नवीन लेखन...

जया अंगी मोठेपण…!

‘माशाचे अश्रू कुणाला दिसत नाहीत,’ बाळासाहेब ठाकरे एकदा उद्वेगाने असे म्हणाले होते. खरेच आहे ते! ज्यांनी देशाला, जगाला आपल्या विचारांनी, आपल्या कर्तृत्वाने भारावून टाकले अशा थोरामोठ्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील यशापयश कधीच समोर येत नाही. समाजासाठी, देशासाठी त्यांनी मोजलेल्या किमतीचे कुणालाच भान नसते. त्यांनी काय कमावले हे तर सगळ््या जगाला दिसते; परंतु हे कमावताना त्यांनी काय गमावले हे केवळ त्यांनाच ठाऊक असते. बरेचदा तर हा सौदा निव्वळ आतबट्ट्याचा असतो. समाजाला, देशाला सुखी करण्यासाठी या लोकांनी आपल्या वैयक्तिक सुखाची अक्षरश: होळी केलेली असते. त्यांचा हा त्याग अभावानेच समोर येतो. एका कवीने म्हटलेच आहे, ‘कामियाबी कामियाबी जिसे कहते है, जरा बताओ तो कामयाब इन्सान उसे कीस किमत पर खरीदते है?’ इतरांच्या दृष्टीने यशस्वी ठरलेली माणसे खरोखर यशस्वी असतात का? एरवी सामान्य माणसांना सहजपणे मिळणारी सामान्य सुखेही त्यांच्या नशिबात नसतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटायला त्यांची पत्नी तुरुंगात गेली होती तेव्हा त्यांचा नुकताच विवाह झाला होता. साहजिकच त्यांची पत्नी अतिशय दु:खी होती त्या वेळी तिला समजावताना सावरकर म्हणाले होते की, ‘चार काटक्या एकत्र करून घरटे बांधायचे आणि पिलांची वीण वाढवायची यालाच संसार म्हणत असशील तर मला असल्या संसारात रस नाही.’ देशाच्या संसाराची काळजी वाहणाऱ्या सावरकरांना आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवताना काहीच यातना झाल्या नसतील का? त्यांना साधं संसारसुखही मिळू नये एवढी मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली! पण असते ते असेच. ज्यांना मोठेपणाची आस आहे त्यांना असे लहानसहान त्याग करावेच लागतात. वैयक्तिक सुखावर त्यांना पाणी सोडावेच लागते. खेदाची बाब एवढीच आहे की, त्यांच्या या त्यागाची जाणीव इतरांना नसते. त्यांना दिसतो तो त्यांचा केवळ मोठेपणा, त्यांना दिसते ते त्यांचे केवळ वैभव, त्यांना दिसतो तो केवळ त्यांचा मानमरातब. त्यासाठी त्यांनी उपसलेले कष्ट, त्यांनी मोजलेली किंमत कुणालाच दिसत नाही. कीर्तन सुरू असताना आपल्या लाडक्या मुलाच्या निधनाची तार मिळाल्यानंतर क्षणभर स्तब्ध झालेल्या गाडगेबाबांनी ‘आले किती, गेले किती, काय रडू एकासाठी’ म्हणत आपले कीर्तन पुढे सुरू केले. लाडक्या लेकाच्या अकाली निधनावर शोक करण्याचा अधिकारही इतरांच्या सुखासाठी त्यांनी त्यागला आणि म्हणूनच गाडगेबाबा महान संत ठरले. गाडगेबाबांच्या महानतेचे सारेच कौतुक करतात; परंतु या आणि अशाच प्रकारच्या कितीतरी त्यागातून ही महानता जन्माला आली याची जाणीव किती लोकांना असते? मिसरूड फुटण्याच्या वयात मोगलशाहीविरुद्ध तलवार उपसणाऱ्या शिवाजी महाराजांना त्यांच्याच सग्यासोयऱ्यांनी विरोध केला तेव्हा त्यांना काहीच दु:ख झाले नसेल का? साक्षात त्यांचा लाडका पुत्रच मोगलांना जाऊन मिळाला तेव्हा त्यांच्या हृदयाचे किती तुकडे झाले असतील? पट्टराणी सोयराबाईंच्या कुटिल राजकारणाने त्यांना काहीच मनस्ताप झाला नसेल का? पण हे सगळं दु:ख आपल्या अंतरंगात दफन करून त्यांनी हिंदवी स्वराज्य उभारले. ते मराठा पातशाह जाहले. इतिहासात त्यांचे नाव कायमचे कोरल्या गेले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ते अजरामर झाले; परंतु त्यासाठी त्यांनी किती किंमत मोजली हे इतिहास सांगणार नाही. प्रत्येक मोठ्या माणसाने आपल्या मोठेपणाची इतकी किंमत मोजली आहे की त्या ऋणातून समाज कधीच उतराई होऊ शकत नाही. ही तर झाली इतिहासातील काही उदाहरणे आपल्यासारख्या सर्वसाधारण लोकांच्या आयुष्यातही हेच पाहायला मिळते. एखादी व्यक्ती मोठा डॉक्टर होते, वकील, उद्योजक, इंजिनिअर होते किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात मोठी होते तेव्हा सारेच त्या व्यत्त*ीच्या मोठेपणाची महती गातात, कौतुक करतात, आदर-सत्कार करतात. काहींचा जळफळाटही होतो; मात्र ही मंडळी हे लक्षात घ्यायला तयारच नसते की, आज यशस्वी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांनी हे यश किती कष्ट करून प्राप्त केले आहे? त्यासाठी त्यांनी आपल्या सुखाची कशी होळी केली आहे? त्यांच्या या यशाची किंमत केवळ त्यांनी एकट्यांनीच चुकविलेली नसते. त्यांचे संपूर्ण कुटुंबीय या यशाच्या यज्ञात होरपळलेले असते. लोकांना दिसते ते केवळ बाहेरचे वैभव! ते वैभव त्यागाच्या कोणत्या पायावर उभे झालेले आहे हे लोकांना कधीच कळत नाही. बऱ्याच लोकांमध्ये आपण जीवनात यशस्वी होऊ शकलो नाही याचा न्यूनगंड असतो. एक अपराधीपणाची भावना असते. मात्र यशस्वी होण्यासाठी जे कष्ट उपसावे लागतात, जो त्याग करावा लागतो त्यासाठी त्यांची तयारी नसते हा भाग वेगळा. असेच लोक मग यशस्वी लोकांच्या यशामध्ये काहीतरी खोट शोधण्याच्या उद्योगाला लागतात. आपण यशस्वी होऊ शकलो नाही म्हणजे इतर कुणालाच यशस्वी होण्याचा अधिकार नाही, ही विकृत विचारसरणी अलीकडील काळात फार बोकाळत चालली आहे. त्यातूनच यशस्वी लोकांचे यश डागाळण्याचा विकृत प्रयत्न केला जातो. एखादा माणूस यशस्वी झाला असेल तर तो त्याच्या प्रामाणिक प्रयत्नाने यशस्वी झाला हे मान्य करायला सहसा कुणी तयार होत नाही. आपला नालायकपणा झाकण्यासाठी त्यांना तसे करावेच लागते. काहीतरी दोन नंबरचे काम करूनच हा मोठा झाला असला पाहिजे हा सरसकट केल्या जाणारा आरोप आहे. दुर्दैवाने अशी मानसिकता असणाऱ्या लोकांचे प्रमाण समाजात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोकांना यश हवे असते; परंतु इतरांनी मिळविलेले यश मात्र त्यांच्या डोळ््यांत खुपते. त्यातूनच यशस्वी माणसाचे पाय ओढण्याचे उपद्व्याप केले जातात. यशस्वी माणसाचा हेवा करणे, त्याचा मत्सर करणे हे निकोप मानसिकतेचे लक्षण खचितच म्हणता येणार नाही. दुर्दैवाने आज ही मानसिकता वाढत आहे. यशस्वी माणसाच्या यशामागील कठोर परिश्रम, त्याग लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे; परंतु तसे होत नाही. लोकांची भूमिका पलायनवादी असते. आपल्या अपयशासाठी दुसऱ्याला जबाबदार धरणे किंवा यशस्वी माणसाचे यश दुसऱ्याच्या मेहरबानीचे अथवा नशिबाचे फळ असल्याचे सिद्ध करणे लोकांना जास्त आवडते. सॉक्रेटिसला एका तरुणाने यशाचे रहस्य विचारले होते. सॉक्रेटिस त्या तरुणाला नदीत घेऊन गेला आणि त्याचे डोके पाण्याखाली दाबून धरले. त्या तरुणाने खूप तडफड केली. शेवटी अगदी त्याचा जीव जाण्याच्या बेतात असताना सॉक्रेटिसने त्याला पाण्याबाहेर काढले आणि विचारले, ”पाण्यात असताना तुला सर्वाधिक गरज कशाची वाटली?” त्या तरुणाने अर्थातच ”हवेची” हे उत्तर दिले. त्यावर सॉक्रेटिस त्या तरुणाला म्हणाला, ” पाण्याखाली असताना ज्या तीपतेने तुला हवेची गरज भासत होती त्याच तीपतेने जेव्हा तुला यशाची ओढ लागेल तेव्हा यश मिळविण्यासाठी फारसे वेगळे प्रयत्न तुला करावे लागणार नाहीत. त्या परिस्थितीत तू जे काही करशील ते तुला यशच देऊन जाईल.” यशाची अशी तीप ओढ ज्यांच्यात निर्माण होत नाही ते कधीच यशस्वी होत नाहीत. अशी माणसं सदैव आशाळभूतपणे वाट पाहण्यातच आपले आयुष्य गमावतात आणि त्यांच्या वाट्याला यशस्वी लोकांनी अनावश्यक म्हणून मागे सोडलेल्या गोष्टींव्यतिरिक्त काहीही येत नाही.

— प्रकाश पोहरे

प्रकाशन दिनांक : 16/4/2006

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..