नवीन लेखन...

नवा विचार नवी दिशा!

एका विज्ञानकथेत कथालेखकाने अशी कल्पना मांडली होती की, एक दिवस वाढत्या प्रदूषणामुळे मानवाचे पृथ्वीवर म्हणजेच जमिनीवर राहणे अशक्य होईल आणि संपूर्ण मानवी वस्ती पृथ्वीच्या पोटात स्थलांतरित होईल. पृथ्वीच्या पोटात 10 ते 20 फूट खाली जाऊन वस्ती करून राहणे माणसाला भाग पडेल. वातावरणात संरक्षक आवरण म्हणून काम करणाऱ्या ओझोन वायूचा स्तर फाटल्यामुळे सूर्याची अतिनील (अल्ट्राॅ व्हायोलेट) किरणे सरळ पृथ्वीवर येतील, या किरणांचा सामना करणे तसेच वाढत्या तापमानाशी जुळवून घेणे शक्य न झाल्यानेच मानवाला पृथ्वीच्या पोटात आसरा घ्यावा लागेल. निशाचर प्राण्यांप्रमाणे केवळ रात्रीच्या वेळी माणसं जमिनीवर वावरतील. अर्थात तो एका कथालेखकाचा कल्पनाविलास असला तरी सध्या पर्यावरणाची ज्या पद्धतीने हेळसांड सुरू आहे, त्याच पद्धतीने आणि गतीने ती सुरू राहिली तर त्या कथालेखकाचा कल्पनाविलास प्रत्यक्षात साकार व्हायला वेळ लागणार नाही. वैज्ञानिक प्रगतीचा आपल्या भौतिक सुखासाठी वापर करून घेण्याची प्रवृत्ती प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यातूनच निव्वळ सुखोपभोगासाठी नव्या नव्या उपकरणांचा शोध लावल्या जात आहे. या उपकरणांचा किंवा साधनांचा वापर करताना जीवसृष्टीच्या नैसर्गिक चक्राला आपण बाधा तर आणत नाही ना, याचा विचारही केल्या जात नाही. त्याचा परिणाम निसर्गाचे संतुलन बिघडण्यात होत आहे. पावसाचे कमी झालेले प्रमाण, वाढत चाललेली अनियमितता तसेच संथ परंतु स्थिर गतीने वाढत असलेले पृथ्वीचे तापमान याचा संबंध निश्चितच मानवी उपद्व्यापाशी जुळलेला आहे. प्रगतीच्या नावाखाली निसर्गाच्या, पर्यावरणाच्या समतोलाशी जो खेळ आपण मांडला आहे, त्याचेच हे परिणाम. पूर्वीच्या काळी पृथ्वीला माता मानले जायचे. अगदी शेतात नांगर टाकण्यापूर्वी पृथ्वीची क्षमा याचना केली जायची. आजदेखील खेड्यापाड्यातील वृद्ध लोक झाडांची झोप मोडते म्हणून आपल्या नातवांना सायंकाळच्या वेळी झाडांना हात लावू देत नाहीत. कदाचित हे कारण वैज्ञानिक नसेलही परंतु निसर्गाशी, पर्यावरणाशी मायेच्या भावनेने ही मंडळी जुळलेली असतात, हेच त्यावरून सिद्ध होते. आयुर्वेदात देखील वनस्पती तोडण्यापूर्वी वैद्य लोकांनी त्या वनस्पतीची आधी क्षमायाचना करावी, असे सांगितले आहे. ‘तुमच्यातही जीव आहे, परंतु मानवाचा जीव वाचविण्यासाठी तुमची गरज आहे म्हणून मी तोडीत आहे’ अशा शब्दात वनस्पतीची क्षमायाचना केली जायची आणि अगदी आवश्यक असेल तेवढाच भाग तोडला जायचा. सांगायचे तात्पर्य त्या काळी मनुष्यप्राणी स्वत:ला निसर्गाचा, पर्यावरणाचा एक घटक समजायचा. परंतु अलीकडील काळात आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर निसर्गावर मात करण्याची धुंदी मानवाला चढली आहे. वेगवेगळ्या शोधांद्वारे नैसर्गिक व्यवस्थेला पर्याय उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मानवी जीवन सुखमय करण्याचा त्यामागे उद्देश असला तरी, हा प्रयत्न निसर्गाशी जुळवून घेणारा असता तर अधिक प्रभावी आणि श्रेयस्कर ठरला असता, परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही. नैसर्गिक संतुलनाकडे आम्ही साफ दुलर्क्ष केले. औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात झाले, परंतु त्याचवेळी या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या विषाक्त रासायनिक द्रव्यांची किंवा धुराची योग्य विल्हेवाट लावण्याची दक्षता आम्ही घेतली नाही. पेट्रोलियम पदार्थांचा वापर प्रचंड वाढला, परंतु त्यातून निर्माण होणाऱ्या धुराचे परिणाम समजून घेण्याची गरज आम्हाला कधी वाटली नाही. आम्ही प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केली, परंतु त्याचवेळी वृक्षारोपणाचे महत्त्व आम्हाला कळले नाही. या नादानपणाचा परिपाक म्हणून आज आमच्यासमोर प्रदूषणाचे विश्वव्यापी संकट उभे ठाकले आहे. कारखान्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे ओझोन वायूच्या थराला ठिकठिकाणी भगदाड पडू लागले आहेत. अपरिमित जंगलतोड झाल्याने नैसर्गिक ऋतुचक्रच विस्कळीत झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका जागतिक परिषदेत या संदर्भात संपूर्ण जगाला गंभीर इशारा देण्यात आला. पृथ्वीचे सरासरी तापमान दोन ते तीन सेंटीठोडने जरी वाढले तरी ध्रुवीय बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी तीन फुटांपर्यंत वाढू शकते आणि तसेच झाल्यास समुद्र किनाऱ्यावरील अनेक शहरे, बेटे समुद्राच्या पोटात गडप होण्याची भीती या परिषदेत व्यक्त करण्यात आली. ध्वनिप्रदूषणही इतके वाढले आहे की, शहरातील लोक आता जवळपास वेडे होण्याच्या स्थितीत पोहचले आहेत. कारखान्याच्या सांडपाण्यामुळे पिण्याचे पाणी प्रदुषित होत आहे. आमची पुण्यसरिता गंगा तर केव्हाच मैली झाली आहे. मानवाला उपयुक्त असलेल्या पशुंचीही केवळ सुखोपभोगासाठी क्रूर कत्तल करण्यात येत आहे. एकूणच संपूर्ण जैविक सृष्टीच मानवाच्या विकासाच्या वेड्या कल्पनेला बळी पडत आहे. या संदर्भात प्रख्यात साहित्यिक बट्रार्ंड रसेलची प्रतिक्रिया अगदी मार्मिक म्हणावी लागेल. आपल्या ‘एम्गहम र्ीह् ग्ूे ग्स्ज्र्ीम्ू दह ेदम्गूब्’ या ठांथात रसेलने म्हटले आहे की, ‘आज माणूस हा मानवी कौशल्य आणि मानवी मूर्खपणा या दोन वास्तवांमध्ये जगतो आहे. जर मानवाच्या कौशल्यांबरोबरच त्याची समजशक्ती वाढली नाही तर वाढत्या विकासाचा शेवट वाढत्या दु:खामध्येच होईल.’ या पृष्ठभूमीवर भौतिक विज्ञानाचे फायदे मिळविण्यासोबतच निसर्गाशीही अनुकूलता साधता येणार नाही का, या दृष्टीने विचार होणे महत्त्वाचे आहे. पृथ्वीचे वाढते तापमान या दृश्य परिणामामागची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न केल्यास कुठेतरी यासाठी मानवाची भौतिक सुखाची अत्याधिक लालसा कारणीभूत असल्याचे लक्षात येते. साधे एअर कंडिशनरचे उदाहरण घेतले तरी हा प्रकार समजून घेता येईल. आज जगात अक्षरश: कोट्यवधी एअर कंडिशनर यंत्राचा वापर होतो. खोलीचे तापमान कमी करणारे हे यंत्र त्याचवेळी बाहेरचे तापमान त्याच प्रमाणात वाढवीत असते. बाहेरचे तापमान वाढले की खोलीचे तापमान अजून कमी करावे लागते आणि खोलीचे तापमान कमी करण्यासाठी ज्या साधनाचा उपयोग होतो त्यातून बाहेरचे तापमान अजूनच वाढते. अशाप्रकारे नैसर्गिक संतुलन बिघडविणारे हे दुष्टचक्र सुरूच राहते. आज पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनाचा वापर अनिवार्य ठरला आहे, परंतु याचा अर्थ पेट्रोल-डिझेल अनिर्बंधपणे वापरावे असाही होत नाही. अगदी आवश्यक असेल तेव्हाच मोटारगाड्यांचा वापर केला पाहिजे, परंतु ते भान आम्हाला नाही. डिझेलच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या कार्बन मोनाक्साईड, सल्फरडाय ऑक्साईडसारख्या घातक वायुमुळे हवेतील ऑक्सीजनचे प्रमाण कमी होते. कार्बन मोनाक्साईडचा एक रेणू ऑक्सिजनचे 200 अणू संपवितो. हे आमच्या लक्षात कधी येणार? घराबाहेर पडताना ऑक्सिजनचे नळकांडे सोबत घेऊन जाण्याची वेळ येईपर्यंत तरी आम्हाला जाग येणार नाही. भविष्यातली ही भयावह परिस्थिती टाळायची असेल तर एक प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे? आपण अनेकदा पर्यावरण सप्ताह साजरा करतो, या सप्ताहात जर जगातील सर्व वातानुकूलित यंत्रे, सर्व मोटारगाड्या, सर्व जनरेटर तसेच धूर ओकणाऱ्या व उष्णता प्रसारित करणाऱ्या सर्व भट्ट्या बंद ठेवून, त्यानंतर तापमानात कसा बदल होतो हे पाहायला काय हरकत आहे? वास्तविक या समस्येवर एकमात्र उपाय म्हणून नैसर्गिक पद्धतीने उपलब्ध होणाऱ्या इंधनाचा वापर अनिवार्य आहे. संपूर्ण जीवसृष्टीला ऊर्जा पुरविणारा सूर्यासारखा महत्त्वाचा इंधनस्त्रोत आमच्याकडे असतानाही आम्ही पर्यावरणाचा नाश करणाऱ्या इंधनाच्या मागे का लागतो हे एक कोडेच आहे. भारतात तर सौरऊर्जा विपुल प्रमाणात उपलब्ध होऊ शकते. परंतु आमच्या नियोजनकर्त्यांच्या ते कधीच लक्षात आले नाही. ऊर्जेच्या संदर्भात नियोजन करताना सरकारने आधी 60 टक्के अन्य मार्गाने व 40 टक्के जलविद्युत असे प्रमाण धरले होते. हे आमच्या नियोजनाचेच फलित असावे की, आता जलविद्युतचे प्रमाण 22 टक्क्यावर घसरले आहे. 50 वर्षाच्या नियोजनाने आम्हाला लोडशेडिंगमध्ये ढकलले आहे. सौरऊर्जा आणि पवनऊर्जा हे ऊर्जेचे स्त्रोत होऊ शकतात हेच आमच्या लक्षात आले नाही. सौरऊर्जेच्या दृष्टीने युरोपीय देशांमधील परिस्थिती प्रतिकूल असली तरी तिथे प्रचंड संशोधन सुरू आहे. आम्ही मात्र उकडू लागले की, एसी ऑन करून स्वस्थ बसतो. महाराष्ट्राचाच विचार केल्यास हा प्रदेश अनेक युरोपीय देशांपेक्षा मोठा आहे. जर्मनीचे क्षेत्रफळ महाराष्ट्रापेक्षा अधिक नाही. परंतु आज जर्मनीत केवळ पवन ऊर्जेपासून जवळपास 10 हजार मेगावॅट वीज प्राप्त केली जाते. चीनमध्ये 80 हजार छोटी-छोटी धरणे बांधण्यात आली आहेत आणि त्या प्रत्येक धरणावर जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून चीन आज 1 लाख 25 हजार मेगावॅट विजेचे उत्पादन करतो. जपानमध्ये भारताच्या तुलनेत निम्या प्रमाणात सौरऊर्जा उपलब्ध होते, तरी तिथे सौरऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. युरोपात तर भारताच्या तुलनेत 38 टक्केच सौरऊर्जा उपलब्ध होते, तरी तिथे या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर केल्या जातो. वाढत्या प्रदूषणाला आणि तापमानाला प्रतिबंध घालायचा असेल तर सौर, जल आणि पवन ऊर्जेच्या वापराला पर्याय नाही. या ऊर्जेचा वापर विद्युत ऊर्जा म्हणून जसा करता येतो तसेच या ऊर्जेद्वारे वाहनेसुद्धा रस्त्यावर धुर न ओकता धावू शकतील. प्रश्न आहे तो केवळ एवढाच की, या दिशेने प्रयत्न केव्हा सुरू होतील? नैसर्गिक वायू, तेल आणण्यासाठी इराणमधून पाईपलाईन टाकण्याची आणि त्यापोटी हजारो कोटी खर्च करण्याची आमची तयारी आहे. मात्र स्थानिक शेतकऱ्यांना योग्य किंमत देऊन आणि त्यांना प्रवृत्त करून शेती उत्पादनातून बायोडिझेल किवा इथेनॉल निर्मितीकरिता आम्ही फारसे प्रयत्न करीत नाही. तसेच सूर्याच्या उष्णतेवर चालणारी सौरघट, सौर तापक सारखी केवळ एकदाच गुंतवणूक करावी लागणारी साधने विपुल प्रमाणात निर्माण करण्याकडे आम्ही लक्ष देत नाही. या देशाची संपूर्ण ऊर्जा गरज भागविण्याची क्षमता शेतीमालात तसेच जलस्त्रोतात आणि सूर्याच्या उष्णतेत आहे. सौरऊर्जेच्या बाबतीत ‘घेता किती घेशील, दो कराने’ अशी आपली अवस्था आहे. परंतु नियोजन आणि दूरदृष्टीच्या बाबतीत फाटक्या असलेल्या आपल्या झोळीत हे दान पडणार तरी कसे?

— प्रकाश पोहरे

प्रकाशन दिनांक :- 24/07/2005

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..