नवीन लेखन...

पाकच्या नांग्या ठेचायला हव्या!





मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याला वीस दिवस उलटून गेले. या वीस दिवसात आम्ही काय केले, तर देशाच्या गृहमंत्र्याचे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे तसेच गृहमंत्र्याचे राजीनामे घेतले. अर्थात हे राजीनामे अपेक्षितच होते. हे लोक त्या पदावर राहण्याच्या योग्यतेचे उरलेच नव्हते; परंतु केवळ या तीन राजीनाम्यातून प्रश्न सुटणार होता का? या लोकांचे राजीनामे हा आपल्या अंतर्गत राजकारणाचा भाग होता. या राजीनाम्यांमुळे पाकिस्तानवर खूप मोठा नैतिक दबाब वगैरे आला असता तर वेगळी गोष्ट होती; परंतु तसे काहीच नव्हते. मुंबईवर हल्ला करणारे अतिरेकी पाकिस्तानातून आले, ते पाकिस्तानी नागरिक आहेत, पाकस्थित दहशतवादी संघटनांशी त्यांचे संबंध आहेत, हे पहिल्याच दिवशी स्पष्ट झाल्यावर भारताने त्वरित कारवाई करणे अपेक्षित होते; परंतु पाकविरूद्ध आमचे सर्व पर्याय खुले आहेत, अशी कोरडी धमकी देण्यापलीकडे आपण काहीच केले नाही. अशा कोरड्या धमक्यांना पाकिस्तानने आजपर्यंत भीक घातलेली नाही. जे राष्ट्र साक्षात अमेरिकेशीही हुज्जत घालायला मागे पुढे पाहत नाही ते भारताच्या असल्या धमक्यांना घाबरणार आहे का? या हल्ल्याशी संबंधित सगळ्याच लोकांना भारताच्या स्वाधीन करण्याचा एक विशिष्ट मुदतीचा ‘अल्टिमेटम’ देऊन ती मुदत उलटताच पाकवर हल्ला करण्याची तयारी भारताने दाखवायला हवी होती. तेवढी हिंमत भारताला दाखविता आली नाही. शेवटी अमेरिकेने पाकला 48 तासांचा अल्टिमेटम दिला आणि पाकला त्या मुदतीच्या आत काही संबंधित लोकांना जेरबंद करण्याचे नाटक करणे, भाग पडले. जे भारताने करायला हवे होते ते अमेरिकेने केले. तिकडे पाकिस्तान सरकार भारताचा प्रत्येक आरोप मठाुरीने फेटाळत असताना आमचे संरक्षणमंत्री, परराष्ट्र व्यवहारमंत्री इकडे मुंबईत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा म्हणून आमदारांची मते
ाणून घेत होते. देशाच्या इभ्रतीपेक्षा एका राज्याच्या मुख्यमंत्र्याचे महत्त्व अधिक होते का? भारतावर झाला तसाच अतिरेकी हल्ला अमेरिकेवरही झाला होता. त्या हल्ल्यानंतर अमेरिकी

नेत्यांची भूमिका आणि या

हल्ल्यानंतर भारतीय नेत्यांची भूमिका यांचा तौलनिक विचार केला तर नेतृत्वाच्या बाबतीत भारत किती कमनशिबी आहे, हे स्पष्ट होते. अमेरिकेवर हल्ला झाल्यानंतर तेथील लोकांनी किंवा विरोधी पक्षांनी अध्यक्ष, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री किंवा न्यूयॉर्कच्या महापौरांचा राजीनामा मागितला नाही. तिथेही जनक्षोभ उसळला, परंतु तो नेत्यांविरूद्ध नव्हता तर अतिरेक्यांविरूद्ध होता. आपले नेते कर्तृत्वाच्या बाबतीत उणे नाहीत, याची अमेरिकन लोकांना खात्री होती. इथे मात्र आधी गृहमंत्र्यांचे, मुख्यमंत्र्यांचे राजीनामे मागितल्या गेले आणि कारणही स्पष्टच आहे, या कर्तृत्वशून्य लोकांमुळेच अतिरेक्यांची इथवर मजल गेली, असा ठाम विश्वास इथल्या लोकांना होता. नेतेच नालायक आहेत ही भावना ज्या राष्ट्राच्या जनतेमध्ये बळावलेली असते ते राष्ट्र परकीय आक्रमणांना तोंड देणारच कसे? अमेरिकेवर हल्ला झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बुश यांनी लगेच राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात या हल्ल्याला जबाबदार असलेल्या अतिरेक्यांना जिवंत अथवा मृत ताब्यात घेतल्याशिवाय अमेरिका स्वस्थ बसणार नाही, इतर राष्ट्रांसमोर आता दोनच पर्याय आहेत, एकतर अमेरिकेसोबत किंवा अतिरेक्यांसोबत, असा कणखर इशारा दिला आणि केवळ इशाराच दिला नाही तर लादेन अफगाणिस्तानात आहे हे स्पष्ट होताच कुणाच्याही विरोधाची पर्वा न करता अख्खा अफगाणिस्तान भाजून काढला. अमेरिकेचे हे युद्ध अजूनही सुरूच आहे. मुंबईवरील हल्ल्यानंतर आमचे पंतप्रधान जनतेशी संवाद साधताना कुठे दिसलेच नाहीत. आमच्या सरकारने पहिले काम कोणते केले असेल त
या हल्ल्याचे प्रायोजक असलेल्या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या (आयएसआय) प्रमुखाला चौकशीत मदत करण्यासाठी भारतात पाठविण्याची मागणी पाककडे केली. पाकिस्तानने ती साफ धुडकावून लावली. शेवटी अमेरिकेला हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर तर मुंबई हल्ल्याच्या संदर्भात भारताने काय करावे किंवा करू नये, याची सगळी सूत्रे अमेरिकेच्या हाती गेली आहेत, असेच चित्र निर्माण झाले. हल्ला भारतावर झाला, तो पाकिस्तानने केला आणि आता सगळे निर्णय अमेरिका घेत आहे. एखादे राष्ट्र इतकेही पंगू असू शकते? भारताने वीस आतंकवाद्यांची मागणी पाकिस्तानकडे केल्याचे म्हटल्या जात आहे. मुळात अशी कोणतीही मागणी भारत सरकारने औपचारिकरित्या केली नसल्याची बातमी आहे. भारताने केवळ लष्कर-ए-तोएबाच्या प्रमुखाला आपल्या ताब्यात देण्याची मागणी पाककडे केली आणि तीही विनंतीच्या स्वरूपात. सुरूवातीला तर भारताकडे भक्कम पुरावे असूनही मुंबईवर हल्ला करणारे अतिरेकी पाकिस्तानचे नाहीत, अशीच भूमिका पाक सरकारने घेतली. कोंडोलिसा राईसने कान पिरगाळताच चौकशीत सहकार्य करण्याचे तोंडदेखले आश्वासन पाक सरकारने दिले. त्यानंतर अमेरिकेच्या दबाबामुळे लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख झकी-उर-रहमान लखवी आणि जैश-ए-मोहंमद संघटनेचा प्रमुख मसूद अझहरला पाक लष्कराने ताब्यात घेतले. परंतु त्याचवेळी या दोघांनाही आपण भारताच्या स्वाधीन करणार नसल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले. यावर भारताची प्रतिक्रिया काय असणार आहे? आता पुन्हा एकदा रडत रडत तो पाक आमचे ऐकत नाही म्हणून अमेरिकेकडे आपण तक्रार घेऊन जाऊ; यापेक्षा अधिक काही करण्याची हिंमत आणि कुवत आपल्या नेत्यांकडे नाही. पाक भारताला घाबरत नाही, याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे भारतीय नेतृत्व कचखाऊ आहे, घाबरट आहे याची त्यांना खात्री पटली आहे. हीच परिस्थिती जर उलट असती तर पाकिस्तानने भ
रतावर आक्रमण करायला सेकंदाचाही विलंब केला नसता. भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर लगेच अण्वस्त्रयुद्ध भडकेल, तिसरे महायुद्ध पेटेल, संपूर्ण जग बेचिराख होईल, ही सगळी तर्कमीमांसा आपला भ्याडपणा लपविण्यासाठी आहे. हा विचार तर पाकिस्तानने करायला हवा. अण्वस्त्रयुद्ध भडकलेच तर किमान अर्धा भारत तरी शिल्लक राहील; परंतु पाकिस्तानात तर गवताचे पातेही शिल्लक उरणार नाही. भीती त्यांना वाटायला हवी, परंतु घाबरतो आपण! आणि युद्धाचा हाच नियम आहे की ज्यांनी एकवेळ कच खाल्ली ते कधीच जिंकू शकत नाहीत. भारताचे लष्करी सामर्थ्य पाकिस्तानपेक्षा खचितच अधिक आहे. भारत प्रत्येक बाबतीत पाकिस्तानला वरचढ

आहे. परंतु राजकीय मुत्सद्देगिरीच्या बाबतीत पाकने भारतावर नेहमीच मात

केली आहे. आताही तेच होत असल्याचे दिसत आहे. पाकिस्तान अमेरिका आणि भारताला एकाचवेळी खेळवत आहे. कदाचित अमेरिका आणि पाकिस्तान मिळून भारताला खेळवत असतील. भारताला हवे असलेले अतिरेकी पाकिस्तान भारताच्या स्वाधीन करणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. भारताने पाकवर मात केली असा संदेश ज्यातून जाईल अशी कोणतीही कृती पाकिस्तान करणार नाही आणि पाकवर निर्णायक मात करण्यासाठी कोणतेही पाऊल अमेरिका भारताला उचलू देणार नाही. आपण आंतरराष्ट्रीय पटावरचे एक खेळणे झालो आहोत. आपली ही अवस्था आपणच आपल्या हाताने करून घेतली आहे. एका पराभूत मानसिकतेत आपण सतत जगत आलो आहोत आणि परकीय आक्रमकांनी त्याचा नेहमीच फायदा घेतला आहे. किमान आतातरी पराक्रमाचा, स्वाभिमानाचा हुंकार या देशातून उमटावा, किमान आतातरी डबक्यातल्या गचाळ राजकारणातून आपण बाहेर पडावे! नियतीने आपल्याला दिलेली ही शेवटची संधी आहे. यावेळी आपण नेहमीसारखी कच खाल्ली तर कदाचित भविष्यात आपण कधीच ताठ मानेने उभे राहू शकणार नाही. आपण अमेरिकेचे कायमस्वरूपी मांडलिक होऊन ज
ऊ!

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..