिंदू धर्म केवळ मुठभरांच्या हातातले बाहुले बनला असून, मोठ्या संख्येने असलेल्या बहुजनांना विकासाचा वावच या मुठभरांनी मिळू दिला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शिवधर्म परिषदेच्या प्रवर्तकांनी केलेल्या या आरोपात अजिबात तथ्यांश नाही, असे म्हणणे धाष्ट्यार्चे आहे. त्यामुळेच हिंदूमधील किंवा हिंदूधर्मातील दोष कुणी उघडकीस आणत असतील तर वस्तुस्थिती नाकारुन त्याला पाखंडी संबोधणे मुर्खपणा ठरेल. जातीव्यवस्थेतील विभागणी हा हिंदूधर्माचा सर्वात मोठा कच्चा दुवा आहे. या जातीव्यवस्थेनेच हिंदूधर्माच्या एकसंघतेला वारंवार तडे गेले आहेत. जाचक तसेच अन्याय रुढी-परंपरांनी हिंदू धर्मावर केलेले अतिक्रमण आज या धर्माच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करत आहे आणि दुर्देवाने आजही या रुढी- परंपरांपासून, सामाजिक विषमतेपासून स्वत:ला मुक्त करण्याचा प्रयत्न हिंदूधर्मियांकडून होताना दिसत नाही. तत्वज्ञानाच्या मुळ गाभ्याशी कुठलाही संबंध नसलेल्या या रुढी, या परंपरा, ही सामाजिक विषमता मुठभर लोकांच्या ऐहिक फायद्याची असेलही, परंतु त्यामुळे संपूर्ण हिंदूधर्मच आज विनाशाच्या काठावर उभा झाला आहे, हे नाकारुन चालणार नाही. हिंदूधर्माची ही अवस्था का झाली, या प्रश्नाच्या मुळाशी जातांना इतर धर्मासोबतचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक ठरतो. इस्लाम, जैन, बौ
्द, ख्रिश्चन या इतर धर्माच्या अनुयायांची जीवनपध्दती बघितली तर आपल्याला सहज दिसून येईल की, हिंदूधर्मियांच्या जीवनपध्दतीपेक्षा फार काही वेगळं त्यांच्यात नाही. इस्लाममध्ये नमाजला फार महत्व असते आणि हा नमाज विशिष्ट पध्दतीनेच अदा करावा लागतो किंवा पढावा लागतो. वजू (तीन वेळा हात,
पाय, तोंड धुणे), कयाम (उभे
राहणे), रुकू (बसनात बसणे), सिजदा (डोके टेकविणे) या नमाज अदा करण्याच्या क्रमवार पध्दती आहेत. या पध्दतींचा बारकाईने अभ्यास केला तर असे दिसून येते की, त्यामध्ये शारीरिक स्वच्छतेसोबतच योगा आणि प्राणायामाचासुध्दा अंतर्भाव आहे. शिवाय हा नमाज दिवसातून पाचवेळा अदा करावा, असा संकेत आहे. नमाजात केल्या जाणार्या या एकंदर क्रियाकलापांमुळे आपल्या धर्माबद्दलची आस्था वाढण्यासोबतच दुसराही महत्त्वाचा फायदा या लोकांना होतो. हृदयविकार, मधुमेहासारख्या व्याधी नियमित नमाज अदा करणार्यांमध्ये अभावानेच आढळून येतात. प्राणायाम आणि योगाचा खरा अर्थ आणि उपयोग तर या लोकांनाच उमगला. हिंदूधर्मियांमध्ये तर प्राणायाम कधी काळी केल्या जाणार्या पूजापाठात भटजीने सांगितल्यावर नाकाला बोट लावण्यापुरताच उरला आहे. उपवासाच्या संदर्भातदेखील तेच सांगता येईल. शरीर आणि मनातील अशुध्द गोष्टींचे निराकरण करण्यासाठी उपवास केला जातो आणि खरा उपवास कशाला म्हणतात, हे जाणून घ्यायचे असेल तर रमजानच्या महिन्यात रोजे पाळणार्या एखाद्या इस्लामधर्मियाला भेटा. ते लोक काही खाणं-पिणं तर दुरच राहिलं, सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत अगदी थुंकीसुध्दा गिळत नाही. आमच्यासाठी उपवास मात्र खाण्याच्या पदार्थातील बदल यापलिकडे काही नाही. शरीर-मनाची सात्विकता आणि उपवास यामध्ये कुठलाही संबंध आम्ही ठेवला नाही. इस्लाममध्ये जकात नामक प्रकारसुध्दा आवश्यक धर्मकृत्य मानले जाते. आपल्याकडील दानपर
ंपरेशी साधर्म्य असणाराच प्रकार आहे. आपल्या एकूण उत्पन्नाच्या अडीच टक्के रक्कम गरीब, गरजू असलेल्या जवळच्या नातेवाईक, शेजारी किंवा गाववाल्याला देणे म्हणजेच जकात देणे इस्लाममध्ये बंधनकारक आहे. आधीच श्रीमंत असलेल्या देवस्थानात दानाच्या रुपाने लक्षावधी रुपयांची उधळण करण्यापेक्षा हा प्रकार नक्कीच श्रेष्ठ म्हटला पाहिजे. पवित्र हज यात्रा हा सुध्दा प्रत्येक इस्लामधर्मियांच्या आयुष्यातला एक आवश्यक उपचार आहे. स्वत:वरील कौटुंबिक जबाबदार्या पूर्ण करुन, असलेच तर कर्ज फेडून आणि इतरांसोबत असलेल्या मतभेदांना, दुराव्यांना मुठमाती देत हज यात्रेला रवाना व्हावयाचे असते. आपल्या धर्मातील वानप्रस्थ संकल्पनेशी सांगड घालणारीच ही प्रथा आहे. परंतु वानप्रस्थ स्वीकारुन निवृत्त जीवन जगण्याची कल्पना हिंदूधर्मातून केव्हाच हद्दपार झाली आहे, तर दुसरीकडे लाखो इस्लाम धर्मीय दरवर्षी हज यात्रेचे पावित्र्य आपल्या गाठी बांधताना दिसत आहे. इस्लामधर्मियांमध्ये धर्माभिमान कडवा असतो. यामागचे मुख्य कारण हेच आहे की, नमाज, रोजा, जकात किंवा हज या सारख्या वैयक्तिक किंवा सामाजिक जीवन समृध्द करणार्या प्रथा किंवा नियम इस्लामशी बांधिलकी राखून आहेत. या प्रथा किंवा नियम उपचार म्हणून पाळल्या जात नाहीत तर ते एक धार्मिक कर्तव्य समजले जाते. आपल्या धर्माने दिलेली देण म्हणून त्याकडे पाहिले जाते. या उलट परिस्थिती हिंदू धर्मात दिसून येते. हजारो वर्ष ज्ञान ग्रहण करण्याचा अधिकार एका जातीपुरताच मर्यादित ठेवून हिंदूनी आपला धर्म एका लहानशा वर्तुळात बंदिस्त करुन ठेवला. प्रथा, परंपरामागील शास्त्रीय दृष्टी बहुजनांपर्यंत पोहचविण्याऐवजी देव-देवतेंचे अवडंबर माजवून हे असे कां? अशी विचारणा करणारी बहुजनांची चिकित्सक दृष्टीच मारुन टाकली. त्यामुळे धर्माचा आणि पर्यायाने धर्माच
या अभिमानाचा स्पर्शच बहुजनांना झाला नाही. धार्मिक स्वातंत्र्य त्यांना मिळाले नाही, सामाजिक न्याय त्यांना नाकारला गेला आणि म्हणून आज सातत्याने नाकारल्या गेलेल्यांनी बंडाचे निशाण फडकावले. 1956 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. तत्पूर्वी बाबासाहेबांनी हिंदू धर्म मार्तंडांना शुद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्यण अशी उभी तसेच विषम मांडणी नष्ट करण्याची सुचना केली होती. त्याऐवजी या चारही वर्णांना एक समांतर दर्जा द्यावा अशी अपेक्षा बाबासाहेबांनी व्यक्त केली होती. पूर्वीच्या आणि आताही कायम असलेल्या व्यवस्थेत वरच्या मजल्यावरील नालायकाला केवळ त्या वर्णात जन्मला म्हणूनच उच्च वर्णीय समजले जायचे त्याच्या पतनाचाही सन्मान व्हायचा. खालच्या वर्णातील गुणोत्तम व्यक्तीला विकासाचा किंवा वरच्या मजल्यावर जाण्याचा कोणताच मार्ग नव्हता. जीना नसलेली ही
इमारत जमीनदोस्त करून सर्व वर्णांना एक समान दर्जा देण्याची बाबासाहेबांची
मौलिक सुचना त्यावेळी मान्य केल्या गेली असती तर कदाचित आज बौध्द धर्मिय म्हणवून घेणारा मोठा भाग हिंदू धर्मातच राहिला असता आणि नंतरही धर्मांतराचे संकट हिंदू धर्मापुढे कधी उभे ठाकलेच नसते. परंतु तसे घडले नाही आणि बाबासाहेबांनी दिलेल्या जबर धक्क्यानंतरही हिंदू धर्माच्या मुखडांनी आपली वृत्ती बदलली नाही. आजही धर्माचे तत्वज्ञान, रूढी आणि परंपरा काह विशिष्ट वर्गाच्याच हातचे बाहुले बनल्या आहेत.
वास्तविक हिंदू धर्माचे तत्वज्ञान किंवा हिंदू धर्माने दिलेला विचार पूर्णांशाने नाकारुन कोणताच धर्म उभा राहू शकला नाही किंवा शकत नाही. त्यासंदर्भात इस्लाममधील प्रथा, नियमांचे विवेचन सुरवातीला केलेच आहे. याच कडीमध्ये बौद्ध, जैन धर्माच्या विचारांचा, नियमांचासुध्दा उल्लेख करता येईल. अह
ंसा परमोधर्म, दयाभाव, अनेकांतवाद, सर्वांना जीवन जगण्याचा समान अधिकार हा जैनाच्या तत्वज्ञानाचा पाया आहे. हे संपूर्ण तत्वज्ञान हिंदूधर्मातील तत्वज्ञानाशी नक्कीच कुठेतरी जुळले आहे. दिगंबर-श्वेतांबर हा पंथवाद जैनातही आहे, परंतु धर्मांतराचे संकट जैनांसमोर कधीच आले नाही कारण जैनांनी आपले तत्वज्ञान विचार आणि आचारासह शेवटच्या जैन व्यक्तीपर्यंत पोहचविले. साध्या-साध्या गोष्टीतून धार्मिक तेज जपण्याचे कार्य त्यांनी केले. जैन लोक सुर्यास्तानंतर पाणीही पित नाही; आवश्यक ठरले तर ते उकळून आणि गार करुन पितात. प्रत्येकाला झेपेल त्याप्रमाणे उपवास केले जातात. त्यांचे पर्युषण पर्व आत्मविवेचनाचे साधन असते. मनातील राग, द्वेष, वैरभाव या पर्वात नाहिसा केला जातो. मानसिक शुध्दीसोबतच उपवासाने शारीरिक शुध्दीदेखील साधली जाते. शरीर आणि चित्ताच्या शुध्दीला जैनधर्मात विशेष महत्व आहे. जैन मुनी तर आंघोळ सुध्दा करीत नाही. मन शुध्द असेल तर शरीर अस्वच्छ होईलच कसे, हा तर्क त्यामागे आहे. भगवान पुनर्जन्म घेत नाहीत, अशी त्यांची धारणा आहे आणि जे शरीराने, चित्ताने शुध्द झाले ते भगवान झाले, अशी त्यांची मान्यता आहे. जैन लोक जमिनीखालचे कंद खात नाहीत, जेवणानंतर ताट धुऊन पितात आणि सुर्यास्तानंतर जेवण घेत नाहीत. हे सगळे नियम शरीर तसेच चित्तशुध्दीसाठी पाळले जातात. परंतु या नियमांना धार्मिक आधार दिल्यामुळे प्रत्येक जैन व्यक्ती या नियमांचे पालन करताना; आपण जैन असल्याचा सार्थ अभिमान बाळगते. बौध्दधर्मियांची पंचशील तत्वेदेखील काही वेगळी नाहीत. जैन असो अथवा बौध्द किंवा इस्लाम, या धर्मांचे हिंदुधर्मांपेक्षा वेगळे एक खास वैशिष्ट हे आहे की, या धर्मांच्या विचार-आचार व तत्वज्ञानाचे दरवाजे शेवटच्या माणसासाठीदेखील खुले आहे. त्यामुळे कुणी बंड करुन उठत नाही, कुणाचे अधिकार डावलल्य
जात नाही. रुढी-परंपरा कुणाला कैदेसारखी वाटत नाही. हिंदूधर्माचे तसे नाही. एका विशिष्ट वर्तुळातच सतत घुटमळत राहिल्याने हिंदू धर्म गंगेतल्या गोट्यासारखा गुळगुळीत झाला. व्यवसायानुसार ठरलेल्या जाती पुढे वैयक्तिक अहंकाराच्या चक्रात अडकल्या. जातीमधील भेदभाव, उच्च-निचतेची कल्पना जाणिवपूर्वक जोपासल्या गेली. शास्त्रीय आधारावर उभे असलेले नियम अशास्त्रीय लोकांच्या हाती पडून जातीव्यस्थेच्या भिंती अधिक मजबूत करु लागले. अशा परिस्थीतीत मानवा-मानवामध्ये विषमतेच्या विषवल्ली जोपासणार्या, धर्माच्या अखंडतेचे जातीच्या तुकड्यात विभाजन करणार्या प्रवृत्तींना धडा शिकविण्यासाठी मत्सर अहंकाराला उखडून कुणी जातीकडून धर्मांकडे प्रवास करु इच्छित असेल तर त्याला रोखणार तरी कसे? बाबासाहेबांनी 1956 साली दिला तो पहिला इशारा होता. परवा शिवधर्म परिषदेच्या निमित्त्याने आणखी एक इशारा हिंदूधर्माला दिला गेला. या इशार्यांची योग्य दखल घेतल्या गली नाही तर आपल्या तत्वज्ञान आणि समृध्द सांस्कृतिक वारश्यासह हिंदूधर्माचा बालेकिल्ला ढासळायला वेळ लागणार नाही.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply