प्रकाशन दिनांक :- 19/12/2004
अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. या गरजा मुलभूत आहेत, याचाच अर्थ त्यांचे महत्त्व केवळ सामान्य पातळीवर, इतर साधारण प्राणी जगतात त्या पातळीवर जगण्यापुरते मर्यादित आहे. परंतु इतर प्राण्यांशी मानवाची तुलना करता येणार नाही. सर्वच बाबतीत मानव इतर प्राण्यांच्या तुलनेत सरस आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याची बौद्धिक, मानसिक क्षमता जशी उच्च कोटीची आहे, तशीच त्याची जगण्याची शैलीही वेगळी आहे. जगण्यासाठी त्याच्या पोटाला ज्याप्रमाणे चार घास आवश्यक आहेत त्याचप्रमाणे त्याच्या संवेदनशील मनाला जगण्याची उभारी येण्यासाठी, ती टिकण्यासाठी मायेची ऊब, निकटवर्तियांची सहानुभूती, प्रेम तितकेच आवश्यक ठरते. खरे तर मायेची ही ऊब, प्रेमाचा ओलावा हाच त्याच्या जगण्याचा आधार आहे. ज्यांना हा आधार मिळत नाही ती माणसं भौतिक सुखाची रेलचेल असूनही मनातून कायमची दु:खी असतात. प्रसंगी प्रचंड कर्तृत्त्ववान माणसांचे आयुष्यदेखील असा आधार न मिळाल्याने कोसळल्याचे दिसून येते. विशेषत: उतारवयात अशा मानसिक आधाराची नितांत गरज असते. हा आधार आई-वडील आपल्या मुलांमध्ये शोधतात. म्हातारपण म्हणजे दुसरे बालपणच असते. आपल्या मुलांची त्यांच्या बालपणी आपण जशी काळजी घेतली, त्यांना जसे प्रेम दिले, तशीच त्यांच्या कडून म्हाताऱ्या आई-वडिलांची अपेक्षा असते. परंतु मोजके भाग्यवान आई-वडील सोडले तर बहुतेकांच्या वाट्याला या संदर्भात निराशाच येते. मुलं आपल्याला विचारीत नाही, हाच बहुतेकांचा अनुभव असतो. ज्यांची मुले विदेशात आहेत, त्यांच्याकडे तर आपले देशी आई-वडील टिकूच शकत नाही. विदेशात मोठ्या पदावर नोकरीला असलेल्या अथवा मोठा उद्योग सांभाळणाऱ्या मुलांकडे आता उर्वरित आयुष्य निवांतपणे घालवावे या विचाराने गेलेले आई-वडील चार-सहा महिन्यातच हिरमुसले होऊन भारतात परततात. त्यांच्या निवांत जगण्याच्या कल्पनेतील मुलभूत गरज असते, ती प्रेमाच्या, सहानुभूतीच्या, आपुलकीच्या ओलाव्याची. नेमकी हीच गरज तिथे पुरविली जात नाही. केवळ विदेशात मुले असणाऱ्या आई-वडिलांनाच हा अनुभव येतो असे नाही. अलिकडील काळात भारतातील मोठ्या शहरात, ‘मेट्रो सिटी’तदेखील या ‘कोरडेपणाची’ मोठ्या प्रमाणात लागण झाल्याचे दिसते.
माणसं एकमेकांच्या अगदी जवळ राहात असूनही खूप दूर गेलेली दिसत आहेत. आपुलकीचा झरा आटल्यासारखा झाला आहे. प्रेमाच्या ओलाव्याला शहरी माणसांच्या जगात जागाच उरली नाही. माणसांची मने सिमेंट-काँक्रिटसारखीच दगडी झाली आहेत. इथे स्थान उरले आहे ते केवळ कोरड्या, रुक्ष व्यवहाराला. शहरे अशी माणुसकीला, परस्परांच्या आपुलकीला हळूहळू पारखी होत असली तरी ठाामीण भागात मात्र परस्पर सहकार्य, एकमेकांना समजून घेण्याची, सांभाळण्याची भावना अद्यापही बऱ्याच प्रमाणात टिकून आहे. केवळ माणसात आढळणारा माणुसकीचा गुण शहरातून हद्दपार झाला असला तरी खेड्यापाड्याच्या सांदी कोपऱ्यात अद्यापही माणूसकी टिकून आहे. झोपड्यांच्या भिंती सिमेंट काँक्रिटसारख्या दगडी झालेल्या नाहीत. माणुसकीचा ओलावा या भिंतीतून अद्यापही पाझरत आहे. जुन्या काळी गावात एखाद्याच्या घरी पाहुणा आला तर तो केवळ त्या घरापुरता पाहुणा नसायचा, तर तो संपूर्ण गावाचाच पाहुणा असायचा. गावातील एखाद्याचा जावई संपूर्ण गावाचा जावई ठरायचा. आज परिस्थिती अगदी तशी नसली तरी पाहुण्यांचे आदरातिथ्य आजही गावात व्यवस्थित केल्या जाते. माणसा-माणसातील सहबंध शहराच्या तुलनेत आजही गावाकडे टिकून आहेत. गावाकडची माणसं आजही अघळपघळ आहेत. त्यांच्याकडे निवांतपणे गप्पा मारायला वेळ आहे. एकमेकांना सांभाळून घेण्याची त्यांची वृत्ती आहे आणि ती त्यांची गरजसुद्धा आहे. ठाामीण भागातली जीवनशैलीच अशी आहे की खड्यातले प्रत्येक घर एकमेकांशी या ना त्या कारणाने जुळलेले असते. त्यामुळे ही माणसं जेव्हा शहरात येतात तेव्हा शहरी वातावरणाशी, तिथल्या जीवनशैलीशी त्यांना जुळवून घेता येत नाही. ज्याप्रमाणे नव्या आधुनिक पिढीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आपल्या मुलांशी जुळवून घेणे आई-वडिलांना सहज शक्य होत नाही, त्याचप्रमाणे खेड्यातील लोकांनाही शहरी माणसं अतिशय कृत्रिम आणि कोरडे वाटतात. ही वस्तूस्थिती असली तरी नाण्याची दुसरी बाजूही समजून घेणे आवश्यक आहे.
आज जग झपाट्याने बदलत आहे. जीवन अतिशय वेगवान झाले आहे. स्पर्धेचे युग आहे आणि ही स्पर्धा केवळ व्यवसाय, उद्योगधंदा किंवा प्रगतीशी संबंधित राहिलेली नाही. प्रत्यक्ष जगण्याची स्पर्धाही तितकीच तीप झाली आहे. शहरी माणसाजवळ निवांतपणा उरलेला नाही. थांबण्यासाठी त्याच्याजवळ वेळ नाही. ‘जो थांबला तो संपला’ अशी परिस्थिती आहे. या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर ऊर फाटेस्तोवर कष्ट करण्याला निदान शहरात तरी पर्याय नाही. याचा अपरिहार्य परिणाम त्याच्या वागणुकीवर आणि जीवनशैलीवर दिसून येतो.
शहरातली माणसे आज एकलकोंडी, अतिशय आत्मकेंद्रीत झाली असली तरी ती त्यांची अपरिहार्यताच आहे. शहरी संस्कृतीच्या नावाने बोटे मोडणाऱ्या खेड्यातील लोकांना किंवा आपल्या मुलांनी आपल्यासाठी निवांत वेळ द्यावा अशी अपेक्षा बाळगणाऱ्या आई-वडिलांना ही परिस्थिती समजून घ्यावी लागेल. बरेचदा खेड्यावरची एखादी व्यक्ती शहरातील नातेवाईकाकडे येते आणि त्याची अपेक्षा असते ती शहरातल्या या यजमानाने आपले साठासंगीत आदरातिथ्य करावे, आपल्यासाठी भरपूर वेळ द्यावा, हातातली सर्व कामे बाजूला ठेवून आपल्या कामासाठी त्याने धावपळ करावी. ही अपेक्षा अवास्तवच म्हणायला पाहिजे. खेड्यातला निवांतपणा शहरात शक्य नाही, ही वस्तुस्थिती समजून घ्यायला पाहिजे. आज ग्रामीण आणि शहरी असे संस्कृतीचे विभाजन झाले असले तरी हे विभाजन परिस्थितीशी समायोजन साधण्याच्या प्रयत्नातून झालेले आहे. शहरी जीवनाच्या धावपळीचा अपरिहार्य परिणाम हा व्यावहारिक रुक्षपणातून समोर येतो. हा बदल आम्हाला स्वीकारावाच लागेल. प्रत्येक गोष्ट स्वत:ला अनुकूल असण्याचा हट्ट प्राप्त परिस्थितीत तरी योग्य म्हणता येणार नाही. जिथे जिवंत राहणेच हे एक आव्हान ठरले आहे तिथे मानवी भावभावनांच्या अस्तित्वाला अशी कितीशी किंमत मिळणार? नाण्यांच्या या दोन्ही बाजुतून हेच स्पष्ट होते की, परिस्थितीशी झगडत स्वत:चे अस्तित्व टिकविताना अनेक चांगल्या गोष्टींचा बळी जातच असतो. जीवनचक्रात या न टाळता येणाऱ्या बाबी आहेत. त्या समजून घेऊनच त्यातून मार्ग काढता येईल.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply