नवीन लेखन...

धार्मिक उन्माद

या काळात संख्येने कमी असलेल्या पोलिसांवर प्रचंड दडपण येते. या दडपणापायी बरेच पोलिस आत्महत्या करतात आणि बऱ्याच पोलिसांचे मानसिक संतुलन बिघडते. सामान्य नागरिकही त्यातुन सुटत नाहीत. दसऱ्यानंतर थोडे लक्ष ठेवून बघितल्यास अशा अनेक केसेस आपल्याला आढळून येतील. या सगळ्या प्रकारात सर्वाधिक हाल बिचाऱ्या पोलिसांचेच होत असतात. इतर कोणत्याही सरकारी विभागापेक्षा पोलिस विभाग सर्वाधिक तणावात असतो, सर्वाधिक काम याच विभागाला करावे लागते आणि सर्वाधिक जाचही याच विभागाला असतो. वास्तविक पोलिसांचे मुख्य काम समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे असते चोरांना पकडायचे असते. परंतु पोलिसांचा बहुतेक वेळ अशा फालतु बंदोबस्तातच जातो. उरलासुरला वेळ ‘व्हिआयपीं’च्या बडेजावात खर्च होतो. गुन्हेगारांकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळच उरत नाही आणि त्यातही थोडे काही चुकले की बोट दाखवायला किंवा कापायलाही मग बिचारे पोलिसच असतात.

माणूस उत्सवप्रिय प्राणी आहे. आनंद व्यत्त* करायला त्याला आवडतो आणि त्यासाठी तो कारणे शोधत असतो, निमित्त शोधत असतो. खळखळून हसण्याची देणगी निसर्गाने केवळ मानवालाच दिली आहे. त्यामुळे अर्थातच हसण्याच्या, आनंद साजरा करण्याच्या संधीही त्याच्या जीवनात खूप येतात. कुणी ती संधी घेतो किवा बरेचसे लोक दूर्मूखलेल्या चेहऱ्यांनी ती संधी घालवतात. आपल्या या उत्सवप्रियतेला आता कुठेतरी शिस्त लागायला पाहिजे. आपला आनंद दुसऱ्यासाठी त्रासदायक ठरू नये याची जाणिव प्रत्येकाने बाळगणे गरजेचे ठरू पहात आहे. परवा मुंबईला असतांना नरिमन पॉइंटवरून प्रभादेवीकडे निघालो. एरवी अर्धा-पाऊण तासात हे अंतर पार पाडता येते, परंतु मरीन ड्राईव्हपासूनच ट्रॅफिक जॅम लागला. दोन तास या जॅममध्ये अडकल्यानंतर शेवटी गिरगाव चौपाटीजवळ गाडी सोडली आणि टॅक्सीने ताडदेवच्या मार्गने जाण्याचा प्रयत्न केला. थोडे अंतर जाताच टॅक्सीही नानाचौकात ट्रॅफिकमध्ये अडकली. शेवटी टॅक्सीही सोडली आणि मध्येच एक बस पकडली मात्र ती सुद्धा सोडावी लागली आणि पायीच निघालो. भेटीची वेळ पाळणे भाग होते. ट्रॅफिक जामचे कारण पुढे गेल्यावर लक्षात आले. हाजी अली चौकात ईदमुळे प्रचंड गर्दी झाली होती. तसा हा चौक चांगला प्रशस्त आहे. गर्दी झाली तरी रहदारीवर इतका प्रतिकूल परिणाम होत नाही. परंतु गर्दीला शिस्त नव्हती. तिला शिस्त लावण्याकरता पोलिसांची दमछाक सुरू होती मात्र वाहतुकीची जी कोंडी व्हायला नको ती मात्र होतच होती. आजकाल हे नित्याचेच झाले आहे. देवी असो, गणपती असो किंवा अन्य कुठलाही सार्वजनिक धार्मिक उत्सव असो. लोकांमध्ये एकप्रकारचा उन्माद दिसून येतो. लोक आपल्याच धुंदीत असतात. आपल्यामुळे इतरांना काही त्रास होत असेल याची त्यांना जाणिवही नसते. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यातही हाच अनुभव आला. चौकाचौकात लाऊडस्पीकरच्या टेकडीचा म्हणजेच डीजेचा कर्णकर्कश्श आवाज. इतके प्रचंड ध्वनिप्रदूषण की वातानुकूलीत गाडीच्या काचा बंद केल्यावरही गाडीतील लोकांना आपसात बोलणे शक्य होत नव्हते. सोबतच्या आमच्या पुण्याच्या प्रतिनिधीने सांगितले की काही दिवसांपूर्वी या भयानक आवाजामुळे हार्टफेल होऊन एका महिलेचा रस्त्यातच मृत्यु झाला होता. या प्रचंड गोंगाटाची खरेच काही आवश्यकता असते का? प्रचंड गर्दी, रेटारेटी करण्यात काही अर्थ असतो का? धार्मिक श्रद्धा हा वेगळा विषय आहे. या सगळ्यांचा संबंध धार्मिक श्रद्धेशी कुठेच येत नाही. मांगल्याचे प्रतीक म्हटलेल्या गणपतीचे केवळ दहाच दिवस मंगलमय असतात का? देवीचे महात्म्य नऊच दिवस असते का? कुठल्याही भोंग्याशिवाय त्यांच्यापर्यंत लोकांच्या प्रार्थना पोहचतच नाहीत का? मग याच दिवसांमध्ये इतका गोंधळ, इतकी गर्दी, इतकी रेटारेटी करण्याचे कारणच काय? उत्साह एकवेळ समजून घेता येईल, परंतु त्याला काही धरबन्ध हवा. त्याला एक निश्चित मर्यादा हवी. तुमच्या उत्साहाला इतरांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करण्याची परवानगी नाही. सध्या सगळीकडेच रासगरबाचा जल्लोष सुरू आहे. गुजरात व मुंबईत तर तो अतीच असतो. कर्णकर्कश्श आवाज, भव्य रोषणाई, मोठमोठ्या कंपन्यांचे बॅनर्स, बेधुंद संगीताच्या तालावर नाचणारी तरुण मुले मुली व आबाल-थोर आणि त्यांच्या उत्साहाला अधिकच वेडे करणारी ‘स्टार’ मंडळी आणि अर्थातच विजेचा प्रचंड अपव्यय. मुंबईत सध्या हेच दृष्य ठायी ठायी पाहायला मिळत आहे. तिकडे उर्वरित महाराष्ट्र अंधारात खितपत असताना इकडे नाचण्या-उडण्यासाठी वीज अक्षरश: उधळली जात आहे. हे संपत नाही तोच धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त बौद्ध बांधवांचा सागर नागपूर, मुंबईत उसळेल. सांगायचे तात्पर्य गणपतीपासून ते थेट विजयादशमीपर्यंत सर्वधर्मीय धार्मिक उत्सवाची एक लाटच उसळत असते आणि त्यानंतर मग दिवाळी येते आणि त्यातील फटाके येतात. हे उत्सव बरेचदा केवळ उत्सव राहत नाहीत, त्यांना उन्मादाचे स्वरूप येते आणि या उन्मादाला शिस्त लावण्यासाठी पोलिस बळ अतिशय अपुरे पडते. या काळात संख्येने कमी असलेल्या पोलिसांवर प्रचंड दडपण येते. या दडपणापायी बरेच पोलिस आत्महत्या करतात आणि बऱ्याच पोलिसांचे मानसिक संतुलन बिघडते. सामान्य नागरिकही त्यातुन सुटत नाहीत. दसऱ्यानंतर थोडे लक्ष ठेवून बघितल्यास अशा अनेक केसेस आपल्याला आढळून येतील. या सगळ्या प्रकारात सर्वाधिक हाल बिचाऱ्या पोलिसांचेच होत असतात. इतर कोणत्याही सरकारी विभागापेक्षा पोलिस विभाग सर्वाधिक तणावात असतो, सर्वाधिक काम याच विभागाला करावे लागते आणि सर्वाधिक जाचही याच विभागाला असतो. वास्तविक पोलिसांचे मुख्य काम समाजात कायदा आणि सुव्यवस्था राख
ण्याचे असते चोरांना पकडायचे असते. परंतु पोलिसांचा बहुतेक वेळ अशा फालतु बंदोबस्तातच जातो. उरलासुरला वेळ ‘व्हिआयपीं’च्या बडेजावात खर्च होतो. गुन्हेगारांकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळच उरत नाही आणि त्यातही थोडे काही चुकले की बोट दाखवायला किंवा कापायलाही मग बिचारे पोलिसच असतात. अपुरे पगार, त्रोटक सुविधा आणि प्रचंड ताण ही पोलिस विभागाची वैशिष्ट्ये आहेत आणि तरीही पोलिस भरतीसाठी ठिकठिकाणी प्रचंड गर्दी उसळत असते.

