नवीन लेखन...

एक चांगली सुरुवात





जगणे हा अपघात आहे, ती एक कला आहे की नुसतेच एक रहाटगाडगे आहे, यावर मतमतांतरे असू शकतात. जन्माला आलोच आहोत तर मरण येईपर्यंत जगणे भाग आहे, या मताचे बरेच लोक असतात आणि त्यांच्या जीवनात अर्थातच सौंदर्यदृष्टीला फारसे महत्त्व नसते; परंतु जगण्याचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. परिस्थिती कशीही असो, जीवनात आनंद निर्माण करण्याची, जीवनात आनंद शोधण्याची त्यांची ऊर्मी कायम असते. या लोकांजवळ चांगली सौंदर्यदृष्टी असते आणि ती केवळ त्यांच्यापूरती मर्यादित नसते. आपण, आपले घर, आपला परिसर, आपले शहर, आपला देश सुंदर असावा असे त्यांना वाटत असते आणि आपल्यापरिने ते त्यासाठी प्रयत्नही करत असतात. असे म्हणतात की या जगाला स्वस्थ, सुंदर, निकोप बनवायचे असेल तर फार काही करण्याची गरज नाही. प्रत्येकाने स्वत:पूरता स्वच्छ, सुंदर, निकोप बनण्याचा निश्चय केला तरी आपोआप हे जग सुंदर होऊन जाईल. उपजत सौंदर्यदृष्टी असलेल्या लोकांचा तोच प्रयत्न सुरू असतो आणि म्हणूनच कुठे काही घाण, कचरा, उकीरडे दिसले की ते अस्वस्थ होतात. दुर्दैवाने त्यांच्या सारखी सौंदर्यदृष्टी सगळ्यांनाच नसल्याने आणि हे प्रमाण अलीकडे अधिकच विषम होत गेल्याने जगाचा उकीरडा होऊ पाहत आहे. साध्या आपल्या शहराचे, गावाचे उदाहरण घ्या; काय दिसते आजूबाजूला? थोडे घराबाहेर पडले की रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचरा, घाण, रस्त्यावरून वाहणारे नाल्यांचे पाणी, कचरा ओसंडून वाहणाऱ्या कचरा पेट्या, रस्त्यावर मुत्त*पणे संचार करणारी जनावरे, रस्त्यावर पडलेले त्यांचे शेण; ना कुठे सौंदर्य, ना कुठे स्वच्छता. शहरे दिवसेंदिवस बकाल होत आहेत. वाढती गर्दी सामावून घेण्याची शहरांची मर्यादा संपत आली आहे. मोठ्या शहरांचे नियोजन साफ कोलमडून पडत आहे. 26 जुलैच्या पावसाने मुंबईचे केलेले वस्त्रहरण सगळ्यांनीच पाहिले आहे. प्रश्न केवळ सौं

दर्यदृष्टीचा नाही. या बकालपणाचा,

अस्वच्छतेचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावरही होत

आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवणाऱ्यांपेक्षा परिसराच्या स्वच्छतेशी कसलेही देणेघेणे नसणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बकालपणा वाढण्याचे हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. शहरात लोकांची गर्दीच इतकी वाढत आहे की परिसर स्वच्छतेच्या दृष्टीने एरवी जो भाग मोकळा राहायला हवा त्या भागातही बिऱ्हाडे थाटली जात आहे. झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे. लोकांना केवळ छत हवे आहे. इतर सुविधांचा विचार नंतर केला जातो. झोपडपट्ट्या उभ्या करताना पाण्याचे नळ आहेत किंवा नाहीत, सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था आहे की नाही, इतर प्राथमिक सुविधा आहेत की नाहीत याचा विचार केला जात नाही. जवळपास सगळ्याच शहरांची हीच अवस्था आहे. याचा ताण नागरी सुविधांवर तर पडतच आहे, शिवाय इतर सामाजिक समस्याही त्यातून वाढत आहेत. शहरांचे नियोजन ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारित येते त्या संस्थांच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांकडे सौंदर्यदृष्टी नाही. कोणत्याही बांधकामाला परवानगी देताना निखळ व्यावसायिक विचार केला जातो. सौंदर्य, सुव्यवस्था त्यांच्या गावीही नसते. त्यामुळे शहरे अस्ताव्यस्त वाढली आहेत आणि आता परिस्थिती सगळ्यांच्याच हाताबाहेर गेली आहे. शहरांना शिस्त लावायची तर शहराचा प्रशासक तेवढाच खमक्या असावा लागतो. असा खमक्या प्रशासक महापालिका, नगरपालिकांच्या कुरणात चरणाऱ्या लोकांना परवडणारा नसतो. त्यामुळे अशा लोकांना फार काळ टिकू दिले जात नाही. परंतु सर्वसामान्यांच्या दृष्टीने विचार केला तर अशा अधिकाऱ्यांची आज नितांत गरज आहे. शहराच्या सुव्यवस्थेसह सौंदर्यही जपल्या जाणे गरजेचे आहे. खानदेशातील जळगाव शहर आज एक सुंदर आणि सुव्यवस्थित शहर म्हणून ओळखले जाते. काही वर्षांपूर्वी जळगाव नगरपाल
केच्या पदाधिकाऱ्यांनी आपले शहर आदर्श करण्यासाठी इतर शहरांचा अभ्यास केला होता. त्यावेळी त्यांना विदर्भातील अकोला शहर एक आदर्श शहर असल्याचे आढळून आले. अकोला त्याकाळी बगिच्यांचे शहर म्हणून ओळखले जात असे. अकोला शहराचे नियोजन डोळ्यासमोर ठेवूनच जळगावचा कायापालट करण्यात आला. आज जळगाव एक आदर्श शहर झाले आहे, तर अकोला विदर्भातील सर्वाधिक बकाल शहर म्हणून ओळखले जात असे मात्र मध्यंतरीच्या खमक्या प्रशासनामुळे शहर थोडे सुधारलेय. नागपूरची अवस्थाही काही वेगळी नव्हती. चंद्रशेखर नावाचा खमक्या प्रशासक या शहरात आला आणि नागपूरचा कायापालटच झाला. आज नागपूर एक सुंदर, हिरवेगार शहर म्हणून ओळखले जात असेल तर त्याचे श्रेय बव्हंशी नागपूरचे तत्कालिन आयुत्त* चंद्रशेखर यांनाच द्यावे लागेल. त्यांनी कुणाचाही मुलाहिजा न बाळगता शहराच्या सौंदर्याला आणि सुव्यस्थेला बाधा आणणारी अवैध अतिक्रमणे अगदी निदर्यतेने मोडून काढली. अर्थात प्रत्येक शहराला त्यांच्यासारखा खमक्या प्रशासक लाभत नाही आणि लाभला तरी त्याला फार काळ टिकू दिले जात नाही. त्यामुळे अनेक शहरांचा बकालपणा दिवसेंदिवस वाढतच आहे. शहराकडे येणारी गर्दी थोपविणे शक्य नाही, रोजगाराच्या शोधात ठाामीण भागातून शहरांकडे लोक येतच राहणार. या गर्दीला सामावून घेणे शहरांना जड जाणारच आहे. या पृष्ठभूमीवर सरकार ‘न्यू टाऊनशिप’ची जी योजना राबवू पाहत आहे ती स्वागतार्हच म्हणायला हवी. शहरांच्या बाजूला अधिक नियोजनबद्ध, अधिक सौंदर्यपूर्ण नवी शहरे वसवली जाणार आहेत. अर्थात राजकारणी मंडळींचाही त्यात ‘अर्थपूर्ण’ मतलब दडलेला असल्याने ही नवी शहरे करमुत्त* वगैरे असणार आहे. ही योजना तयार होताना आपल्याला अनुकूल ठरतील असे कायदे राजकीय मंडळींनी करून घेतले आहेतच, परंतु तरीदेखील ही नव्या शहरांची योजना चांगलीच म्हणावी लागेल. एका निश्चित
नियोजनातून ही शहरे उभी राहत असल्याने त्यात गचाळपणाला, अवैध बांधकामांना, गरजेपेक्षा जास्त गर्दीला आणि अर्थातच बकालपणाला स्थान उरणार नाही. किमान तशी आशा करायला तरी हरकत नाही. अवैध झोपडपट्ट्या हा आपल्याकडील शहरांना वेढणारा कॅन्सर ठरला आहे. नव्या शहरात या झोपडपट्ट्यांना स्थान नसेल. जगातील अनेक मोठ्या शहरांचे नियोजन करताना अशा अवैध बांधकामांना

वावच ठेवल्या जात नाही. लंडन, सिंगापूर सारख्या शहरात एकही झोपडपट्टी नाही.

अर्थात त्या शहरात गरीब लोक राहत नाही, असे नाही. परंतु गरीब आहेत म्हणून त्यांना शहराचा बकालपणा वाढविण्याचा कुणी परवाना दिलेला नाही. आपल्याकडे झोपडपट्ट्यांच्या माध्यमातून तो सर्रास दिला जातो. ‘न्यू टाऊनशिप’मध्ये किमान या प्रकाराला स्थान असणार नाही. आधी वर्णन केल्याप्रमाणे आज आपल्याकडील शहरांची जी अवस्था दिसते ते हाल या नव्या शहरात नसतील. सुबकतेसोबतच सौंदर्य आणि स्वच्छतेसोबतच शिस्त या शहरात पाहायला मिळेल. अर्थात हे सगळे ही शहरे राजकीय मंडळींच्या अवैध प्रभावापासून कितपत मुत्त* राहतात यावरच सगळे काही अवलंबून असेल. किमान या नव्या शहरांना तरी एखाद्या ‘चंद्रशेखर’ची गरज भासू नये, ही अपेक्षा करायला हरकत नाही. असं म्हणतात की या पृथ्वीजवळ आपल्या सगळ्याच लेकरांची भूक भागविण्याची क्षमता आहे, मात्र त्यांच्या हावरटपणाला तिच्याजवळ उत्तर नाही. हा हावरटपणा एखाद्या बिल्डरचा असो अथवा अवैधरित्या झोपडी उभ्या करणाऱ्या सामान्य माणसाचा असो, त्याचा ताण सहन करण्याची क्षमता पृथ्वीत नाही. प्राथमिक सुविधांवर पडणारा लोकसंख्येचा कमाल ताण लक्षात घेऊन नवी शहरे उभी होत आहेत, हा ताण त्यापेक्षा अधिक वाढला तर या शहरांनाही बकाल व्हायला वेळ लागणार नाही. एक चांगली सुरूवात होत आहे, ती शेवटपर्यंत चांगलीच राहायला हवी.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..