अश्मयुगात रानोमाळ भटकणारा, शिकार करून कच्चे मांस खाऊन जगणारा माणूस शेतीचे प्राथमिक ज्ञान मिळाल्यावर स्थिर झाला. आधी त्याचे हे संघटन टोळ्यांच्या स्वरूपात होते. पुढे या संघटनेला अधिक रेखीव स्वरूप प्राप्त झाले आणि समाजाची निर्मिती झाली. अश्मयुगातील मानवाची बुद्धी आपल्या प्राथमिक गरजा भागविण्याइतकीच विकसित होती. स्थिरता आणि त्यातून लाभलेल्या सुरक्षिततेमुळे पुढे मानवी बुद्धीचा विकास झपाट्याने होऊ लागला. विकासाची नवी-नवी दालने उघडली जाऊ लागली. त्यातूनच कामाच्या वाटणीची व्यवस्था निर्माण झाली. अंगभूत गुण, बुद्धीचा कल आणि शारीरिक क्षमता या मुख्य निकषावर कामाची वाटणी होऊ लागली. पुढे ज्याला वर्णव्यवस्था म्हणून संबोधल्या गेले त्याची ही प्राथमिक सुरुवात होती. वर्णव्यवस्थेची ही सुरुवात निखळ नैसर्गिक तत्त्वावर अवलंबून होती. सशक्त आणि तंदुरुस्त लोकांकडे समाजाच्या किंवा टोळीच्या संरक्षणाचे काम दिले जात असे. त्यांच्या इतर गरजा समाजातील उर्वरित घटकांकडून पूर्ण केल्या जात असत. तरतरीत बुद्धीच्या लोकांवर अध्ययन आणि अध्यापनाची जबाबदारी सोपविली जात असे. पोटापाण्याच्या चिंतेत गुरफटल्यामुळे नियोजित कामाकडे दुलर्क्ष होऊ नये म्हणून या वर्गाच्या पोटापाण्याचा भार इतरांनी उचलावा असा संकेत होता. ब्राह्यणाला दान, दक्षिणा देण्याच्या परंपरेची ती सुरुवात होती. व्यापार- उदीम, देवाण-घेवाण ही जबाबदारी काही विशिष्ट लोकांकडे सोपविली गेली. इतर कामे उर्वरित लोकं करायचीत. हे एकाच पातळीवरील गुणकर्मश: विभाजन होते. उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ असा विचार नव्हता. आपल्या अंगभूत क्षमतेनुसार कुणीही ब्राह्यण, क्षत्रिय किंवा वैश्य होऊ शकत होता. या तिन्ही वर्गवारीत न बसणाऱ्या लोकांकडे सेवा स्वरूपाची कामे सोपविली जात असत. ही विभागणी केवळ सुव्यवस्थेच्या दृष्टीन
े करण्यात आली होती. या वेगवेगळ्या वर्णांना त्यावेळी बंदिस्त स्वरूप प्राप्त झाले नव्हते. एखाद्या वैश्याचा मुलगा आपल्या गुणवत्तेच्या जोरावर ब्राह्यण होऊ शकत होता, तर अंगापिंडाने मजबूत असलेला एखाद्या ब्राह्यणाचा मुलगा क्षत्रियाचे
काम करायचा. थोडक्यात ही वर्णव्यवस्था व्यक्तीच्या
गुण आणि कौशल्यावर आधारित होती, परंतु पुढे या व्यवस्थेला अतिशय बंदिस्त स्वरूप प्राप्त झाले. सुरुवातीला एका पातळीवरील ही विभागणी नंतर चार श्रेण्यांमध्ये विभाजित झाली. ब्राह्यण वर्ग स्वत:ला श्रेष्ठ समजू लागला. समशेर गाजविण्याची मक्तेदारी क्षत्रिय वर्गाकडे आली. ब्राह्यण आणि क्षत्रियांनी कधी व्यापार, व्यवसायात लक्ष घातले नाही. ते क्षेत्र वैश्यांच्या मक्तेदारीचे ठरले. शुद्रांची अवस्था तर अधिकच केविलवाणी झाली. नंतरच्या काळात या विभागणीला इतके कर्मठ स्वरूप प्राप्त झाले की, ब्राह्यणांनी अध्ययन- अध्यापन हे क्षेत्र आपल्या जातीपुरते मर्यादित करून ठेवले. वेद-पुराणातील ज्ञानाची गंगा या वर्णाने आपल्यापुरती मर्यादित करून ठेवली. बहुजन समाजाला या गंगेचे पाणी कधीच चाखायला मिळाले नाही. विशेष म्हणजे शेकडो वर्षे ही अन्याय्य विभागणी कायम राहिली. संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनादेखील सुरुवातीच्या काळात त्यांच्याच समाजबांधवांकडून अतिशय त्रास झाला. कर्मठतेचा हा कडेलोट केवळ स्वार्थातून उभा झाला होता. हा स्वार्थ जोपासण्यासाठीच ज्ञानाच्या जोरावर समाजातील आपले सर्वोच्च स्थान शेकडो वर्षे ब्राह्यण समाजाने टिकवून ठेवले. या स्थानाला धक्का पोहचू नये म्हणून बहुजन समाजाला अतिशय हुशारीने शिक्षणापासून वंचित ठेवले. अगदी विसाव्या शतकापर्यंत ही परिस्थिती कायम होती. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निद्रिस्त बहुजन समाजाला जागे केले. त्यांच्याच प्रयत्ना
ून हळूहळू का होईना परंतु ज्ञानाची कवाडे बहुजनांसाठी खुली झाली. निखळ स्वार्थाच्या पायावर उभी असलेली एक अन्याय्य व्यवस्था हळूहळू मोडकळीस आली. आज शिक्षणाचा लाभ सगळ्यांनाच मिळतो आहे. ज्यांच्यात बौद्धिक कुवत आहे त्यांच्या प्रगतीला आता कुणी खीळ घालू शकत नाही. शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर एक वर्णव्यवस्था जवळपास उद्ध्वस्त झाली आहे, परंतु त्याचवेळी एक नवी वर्णव्यवस्था उभी होऊ पाहात आहे. या वर्णव्यवस्थेचा संबंध जाती-उपजातीशी नाही.
मानवाचे 21 व्या शतकातील पाऊल अत्याधुनिक संगणक युगातील पहिले पाऊल ठरले. शिक्षण सार्वत्रिक आणि सहज उपलब्ध झाल्यामुळे शिक्षितांची संख्या प्रचंड वाढली. परंतु या शिक्षितांना 21 व्या शतकात कितपत किंमत राहील, हा संशोधनाचाच विषय आहे. पूर्वी शिक्षणाचा संबंध लिहिणे आणि वाचणे या दोन बाबींशीच निगडित होता. आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. केवळ लिहिता- वाचता येणाऱ्याला सुशिक्षित म्हणवून घेणे, या संगणक युगात शक्य नाही. लिहिता- वाचता येणे, हा काही आता शिक्षित समजल्या जाण्याचा निकष उरलेला नाही. शिक्षितांमध्ये एक नवा वर्णवाद आता निर्माण झाला आहे. संगणकाचे ज्ञान आणि तंत्र अवगत असलेल्यांनाच आता खऱ्या अर्थाने शिक्षित समजले जात आहे. संगणकाचे ज्ञान नसलेल्या सुशिक्षितांची गणना सरळ सरळ पढत मूर्खांमध्ये केली जात आहे आणि ते स्वाभाविकही म्हणावे लागेल. आज संगणकाने अवघे मानवी जीवन व्यापून टाकले आहे. सर्वच क्षेत्रात संगणकाचा वापर अत्यावश्यक आणि अनिवार्य ठरला आहे. व्यापाऱ्यांच्या महाजनी चोपड्या केव्हाच संगणकाच्या फ्लाॅपीमध्ये विलीन झाल्या आहेत. टंकलेखन यंत्रे केवळ स्मारक बनून उरली आहेत. व्यापारी देवाण-घेवाण करणारी ‘ई कॉमर्स’, बँकांमध्ये व्यवहार करणारी ‘ई बँकिंग’, हिशेब- जमाखर्च हाताळणारी ‘ई-अकाऊंटिंग’, परस्परात संवाद घडवून आण
