भारताचा इतिहास चाळतो म्हटले तर इतिहासात ठिकठिकाणी, पानापानावर मराठी माणसाच्या कर्तृत्वाचा ठसा उमटलेला दिसतो. लढाईचे मैदान असो अथवा साहित्याची मुलूखगिरी, मराठी माणसाचा आदराने उल्लेख केल्याशिवाय इतिहास पुढे सरकूच शकत नाही. अगदी अलीकडील काळापर्यंत ‘मराठी पाऊल’ सगळ्याच क्षेत्रात पुढेच होते. परंतु गेल्या दोन-चार दशकात मात्र महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या कर्तृत्वाला एक प्रकारची ओहोटी लागल्याचे दिसते. कधीकाळी दिल्लीचे तख्त फोडणारे, अटकेपार झेंडे गाडणारे, ‘अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला’, असे साक्षात महासागराला बजावणारे मराठे, आज मात्र भुगोलातील नकाशाही मोठा वाटावा इतक्या संकीर्ण मर्यादेत संकुचित झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजधानीतच मराठी टक्का नावापुरता उरला म्हटल्यावर महाराष्ट्राबाहेरील मराठी टक्क्याची चर्चा न केलेलीच बरी. आज आंतरराष्ट्रीय जगतात भारताचे प्रतिनिधीत्व करणारे जे समुदाय आहेत, भारताची ओळख ज्यांच्यामुळे जगाला होते त्या लोकांमध्ये प्रामुख्याने पंजाबी, केरळी, तामीळ, राजस्थानी आणि अगदी बिहारच्याही लोकांचा समावेश आहे. अमेरिका, इंग्लंडसारख्या देशात नाही म्हणायला मराठी मंडळी आहेत, त्यांची ‘महाराष्ट्र मंडळे’ देखील आहेत, परंतु इतर प्रांतियांच्या तुलनेत त्यांचा विचार केल्यास ते अत्यल्पसंख्यांक ठरतात. प्रचंड क्षमता, बुद्धिमत्ता, जिद्द असतानाही मराठी माणूस महाराष्ट्राच्या सीमेबाहेर फारसा पडताना दिसत नाही, या मागच्या कारणांचा विचार केल्यास प्रामुख्याने मराठी लोकांची मानसिकता त्यांच्या विजयी ‘सीमोल्लंघनात’ आडवी येत असल्याचे दिसून येते. महाराष्ट्राबाहेरच कशाला, महाराष्ट्रातही मराठी माणूस आपल्या गावच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या सीमा ओलांडायला तयार नसतो. त्यामुळे मराठी मा
साने बाहेर जाऊन आपले कर्तृत्व दाखविणे फार दुरची गोष्ट राहिली, महाराष्ट्रातही त्याच्या कर्तृत्वाला वाव उरला नाही. कुठलेतरी नायर, रेड्डी, माधवन, वासुदेवन, सिंग, शर्मा या मराठी मुलूखातील अधिकारांची पदे बळकावून बसतात. मागे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच मंत्रालयातून मराठी आडनावाच्या पाट्या लुप्त होत असल्याची खंत व्यक्त केली होती. यासाठी इतर प्रांतियांना दोष देण्यात
अर्थ नाही. तुमचे कर्तृत्व, तुमची
जिद्द लंगडी पडत असेल तर इतर कुणीतरी संधी साधणारच. तुम्हाला ही संधी नाकारण्यात आली नव्हती, परंतु तुम्हीच तुमच्या कोषातून बाहेर पडायला तयार नव्हता, आजही तयार नाही. स्वत:च स्वत:ला अनेक खोट्या बंधनात मराठी माणसाने बांधून घेतले आहे. मराठी माणूस प्रतिष्ठेला (?) फार जपतो आणि ही प्रतिष्ठा जपण्यासाठीच तो आपल्या गावकुसाबाहेर पडायला तयार होत नाही. बाहेर आपल्याला कोण ओळखणार, काय राहील आपली प्रतिष्ठा, असल्या नकारार्थी विचारानेच मराठी माणसाची घोडदौड रोखून धरली आहे. आपण, आपले कुटुंबीय, सगे-सोयरे, मित्रमंडळ यातच रममाण होणाऱ्या मराठी माणसाने आपली मानसिकता इतकी संकूचित करून ठेवली आहे की, दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या देशात जाण्याची कल्पनाही तो करत नाही. एखाद्याने तशी जिद्द दाखविलीच तर त्याचे आप्त-स्वकीयच त्यात खोडा घालतात. कसं होईल तुझं तिथे, काय खाशील, काय पिशील, कुणाशी बोलशील, एक नाही अनेक नकारार्थी विचार बाहेर पडू इच्छिणाऱ्या पायाच्या बेड्या बनतात. इतर प्रांतियांसाठी ही बंधने कधीच अडसर बनत नाही. तिकडचे आई-वडीलच आपल्या मुलांना दुसऱ्या राज्यात, देशात जाण्यासाठी प्रोत्साहन देतात. तिकडच्या आईची माया आपल्या मुलाच्या प्रगतीत बाधा बनेल इतकी वेडी नसते. आपला गाव, आपला प्रदेश सोडून अगदी बिनधास्तपणे हे लोकं बाहेरच्या जगात वावरत असतात. कोणतेही काम करण्याची त्यांची तयारी
असते. आपण हे काम केले म्हणजे लोकं काय म्हणतील, हा विचार केवळ मराठी माणूसच करतो आणि म्हणूनच तो कोणतेही काम करू शकत नाही. एकवेळ आपल्या वर्तुळातून बाहेर पडलो म्हणजे पूर्ण आकाश आपले असते, तिथे आपल्याला ओळखणारे कुणीही नसते. आपल्याला पाहिजे ते काम आपण करू शकतो. आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपले आयुष्य जगू शकतो. खरेतर आयुष्याचा, जगण्याचा विस्तार करण्यासाठी प्रत्येकाने आपणच निर्माण केलेल्या आपल्या भोवतीच्या वर्तुळातून बाहेर पडायला पाहिजे. केरळी, तामीळ किंवा पंजाब-गुजरात प्रांतातील लोकांमध्ये ही भावना प्रकर्षाने आढळून येते. त्यामुळे केवळ भारतातच नव्हे तर जगातही या लोकांचा मुक्तसंचार असतो. महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक लहान-मोठ्या शहरात जसे उडुप्याचे हॉटेल आढळून येते तसेच ते लंडन, न्यूयॉर्कमध्येही दिसून येते. इथे आपली झुणका-भाकर आपल्या घरात पाहुणी झाली आहे, तर दुसरीकडे तिचे अस्तित्व जाण्याचा प्रश्नच नाही. स्वत:भोवतीच्या आणि दिवसेंदिवस संकुचित होत चाललेल्या अत्यंत मर्यादित वर्तुळात मराठी माणूस स्वत:ला कोंडून घेत आहे, हाच एक मोठा दोष मराठी कर्तृत्वाला बाधा बनला आहे. जोपर्यंत एखादा बेडूक आपल्या डबक्यातून बाहेर पडून मोठ्या तलावात जात नाही तोपर्यंत त्याच्या डोक्यातील डबक्याचा विस्तार संपणार नाही. डबक्यात आहे तोपर्यंत ते डबकेच त्याचे जग बनलेले असते. या डबक्याच्या बाहेरही जग आहे आणि ते खूप विशाल आहे हे ज्ञान त्याला डबक्याच्या बाहेर पडल्याशिवाय होणारच नाही आणि हे ज्ञान होत नाही तोपर्यंत त्याचा विकासही डबक्यासारखाच संकुचित राहील. माझंच उदाहरण सांगतो. 1970-72 मध्ये अकोल्यात फार कमी लोकांकडे स्वत:चे चारचाकी वाहन होते. 20-25 च्या वर त्यांची संख्या नसेल. त्यापैकी एक माझ्या वडिलांकडे होते. मला त्याचा कोण अभिमान वाटायचा. पुढे शिक्षणासाठी मुंबई
ला गेलो आणि आमच्यासारख्या श्रीमंतांची (?) मुंबईतील गर्दी पाहून आमच्या क्षुद्रतेची जाणीव झाली. बाहेर पडल्यावरच आपले अस्तित्व किती क्षुद्र आहे आणि आपली स्वत:ची ओळख प्रस्थापित करण्यासाठी किती कष्ट उपसावे लागतात, याची जाणीव होते. लोकांच्या मानसिकतेचा विचार केला तर साधारण दोन गटात त्यांची विभागणी करता येईल. एका गटात अल्पसंतुष्ट, आहे त्यात समाधान मानणाऱ्या लोकांचा समावेश करता येईल, तर दुसऱ्या गटात सदैव आहे त्यापेक्षा काहीतरी अधिक मिळविण्यासाठी सतत अस्वस्थ राहणाऱ्या आणि प्रयत्न करणाऱ्या लोकांचा समावेश होईल. मराठी माणूस साधारण पहिल्या गटात मोडतो. ‘मी बुटासाठी
रडत होतो आणि समोरच्याला पायच नव्हते’ असली वाक्ये मराठी माणसाच्या
मनात घर करतात. आपल्याजवळ काय नाही यापेक्षा आपल्याकडे जे आहे ते नसणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे, या आत्मसंतुष्ट विचारात मराठी माणूस स्थिर असतो. अर्थात असा विचार करणे चांगलेच आहे, परंतु बरेचदा असा विचार आपल्या मूलभूत क्षमतेला न्याय देत नाही. आपल्यात क्षमता असूनही आपला विकास होत नाही. दुसऱ्या गटातील माणसं मात्र सतत काहीतरी अधिक मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. ‘आभाळाकडे पाहा म्हणजे तुमच्या क्षुद्रतेची तुम्हाला जाणीव होईल’ हे बोधवचन त्यांचा आदर्श, त्यांची प्रेरणा असते. आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक मिळविण्याची आपली क्षमता आहे ही जिद्दच, मग तशी क्षमता असो अथवा नसो, या लोकांना यशस्वी करून जाते. अर्थात बरेचदा नशिबाचा भागही खूप महत्वाचा असतो. अनेक कर्तृत्ववान माणसे केवळ नशिबाने दगा दिल्याने मातीमोल होतात, तर केवळ नशिबाची साथ मिळाल्यानेच कचऱ्याचेही सोने होऊ शकते. मी इथे उदाहरणे देणार नाही, परंतु अशी उदाहरणे खूप पाहायला मिळतात. नशिबाची आपल्या आयुष्यातील ही भूमिका बाजूला ठेवली तर साधारणपणे हातपाय हलविण
राच पोहू शकतो हे सत्य आहे, आपल्याला स्वीकारावेच लागेल. नशिबात असो अथवा नसो, प्रयत्नांना पर्याय नाही आणि प्रयत्नांना जसा पर्याय नाही तसाच प्रयत्नांना अंतही नाही. कुठल्याही एका बिंदूवर आयुष्य थांबत नसते. ते चालतच राहते आणि त्याच्या प्रत्येक पावलावर एक नवे यशाचे शिखर आपल्याला साद देत असते. हे शिखर गाठण्याचे प्रयत्न करण्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता आहे. ही खुणगाठ मराठी माणसाने बाळगली, आपल्या स्वयंनिर्मित कोषातून तो बाहेर पडला तर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि जगातही त्याच्या कर्तृत्वाचा ठसा उमटल्याशिवाय राहणार नाही.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply