नवीन लेखन...

केवळ खोट्या प्रतिष्ठसाठी




प्रकाशन दिनांक :- 23/01/2005

ऐहिक सुखासाठी पैसा लागतो, तो कमवायचा आणि तो कमवण्याच्या नादात मात्र सुख भोगायला वेळच शिल्लक ठेवायचा नाही, अशी बहुतेकांची परिस्थिती असते. अलीकडील काळात सुख आणि प्रतिष्ठा या दोन्ही संकल्पना इतक्या उथळ झाल्या आहेत की, चार पैसे फेकून त्या सहज प्राप्त होऊ शकतात असाच सगळ्यांचा समज झाला आहे.
जगण्याच्या गणितातला फोलपणा स्पष्ट करताना एका तत्त्ववेत्त्याने मांडलेले त्रैराशिक सर्वविदित आहे. या तत्त्ववेत्त्याच्या मतानुसार मुळात जगण्यासाठी माणसाजवळ वेळच नसतो. त्याचे अर्धे आयुष्य झोपेत जाते आणि उरलेले अर्धे आयुष्य जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धडपडीत जाते. यातून खऱ्या अर्थाने जगण्यासाठी किंवा जीवनाचा निरपेक्ष आनंद लुटण्यासाठी त्याच्याजवळ वेळ उरतोच कुठे, हा त्या तत्त्ववेत्त्याने उपस्थित केलेला प्रश्न अगदीच चुकीचा म्हणता येणार नाही. जगण्याच्या संदर्भातील हे चिंतन चार पुरुषार्थापैकी महत्त्वाच्या असलेल्या ‘अर्थ’ या पुरुषार्थाच्या संदर्भातही लागू होते. ऐहिक सुखासाठी लागणारा पैसा कमवायचा आणि तो कमवण्याच्या नादात सुख भोगायला मात्र वेळच शिल्लक ठेवायचा नाही, अशीच बहुतेकांची परिस्थिती असते. अलीकडील काळात सुख आणि प्रतिष्ठा या दोन्ही संकल्पना इतक्या उथळ झाल्या आहेत की, चार पैसे फेकून त्या सहज प्राप्त होऊ शकतात असाच सगळ्यांचा समज झाला आहे. सुख आणि प्रतिष्ठेचा पैशाशी जुळलेला हा संबंधच अनेकदा दु:खाला कारणीभूत ठरत असतो, याकडे मात्र बहुतेकांचे दुलर्क्ष होत आहे. बंगला, गाडी, नोकर-चाकर ही श्रीमंतीची, प्रतिष्ठेची परिमाणे ठरली आहेत. हे वैभव ज्याच्याकडे आहे तो श्रीमंत आणि श्रीमंत आहे म्हणून सुखी असे समीकरण अलीकडील काळात रूढ झाले आहे. त्यामुळेच या मार्गाने सुखी होण्याची प्रत्येकाची धडपड सुरू असते. प्रतिष्ठासुद्धा श्र
मंतीच्या बरोबरीने नांदत असल्याने श्रीमंतीचे प्रदर्शन म्हणजे प्रतिष्ठेचा पुरावा ठरत आहे. आपली श्रीमंती वाढवून आपली प्रतिष्ठा मोठी करण्याचा प्रयत्न सर्रास

होत आहे. या दुष्ट किंबहुना

विचित्र चक्रात सारेच कळत-नकळत फसत असल्याचे दिसते. एखाद्याला आपल्या प्रतिष्ठेचे प्रदर्शन करायचे असेल तर ते श्रीमंतीच्या प्रदर्शनातूनच शक्य असल्याचा सार्वत्रिक समज असल्याने शक्य होईल तेव्हा आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत असलेले लोक आपल्याला सर्वत्र दिसतात. त्यातही लग्न समारंभ म्हणजे तर श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याचे अधिकृत रंगमंचच असतो. आपल्या देशात अनेक समाज असे आहेत की, लग्नात किती खर्च केला, पाहुण्यांची व्यवस्था कशी केली, जेवणात कोणते पदार्थ होते यावरून एखाद्या व्यक्तीची किंवा कुटुंबाची समाजातील प्रतिष्ठा ठरविली जाते. त्यामुळेच आर्थिक परिस्थिती कशीही असो, लग्न मात्र दणकून केले जाते. वेळप्रसंगी कर्ज काढून लग्नाला पैसा लावल्या जातो. काही समाजात तर मुलीच्या लग्नाचे किमान ‘बजेट’ दहा ते पंधरा लाखापासून सुरू होते. थोडी बरी (अर्थात त्या समाजाच्या दृष्टीने) आर्थिक परिस्थिती असेल तर हे लग्न 20 ते 25 लाखाच्या घरात जाते. मुलीकडची मंडळी उद्योजक वगैरे ‘हाय-फाय’ वर्गवारीतील असतील तर लग्नाचा हिशोब लाखाच्या आकड्यात मांडणे कदाचित अपमानास्पद समजले जाते. मुलीच्या लग्नासाठी इच्छा असो वा नसो, ऐपत असो वा नसो, या समाजातील वधुपित्याला लाखोंचा खर्च करावाच लागतो. शेवटी प्रश्न प्रतिष्ठेचा असतो. त्यामुळेच अशा काही उच्चभ्रू समाजात मुलींचा जन्म नाकारण्याचे प्रमाण अलीकडील काळात वाढल्याचे दिसते. गर्भजल परीक्षण करून जर गर्भ मुलीचा असेल तर सर्रास गर्भपात केला जातो. पुढे उचलाव्या लागणाऱ्या लाखोंच्या ओझ्यापेक्षा पाच-दहा हजार खर्च करून ‘हे’ ओझे फेकून देण्य
तच शहाणपणा समजणाऱ्या व्यावहारिक माता-पित्यांची संख्या अशा समाजात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. माझ्या ओळखीच्या एका निष्णात डॉक्टरने त्याच्या वैद्यकीय कारकीर्दीत किमान 20 ते 25 हजार गर्भपात (की, हत्या?) केले आहेत. अर्थात त्यापैकी सर्वच गर्भ केवळ मुलींचे होते म्हणून हे गर्भपात झाले नसले तरी किमान 90 टक्के प्रकरणात मुलगी नको हेच कारण असल्याचे डॉक्टर महोदयांनी स्वच्छपणे कबूल केले. थोडा सूक्ष्म विचार केला तर केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाच्या धाकाने हजारो मुलींना या जगात पाऊलच ठेवू दिल्या जात नाही, असे दिसून येते. त्यातून केवळ सामाजिक समस्याच निर्माण होत नसून मानवाच्या नैतिकतेवरही प्रश्नचिन्ह लागत आहे. हे केवळ एक उदाहरण झाले. अशा असंख्य उदाहरणातून हेच स्पष्ट होते की, केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठी माणसं प्रचंड अनाठायी खर्च करतात. प्रतिष्ठेचा विचार थोडा बाजूला ठेवून लोकांनी आपल्या आर्थिक परिस्थितीचा आणि शारीरिक स्वास्थ्याचा विचार केला तर बऱ्याचशा समस्या तशाच दूर होतील. अनेक खेड्यात आजही लग्नाइतकेच मरणही प्रतिष्ठेशी जोडल्या गेले आहे. कारणे वेगळी असली तरी दिखाऊपणाची वृत्ती दोन्ही सोहळ्यात सारखी असते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तेरा दिवस शोक पाळला जातो. या तेरा दिवसात घरचे कुणी कामावर जात नाही, शेतीवर जात नाही किंवा अन्य कोणतेही काम करत नाही. म्हणजे हे नुकसान तर झालेच, शिवाय तेरवीच्या गोडजेवणाचा जो थाट-माट मांडल्या जातो, तो वेगळाच! ऐपत असो अथवा नसो, प्रतिष्ठा जपण्यासाठी हे सगळे सोपस्कार पार पाडावेच लागतात. आर्थिकदृष्ट्या सुदृढ समजल्या जाणाऱ्या मारवाडी, गुजराथी समाजात मात्र अशा प्रथांना थारा नाही. मृतकाचा शोक तीन दिवस पाळल्या जातो. तिसऱ्या दिवशी ‘उठावणा’ होतो. आप्त, परिचित, जवळचे नातेवाईक येतात. सांत्वना देतात आणि प
ढे सगळे आपापल्या कामाला लागतात. तेरा दिवस हातावर हात देऊन बसण्याची चैन(?) त्यांना परवडत नाही. जीवनाकडे इतक्या व्यावहारिक दृष्टीने पाहिल्यामुळेच कदाचित हे समाज आर्थिकदृष्ट्या संपन्न असावेत. आमच्याकडे मात्र तेरा दिवसाचा पूर्ण शोक आणि तेरवीचा भरमसाट खर्च केल्याशिवाय प्रतिष्ठा सिद्ध होतच नाही. समारंभ किंवा सोहळ्याच्या माध्यमातून जपल्या जाणाऱ्या कथित सामाजिक प्रतिष्ठेची ही काही उदाहरणे झालीत. काही लोक

तर आपली प्रतिष्ठा जपताना जे काम अगदी विनासायास आणि कमी

खर्चात होऊ शकते, त्यासाठीही विनाकारण पैशाची उधळपट्टी करताना दिसतात. अनेक श्रीमंत लोक सायकलिंगचा व्यायाम आपल्या घरातच करतात. जागच्या जागेवर सायकलचे पायडल मारून घाम गाळतात. त्याऐवजी आपल्या कार्यालयात किंवा इतरत्र जाण्यासाठी सायकलचा वापर केला तर व्यायामासोबतच पैशाचीही बचत होईल. अधिक महत्त्वाचे म्हणजे इंधनाची बचत होईल आणि त्यातून एक राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याचे समाधान मिळेल; परंतु तसे कोणी करत नाही, कारण प्रश्न प्रतिष्ठेचा असतो. सायकलवर फिरणारा गाडीतून फिरताना दिसू लागला की, त्याची प्रतिष्ठा वाढते. त्याने प्रगती केल्याचे म्हटले जाते; परंतु एरवी गाडीतून फिरणारा कधी सायकलवर दिसला तर मात्र पाहणाऱ्यांच्या भुवया उंचावतात. ‘पैदल झाला वाटते’, अशी शेरेबाजी ऐकायला मिळते. एकूण काय तर आम्ही अशा अनेक नाहक गोष्टी प्रतिष्ठेसोबत जोडून ठेवल्या आहेत की, त्यातून प्रतिष्ठा जपणे म्हणजे शरीरस्वास्थ्यासोबतच संपत्तीचाही ऱ्हास करणे ठरते. जपान, अमेरिका, जर्मनीसारख्या पुढारलेल्या देशात सायकल सर्वाधिक उपयुक्त वाहन समजले जाते. अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज बुश नियमितपणे सायकलवर रपेट मारतात. जर्मनीत तर लोकं दूरच्या प्रवासाला जाताना घडी होणारी सायकल सोबत घेऊन जातात. ट्रेन किंवा बसमध्ये अशा सायकली ठे
वण्यासाठी विशेष जागा असते. तिथे सायकल चालवणाऱ्याला तेवढीच प्रतिष्ठा आहे जेवढी मर्सिडीजमधून फिरणाऱ्याला! मुळात प्रतिष्ठेचा संबंध कशाशी जोडावा याचे जागृत भान जितके पुढारलेल्या देशात आढळते तितके किंवा त्याच्या तुलनेत एक टक्काही भारतात आढळत नाही. पैसा आणि शक्तीचा केवळ प्रतिष्ठेसाठी होणारा अपव्यय जरी आम्ही टाळला तरी आमचे जीवन अधिक सुखकर आणि निरामय होऊ शकते. अर्थात ही जाणीव आमच्यात केव्हा जागृत होणार, हा यक्षप्रश्न आहे. इतर सर्वच बाबतीत पाश्च्यात्त्यांची नक्कल करणाऱ्या भारतीय समाजाने शिस्त, स्वच्छता आणि काटकसर या त्यांच्या गुणांची नक्कल करण्याचे मात्र सोयीस्कररीत्या टाळलेले दिसते. ते लोकं पाच मैलावर जाण्यासाठी सायकल वापरत असतील तर आम्ही पन्नास फुटावर जाण्यासाठी मोटरसायकल काढतो. त्यांच्या आणि आमच्यातील आर्थिक संपन्नतेची दरी रुंद असण्यामागे हेसुद्धा एक कारण असू शकते, नव्हे ते आहेच!

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..