ारी ‘ई-मेल’, ‘ई-चॅटिंग’ आदी व्यवस्थांनी या आधीच्या सर्वच व्यवस्था उखडून फेकल्या आहेत. लवकरच लिहिणे हा प्रकारही मोडीत निघण्याची शक्यता आहे. चित्रकारी, सुलेखन आदी कलांनाही संगणकाने गिळणे सुरू केले आहे. संगणक युगाची ही क्रांती अतिशय झपाट्याने जुन्या सगळ्याच व्यवस्थांना गिळंकृत करत आहे. अशा परिस्थितीत आमचे केवळ शिक्षित असणे संगणकाचे ज्ञान नसेल तर मातीमोलाचे ठरणार आहे. त्यातूनच एक नवी वर्णव्यवस्था उभी होत आहे. या व्यवस्थेत संगणक तज्ज्ञ शिखरावर आहेत. त्यांच्या खाली श्रेणीबद्ध पद्धतीने सुशिक्षित, अल्पशिक्षित, अशिक्षित लोकांचा समावेश आहे. जुनी वर्णव्यवस्था मोडून काढायला आम्हाला शेकडो वर्षे लागली. शेवटी ती व्यवस्था मोडण्यात आम्हाला यश आले
ते केवळ याचमुळे की, ती व्यवस्था मानवनिर्मित होती. ही नवी व्यवस्था
मोडण्याचा प्रश्नच नाही. ही कुठल्याही अन्याय्य पायावर उभी असलेली मानवनिर्मित व्यवस्था नाही. ही व्यवस्था बंदिस्तही नाही, त्यामुळेच ती मोडण्याची गरजही नाही. या व्यवस्थेत सगळ्यांनाच वरच्या श्रेणीत जाण्याची मुभा आहे, नव्हे जो वरच्या श्रेणीत जाऊ शकेल तोच जगाच्या व्यवहारात टिकू शकेल. इथे प्रत्येकाला ‘ब्राह्यण’ व्हावेच लागेल. सुशिक्षित, अल्पशिक्षित किंवा अशिक्षित या आपापल्या श्रेणीत समाधान मानणाऱ्यांना या व्यवस्थेत माफी नाही. खरे तर या व्यवस्थेत दोनच वर्ण आहेत, एक संगणक शिक्षितांचा आणि दुसरा संगणकाचे ज्ञान नसलेल्यांचा. या दुसऱ्या वर्गात सुशिक्षितांपासून अशिक्षितांपर्यंत सगळ्यांचाच समावेश होतो. इथे ब्राह्यण-बहुजन हा वाद नाही. सगळ्याच बहुजनांना ब्राह्यण होण्याची संधी आहे. गरज आहे ती फक्त संगणकाचे महत्त्व जाणून घेण्याची. जग झपाट्याने पुढे जात आहे, त्याच झपाट्याने शिक्षणाचाही प्रसार होत आहे. अशा परिस्थितीत शिक्षणाची आपली संकल्पना केवळ
लिहिता -वाचता येण्यापुरती मर्यादित राहिली तर जगाच्या जीवघेण्या स्पर्धेत आपला निभाव लागणे कठीणच. तुमचे पुस्तकी शिक्षण किती झाले याला आता महत्त्व उरलेले नाही. पुस्तकी शिक्षण शून्य असेल आणि संगणक हाताळण्याचे मात्र पुरेसे ज्ञान असेल तरी तुम्ही सुशिक्षित ठरता कारण जगाचे सगळे व्यवहारच आता संगणकाच्या माध्यमातून होऊ लागले आहेत. त्यामुळेच जुनी वर्णव्यवस्था मोडून काढणाऱ्यांसमोर आता या नव्या वर्णव्यवस्थेचे आव्हान उभे ठाकले आहे. जुन्या व्यवस्थेविरुद्धच्या लढ्यात प्रतिपक्षात कुणीतरी होते म्हणून तो लढा सहज लढता आला. हा नवा लढा मात्र स्वत:शीच लढायचा असल्याने, खरी कसोटी आता आहे. संगणकाने उभे केलेले वर्णवादाचे हे नवे आव्हान आम्हाला स्वीकारावेही लागेल आणि पेलावेदेखील लागेलच. या वर्णव्यवस्थेतून सुटका कोणाचीच नाही.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply