नवीन लेखन...

उफराटा प्रवास!





‘असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय’, अशी वेदातील प्रार्थना आहे. असत्याकडून सत्याकडे, अंधकारातून प्रकाशाकडे, मृत्यूकडून अमरत्वाकडे आम्हाला घेऊन चल असा त्या प्रार्थनेचा ढोबळ अर्थ. वेदातील प्रार्थना असो, उपनिषदातील तत्त्वज्ञान असो, पुराणाचे सार असो किंवा परंपरेने चालत आलेले विचारप्रवाह असो, आमच्या पूर्वसुरींचे समस्त चिंतन मनुष्याच्या उन्नतीला एक निश्चित दिशा देणारे होते. अर्थात हे सगळेच चिंतन आज आणि तेव्हाही सर्वस्वी उपयुक्त होते असे म्हणता येणार नाही. काळाच्या प्रवाहात अनेक गोष्टी संदर्भहीन ठरतात, अनेक विचारही टाकाऊ ठरतात, ते सोडूनच द्यायला हवेत. परंतु ‘जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळुनी अथवा पुरुनी टाका’ असेही करता येणार नाही. बरेचदा जुने ते सोनेसुद्धा ठरू शकते. सोन्यातही हीणकस पदार्थ असतात, परंतु तेवढ्यासाठी कुणी सोने टाकून देत नाही. जे टाकाऊ आहे, संदर्भहीन ठरले आहे, ते वगळून चांगले तेवढे स्वीकारीत पुढे चालायला हवे. जुन्या-जाणत्यांनी सांगून ठेवले ते सगळेच ‘बाबा वाक्य प्रमाणम्’ या न्यायाने स्वीकारायचे नसले तरी काही सार्वकालिक मोलाच्या गोष्टी या जुन्या जाणत्यांनी सांगितल्या आहेत, त्यांचे महत्त्व कमी ठरत नाही. जुन्या काळाची तुलना आजच्या वेगवान आणि अतिप्रगत काळाशी होऊ शकत नसली तरी काही विचार, काही मूल्ये, काही संकल्पना कालातीत असतात. काळाचा संदर्भ बदलला तरी त्यांच्या उपयुक्ततेत फारसा फरक पडत नाही. उलट बरेचदा ज्या काळात हे विचार सांगितले गेले होते त्या काळापेक्षा वर्तमान काळात त्यांचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवते. गाडगेबाबांसारखा व्यवहारिक किंवा लौकिक ज्ञान नसलेला मनुष्य जर ‘कर्ज काढून सण साजरे करू नका’ असे सांगत असेल तर त्यांच्या बौद्धिक पात्रतेची चिकित्सा करून त्यांचे म्हणणे हास्यास्पद ठरवि
्याचा प्रयत्न आपल्यालाच हास्यास्पद ठरवून जातो. अनुभवाने सिद्ध झालेले ज्ञान कोणत्याही विद्यापीठाच्या पदवीचे मोहताज नसते. परंतु अलीकडील

काळात जुने ते सर्व टाकाऊ

ठरविण्याची जणूकाही फॅशनच आली आहे. सगळं जुनं मोडीत काढून नव्याची प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न होत आहे. दुर्दैवाने या मोडीत काढण्याच्या उपक्रमात जुने परंतु चांगले विचारही नष्ट होत आहेत. पूर्वीच्या काळी कर्ज हे एखादे पाप करीत असल्याच्या भावनेनेच घेतले जायचे. अगदीच अपरिहार्य परिस्थितीत कर्ज घेत असत आणि जोपर्यंत हे कर्ज डोक्यावर आहे तोपर्यंत कर्जदाराला स्वस्थ झोप लागत नसे. त्या काळची जीवनशैलीच अशी होती किंवा शिकवणच अशी होती की प्रत्येकजण आपले अंथरुण पाहून हातपाय पसरायचा. आवक आणि जावकचा ताळेबंद कधी ऋण संख्येत जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जायची. कधीकाळी अपरिहार्य कारणांमुळे कर्ज किंवा उधार-उसनवारीचा प्रसंग आलाच तर आपल्या गरजा शक्य होतील तितक्या कमी करून हे कर्ज अठाक्रमाने फेडले जायचे. ऋण काढून सण साजरे करणाऱ्या मानसिकतेला तेव्हा समाजात स्थान नव्हते किंवा प्रतिष्ठा नव्हती. कर्जाच्या वसुलीसाठी सावकार किंवा सावकाराचा माणूस दारात येणे म्हणजे प्रचंड मानहानी समजली जायची. गाव-पाड्यात तो चर्चेचा विषय ठरायचा. कर्जाचा परिणाम काय होतो, कर्ज काढणाऱ्याची गत अखेर काय होते, याचा अनुभव घेतलेल्यांनी आपल्या पुढच्या पिढींना कर्ज काढू नका, असे अगदी बजावून सांगितले. आज मात्र परिस्थिती साफ बदलली आहे. पूर्वी कर्जाचा संबंध अप्रतिष्ठेशी होता, आता कर्ज प्रतिष्ठेची बाब ठरली आहे. जीवनशैलीच बदलली आणि हा बदल केवळ राहणीमानातला, खाण्यापिण्यातला नाही तर विचारातलासुद्धा आहे. एकवेळ उपाशी राहू परंतु कर्ज काढणार नाही, असे म्हणणारी पिढी केव्हाच अस्तंगत झाली आहे. आजची पिढी तुपाशी खाण्याचे च
चले करणारी आहे आणि त्यासाठी कर्ज काढावे लागत असेल तर त्यात काही वावगे आहे असे या पिढीला वाटत नाही. पूर्वी कर्जबाजारी माणसाकडे तुच्छतेने पाहिल्या जात असे, आता ज्याच्या डोक्यावर कर्ज नाही, ज्याच्या पगारातून बँकेचे हप्ते कापल्या जात नाही, अशा माणसाला गरीब बिचारा म्हणून हिणवले जाते. एखाद्याने कर्ज घेतले आणि ते व्यवस्थित फेडले तरी तो गरीब बिचाराच ठरतो. खरा पुरुषार्थ तर कर्ज घेऊन ते बुडवण्यात आहे. आता कोणी अंथरुण पाहून हात-पाय पसरायचा विचार करीत नाही. आधी हात-पाय पसरले जातात आणि नंतर अंथरुणाची सोय केली जाते. बरेचदा अशी सोय करताना वाम मार्गाचा अवलंब करावा लागतो, परंतु त्याचेही कोणाला काही वाईट वाटत नाही. वाढत्या गरजा आणि प्रामाणिक कष्टातून होणारी कमाई याचे समीकरण जुळणे कठीण झाले आहे. हे समीकरण जुळविण्यासाठी एक तर गरजा कमी करायला हव्यात किंवा प्रामाणिकपणाला तिलांजली देऊन गैरमार्गाने कमाई करायला हवी. बहुतेक लोक दुसरा पर्यायच निवडतात आणि बहुतेकांचा हा मार्गच बहुमतामुळे प्रतिष्ठेचा, योग्य ठरतो. एखादी व्यक्ती गरजा कमी करून प्रामाणिक कमाईतच संतोष मानत असेल तर ती व्यक्ती ‘बिच्चारी’ ठरविली जाते. जे कर्जाच्या बाबतीत तेच व्यसनांच्या बाबतीत. पूर्वीच्या काळी व्यसनाला आणि व्यसनी व्यक्तीला समाजात स्थानच नव्हते. आता मात्र निर्व्यसनी माणूस नालायक समजला जाण्याइतकी आमची प्रगती झाली आहे. एखादी व्यक्ती कर्जबाजारी नसेल, व्यसनी नसेल, तर त्या व्यक्तीचे आयुष्य आजच्या परिभाषेत निरर्थकच समजायला हवे. खुद्द आमचे सरकारच दारूला प्रोत्साहन देते, हातभट्टीची पिऊ नका, आम्ही तुम्हाला देशी दारू पुरवू असे आश्वासन देते. शीतपेये आणि वाईन या सख्ख्या बहिणी असल्याचे आमच्या नेत्यांचेच मत आहे. ‘ड्रिंक’ घेणे जिथे प्रतिष्ठेचे समजले जाते तिथे व्यसनांना व्यसन कोण म्हणणार?
सत्याकडून सत्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याची प्रार्थना करणारे आमचे पूर्वज आमचा हा थेट उफराटा प्रवास पाहून नक्कीच धन्य होत असतील. काळाच्या ओघात जीवनशैलीत बदल होणे स्वाभाविक आहे. परंतु हा बदल चांगल्याकडून अधिक चांगल्याकडे व्हायला हवा. तसा तो असेल तरच स्वागतार्ह ठरतो. आम्ही जो

बदल स्वीकारला आहे तो स्वागतार्ह खचितच नाही. जग प्रचंड

वेगवान झाले आहे, प्रत्येक क्षेत्रात अतिशय तीप आणि जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. जगणेच आव्हान ठरू पाहात आहे. अशा परिस्थितीत आपल्या गरजा जितक्या न्यूनतम पातळीवर आणता येतील तेवढ्या त्या आणायला हव्या. शिखर गाठायचे असेल तर पाठीवर कमीत कमी ओझे असावे लागते. प्रगती करायचीच असेल तर आधी आपल्या अपेक्षांचे ओझे कमी करावे लागेल, परंतु तसे होताना दिसत नाही. प्रत्येकाच्या अपेक्षा आवाक्याची चादर फाडून बाहेर डोकावत आहेत. या अपेक्षा पूर्ण करायला उफराटी धावाधाव प्रत्येकजण करतो आहे. त्यासाठी नको त्या तडजोडी केल्या जात आहेत. भ्रष्ट मार्गांचा अवलंब होतो आहे आणि या सगळ्यांचाच परिपाक म्हणून शेवटी प्रत्येक माणूस प्रचंड अस्वस्थ आणि दु:खी झालेला दिसतो आहे. अनुभवाच्या तप:सामर्थ्याने सिद्ध झालेल्या विचारांशी आधुनिकतेच्या नावावर आम्ही घेतलेली फारकतच आमच्या या अवस्थेला जबाबदार म्हणता येईल. दिशादर्शक हरवलेत किंवा त्यांच्याकडे आम्ही साफ दुलर्क्ष केले आणि आमचा दिशाहीन उफराटा प्रवास सुरू झाला. हा प्रवास तर आहे, परंतु या प्रवासाला थांबा कुठेच नाही. स्पर्धा तर आहे, परंतु ध्येय नाही. पैसा आहे, सुख नाही. जे असायला हवे तेच नाही आणि काय मिळवायचे त्याची कुणाला कल्पना नाही. सगळाच प्रवास उफराटा!

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..