तिकडे मायावतींनी उत्तरप्रदेशात एका फटक्यात शेकडो पोलिस आणि अधिकाऱ्यांना घरी बसवले. पोलिस भरतीत घोटाळे झाल्याचे कारण त्यासाठी पुढे करण्यात आले. खरे कारण वेगळेच असल्याचे बोलले जाते. मुलायम सरकारच्या काळात झालेल्या या भरतीत सपाच्या कार्यकर्त्यांचीच चांदी झाल्याचा आरोप होत होता. ‘बहेन’जींना आपल्या कार्यकर्त्यांची सोय पाहणे भाग होते. शिवाय या भरतीत जी काही देवाणघेवाण झाली होती तीही ‘बहेन’जींच्या डोळ्यात भरण्यासारखी होती. एकेकाळी पोलिस किंवा सैन्याच्या भरतीसाठी लोकांना प्रोत्साहन द्यावे लागायचे कारण कुणी हया विभागात जायला फारसे उत्सुक नसायचे आता मात्र भरती दरम्यान होणाऱ्या गर्दीकरिता बंदोबस्त लावावा लागतो. असो, एवढी बेकारी वाढली आहे. शेवटी एक मौलिक प्रश्न उपस्थित होतो. पोलिसांच्या आवाक्याबाहेर असलेल्या, शिस्त वेशीवर टांगणाऱ्या या उत्सवांच्या उन्मादाने साध्य काय होते? या उत्सवांचा निचोड काय, असा प्रश्न विचारला तर उत्तर शून्यच येते. कोणाचा काय फायदा होतो? आपल्या क्षणैक आनंदाची किंमत कोणाला मोजावी लागते, याचे भान किती लोकांना असते? आपल्या नाचण्या-उडण्यासाठी वीज अक्षरश: उधळणाऱ्या लोकांना याच विजेच्या अभावामुळे कितीतरी शेतकऱ्यांची घरे अंधारात बुडत आहेत, शेतीला पाणी देण्यासाठी त्यांना वीज मिळत नाही, याची कल्पना असते का?

खरेतर आपण आनंदोत्सव साजरा करावा अशी आपल्या देशाची स्थिती आहे का? अर्धी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. शेतकरीवर्ग प्रचंड आर्थिक विवंचनेत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अखंडपणे सुरूच आहेत तर तिकडे मेळघाटात कुपोषणाने थैमान घातले आहे. आणि दुसरीकडे आपल्या खिशात चार पैसे खुळखुळतात म्हणून आपण निमित्त शोधून आनंदोत्सव साजरे करतो, परंतु त्याचवेळी कोरभर भाकरीच्या प्रश्नाने हैराण होऊन आयुष्य संपविणाऱ्यांचा विचार आपल्याला अस्वस्थ करतो का? या उन्मादाला मानवी चेहरा असतो का? सण साजरे करण्याची मानसिकता आपल्या मनात इतक्या खोलवर रूजली आहे की गरीब लोकही प्रसंगी ऋण काढून सण साजरे करताना दिसतात. खरोखरच याची गरज आहे का? आनंद साजरा करणे मानवाची सहजस्फुर्ती असली तरी कारण आणि परिस्थिती नसताना आनंद साजरा करणे उन्माद ठरत नाही का?

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..