प्रकाशन दिनांक :- 23/03/2003
घटना तशी जुनी, परंतु फार उद्बोधक आहे. रेसमध्ये धावणारे घोडे बाळगणारा एका तबेल्याचा मालक एकदा फार चिंतेत पडला होता. रेसमध्ये नेहमीच आघाडीवर राहून, रेस जिंकून त्याला भरपूर पैसे मिळवून देणारे त्याचे घोडे अचानक माघारु लागले. रेस जिंकणे ही तर फार दुरची गोष्ट राहिली, रेसमध्ये टिकणेसुध्दा त्या घोड्यांना शक्य होत नव्हते. नेमके काय झाले, हे त्या मालकाला कळतच नव्हते. घोडे तेच होते, त्या घोड्यांची देखरेखसुध्दा पूर्वीप्रमाणेच होत होती. त्यांचे खाणे-पिणे सुध्दा व्यवस्थित होते. त्या मालकाने शेवटी तज्ज्ञांना पाचारण केले. त्यांनासुध्दा नेमके कारण शोधता आले नाही. हताश होऊन निघतानाच त्या लोकांना एक गोठा दिसला. त्यांनी त्या तबेल्याच्या मालकाला त्यासंबंधी विचारले, तेव्हा तो म्हणाला की, या गोठ्यात म्हशी आहेत. या म्हशींचे दूध आम्ही घोड्यांना पुरक आहार म्हणून देतो. पूर्वी आमच्याकडे गायी होत्या, परंतु त्यांचे दूध कमी पडायचे. त्यामुळे त्या विकल्या आणि या म्हशी आणल्या. त्या तज्ज्ञांपैकी एकजण तत्काळ त्याला म्हणाला, ‘तुम्ही गायी नाही, तुमचे भाग्य विकले; तुमच्या घोड्यांच्या क्षमतेत, ताकदीत जो फरक पडला तो या म्हशीच्या दुधामुळेच.’ गाईचे दूध म्हशीच्या तुलनेत अधिक पौष्टिक,सकस असल्याचे सत्य यातून अधोरेखीत होते.
अगदी वैदिक काळापासून गोधन हेच आपल्या समृध्दीचे प्रतिक समजल्या जायचे. (इतर सगळ्याच प्रतिकांसोबत हे प्रतीकसुध्दा अलीकडील काळात बाद झाले आहे, तो भाग वेगळा) गाईला माता म्हटले जायचे. तिला देवत्व बहाल केल्या गेले ते केवळ धार्मिक अंधश्रध्देतून नव्हे,*त्यामागे शास्त्रशुध्द कारणमीमांसा होती. पाचकता, सकसता आणि पौष्टिकतेचा विचार केल्यास गाईच्या आणि मातेच्या दुधात भरपूर साधर्म्य आढळून येते आणि केवळ दूधच नव्हे तर गोमूत्र, गोमय म्ह
जे शेण देखील मानवासाठी तेवढेच उपयुक्त आहे. माझ्या या पूर्वीच्या ‘आहार तसा
विचार’ या लेखात मी आहारासंबंधी
विश्लेषणात्मक मांडणी केली होती. त्या आहाराचा दूध हा एक प्रमुख घटक आहे. सात्वीक आहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गायीच्या दुधात जवळपास सगळेच अन्नघटक योग्य प्रमाणात समाविष्ट असतात आणि म्हणूनच दुधाला पूर्ण अन्न म्हटल्या गेले आहे, अर्थात गाईच्या दुधाला! आपल्या देशाच्या भूतकाळाकडे नजर टाकली तर आपल्या सहजच लक्षात येईल की, त्या काळातले लोकं केवळ शारीरिकदृष्ट्याच नव्हे बौध्दिक दृष्ट्यादेखील आजच्या पिढीपेक्षा कितीतरी अधिक सशक्त, प्रगत होते. वेद, ऊपनिषदासारखे श्रेष्ठ ज्ञान, रामायण-महाभारतासारखी अजरामर महाकाव्ये जगाला देणारे लोकं कोणत्याही कसोटीत आजच्या प्रगत (?) पिढीपेक्षा श्रेष्ठच ठरतात. या श्रेष्ठतेला कारणीभूत होती ती त्यांची जीवनशैली, त्यांचा आहार. त्या काळी भारतात भरपूर गोधन होते. गाईचे दुध, त्यापासून बनवलेले दही, लोणी, तुप यांचा आहारात प्रामुख्याने समावेश असायचा. अशा सात्विक आहाराने त्यांची शरीरं पुष्ट आणि बुध्दी तरल असायची. गाईच्या शेणाने सारवलेल्या कुटिरात प्रवेश करण्याची रोगजंतूत हिंमत नव्हती. पुरातन काळात युद्धामध्ये झालेल्या जखमांमध्ये गाईचे जुने, लोणकढे, तूपच भरले जायचे, जुन्या किल्ल्यावर गेले म्हणजे अजूनही ती तुपाची टाकी’गाईड’आवर्जून दाखवितात. बैलांचा शेतीसाठी तर उपयोग व्हायचा तसेच त्यांच्या शेणाचा खत म्हणून वापर केल्याने जमिनी अधिकच कसदार व्हायच्या. गोवंशाच्या शेणखताचा वापर केल्याने शेतात गांडूळांचे प्रमाण वाढते आणि मोठ्या प्रमाणात गांडूळ असलेली जमीनच जिवंत समजली जाते, हे एक सिध्द शास्त्रीय विधान आहे. एकंदरीत गोधनाला जोपर्यंत आपल्या देशात, आपल्या व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान होते तोपर्यंत हा देश सर्वच दृष्
टीने सुदृढ होता. पन्नास-पन्नास किलोच्या तलवारी दोन्ही हातात आणि पाठीला 80 किलोचा भाला घेऊन लढणारे महाराणा प्रताप आज आपल्याला दंतकथेतले नायक वाटत असले तरी ती एक जिवंत वस्तूस्थिती होती.
विदेशी आक्रमकांचे पाय या भूमीला लागले आणि हा सुवर्णकाळ संपला. गाय आणि भारतीय जीवन पद्धती यांचा परस्पर संबंध आणि समृद्धता ह्याचे रहस्य कळल्यामुळे या विदेशी आक्रमकांनी विशेषत: मोगलांनी गोधनावर पहिला घाव घातला. धार्मिक आधार देत त्यांनी गायींच्या कत्तलीला केवळ प्रोत्साहनच दिले नाही तर प्रचंड प्रमाणात या कत्तली घडवून आणल्या. त्यामुळे गोधनाचा प्रचंड तुटवडा पडला. त्यानंतर केव्हातरी हळूच म्हशीचा प्रवेश झाला आणि आज परिस्थिती अशी आहे की, जगातील एकूण म्हशींपैकी 98 टक्के म्हशी भारतीय ऊपखंडातच आढळून येतात, गायींच्या बाबतीत मात्र हेच प्रमाण केवळ 15 टक्के आहे. अलिकडच्या काळात सोन्याला पर्याय म्हणून बेन्टेक्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.केवळ वरची कृत्रिम लकाकी वगळता बेन्टेक्समध्ये सोन्याचा एकही गुणधर्म नाही. दुधाच्या बाबतीत देखील असेच म्हणता येईल. एक रंगाचे साधर्म्य वगळता गाईच्या दुधाच्या तुलनेत म्हशीचे दूध कुठल्याही योग्यतेचे नाही. परंतु वाईट गोष्टींचा प्रसार फार लवकर होतो. लोकांनी सुरवातीला पर्याय म्हणून स्वीकारलेले म्हशीचे दूध नंतर आहाराचा नियमित घटक बनले. म्हशीचे घट्ट दूध, त्यावर येणारा सायीचा जाड पापुद्रा, त्यापासून मिळणारे भरपूर लोणी हा वरवरचा दिखावा आम्हाला प्रभावित करण्यात पुरेसा ठरला. प्रत्यक्षात म्हशीच्या दुधाने ‘स्लो पॉयझन’चे काम केले आहे. मेदाचे प्रमाण भरपूर असलेल्या म्हशीच्या दुधाने आपल्या शारीरिक क्षमतेवर परिणाम केला आहे. बुध्दी जड, संवेदनाहिन होत चालली, तरलता राहिली नाही आणि शरीराचेही हाल काही वेगळे नाहीत. वर उल्लेख केल्याप्
माणे महाराणा प्रताप, बाजीप्रभू, तानाजीसारखी माणसे हा आमचा भूतकाळ आणि आता वर्तमानकाळी पुरुषांची सरासरी ऊंची सव्वापाच फुटावर तर वजन 40-45 किलोवर आले आहे. स्त्तियांच्या बाबतीतही तेच दिसून येते. सध्याच्याच पिढीत स्त्तिया आपली प्रसव क्षमता गमावून बसल्या आहेत. पुढच्या पिढीत कदाचित प्रजनन क्षमतादेखील गमावून बसतील. त्यामागे इतरही अनेक कारणं असतील परंतु सकस आहाराचे दुर्भीक्ष हे महत्त्वाचे कारण आहे आणि गाईचे शुध्द,
सात्वीक दूध हेच सकस आहाराचे मुख्य प्रमाण आहे. म्हैस हा
एक मठ्ठ, मंद आणि सुस्त प्राणी आहे. म्हशीच्या दुधातून दुसरे काय येणार? हेच गुण तिच्या दुधात उतरतात. म्हैस व्याल्यानंतर तिचे वगारु उभे राहायला दिवस-दोन दिवस घेते. गाईचे वासरु मात्र तासभरात ऊभे होते, बागडू लागते. एक प्रयोग करुन पाहता येईल. म्हशीचे दहा वगारु आणि गाईचे दहा वासरे दिवसभर वेगवेगळी बांधून ठेवायची. संध्याकाळी त्यांना सोडल्यावर आपल्याला दिसून येईल की, गाईचे वासरु चटकन आपल्या आईला शोधून काढते, वगारुला मात्र आपली आई शोधता येत नाही. हे निरीक्षण पुरेसे बोलके आहे. या देशातील गोधन संपवताना म्हशी सारख्या निर्बुध्द प्राण्याचा पर्याय समोर करण्यामागे एखादा व्यापक कट तर नसावा, अशी शंका घ्यायला भरपूर जागा आहे. आधीच म्हशीच्या दुधाचा आहारात समोवश करणारा एकमेव देश म्हणून मिरवणारा भारत आता गाईच्या शुध्द दुधाला कायमचा पारखा होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, नव्हे तशी ती निर्माण केल्या जात आहे. डुकऱ्याची विन असलेली जर्सी, होस्टन, रेड डीन सारख्या विदेशी वळूंशी देशी प्रजातींचा मोठ्या प्रमाणात संकर घडवून आणल्या जात आहे. संकरित बियाण्यांनी आधीच इथला शेतकरी देशोधडीला लागला आहे आणि आता या संकरित दुधाने तर दोन-चार पिढ्यातच या देशाचा कारभार संपण्याचे संकेत दिले आहेत. यापुढे कदाचि
त भारतीय हवामानात टिकणारे गाई-बैलं अस्तित्वात राहणार नाहीत. म्हशींशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे नसेल.
अद्यापही वेळ गेलेली नाही. अजुनही आपल्या देशातले गोधन आपल्याला वाचवता येईल. सरकारकडून ती अपेक्षा नाही. साधे गोवंश हत्याबंदी विधेयक त्यांना पारित करता येत नाही. काही सेवाभावी गोरक्षा संस्था आणि मनोहर परचुरे,जळगावचे बाफना,खामगावचे गोपालबाबू अठावाल सारखी अनेक मंडळी गोवंश रक्षणासाठी आपल्या परीने शक्य होतील तेवढे प्रयत्न करीतच आहेत. त्या प्रयत्नांना आपलाही हातभार लागणे महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांनीदेखील गाईचा दुधापुरता विचार न करता गोमय,गोमुत्र आदींचा व्यावसायिक दृष्टिकोणातून विचार करावा. वासराने पिल्यानंतर उरलेले दूधच आपले असते हे विसरु नये. इंजेक्शन वगैरेचा वापर करुन अवेळी दूध काढण्याचा प्रयत्न टाळावा. पान्हा फुटल्यानंतर आपोआप ऊचंबळून येणारे दुधच अमृतासमान असते. भगवान श्रीकृष्ण, राजेराजवाडे, देवादिकांच्या फोटोमध्ये गायी आजूबाजूला दिसतात. यमराजाचे वाहन मात्र म्हैस, रेडा दाखविले जाते.यावरुन हाच बोध घेता येईल की, गायी पाळाल, गायीचे दूध, लोणी सेवन कराल तर महान, पूजनीय बनाल. म्हशीचे दूध प्याल तर मात्र यमराज्यासोबत जाल. गोवंश वाचेल तरच हा देश वाचेल, तरेल, फुलेल हे अपरिहार्य सत्य आहे.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply