प्रकाशन दिनांक :- 30/01/2005
महाराष्ट्रासह संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वतयारीत मग्न असतानाच सातारा जिल्ह्यातील वाईजवळ असलेल्या मांढरदेव काळुबाई यात्रेत मात्र मृत्यूने आपले तांडव दाखवायला सुरुवात केली होती. अखेर अडीचशेपेक्षा अधिक बळी घेऊनच हे तांडव शांत झाले. चेंगराचेंगरीत इतक्या मोठ्या प्रमाणात जीवहानी झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचे सावट पसरले. प्रजासत्ताकदिनाच्या उत्साहावर पाणी फेरले. संपूर्ण राज्यात अगदी साधेपणाने प्रजासत्ताकदिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमदेखील रद्द करण्यात आले. एकूणच ही संपूर्ण घटना अतिशय धक्कादायक होती. यात्रा, मेळे किंवा महाकुंभमेळ्याच्या ठिकाणी गर्दी होणे, ही गर्दी बेशिस्त होणे आणि त्यातून चेंगराचेंगरीच्या घटना घडणे भारतासाठी आता नवलाईचे राहिलेले नाही. यात्रेच्या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन भाविकांचे बळी जाण्याच्या घटना नेहमीच होत असतात. नाशिकच्या कुंभमेळ्यात अशीच चेंगराचेंगरी होऊन 83 भाविक मृत्युमुखी पडले होते. 1954 मध्ये अलाहाबादच्या कुंभमेळ्यात जवळपास 1000 भाविकांना चेंगराचेंगरीत मृत्यू आला होता. या दुर्दवी घटनांचा मागोवा घेतल्यास एक बाब ठळकपणे स्पष्ट होते की, अंधश्रद्धेकडे झुकणाऱ्या श्रद्धेचा मोठा पगडा अद्यापही भारतीय जनमानसावर आहे आणि त्यासोबतच शिस्त हा प्रकारदेखील आमच्या पचनी पडलेला नाही. कुठलीही पर्वणी असली की एखाद्या संगमावर किंवा धार्मिक स्थळावर लाखो भाविकांचा जनसागर उसळतो. शिस्त नसलेला हा जमाव केव्हा उधळेल आणि जीवघेणा अपघात होईल हे सांगता येत नाही. अमुक एखाद्या दिवशी, अमुक एखाद्या नदीत स्नान केले किंवा एखाद्या देवाचे – देवीचे दर्शन घेतले की, पुण्य लाभते ही मानसिकता 21 व्या शतकातही मोठ्या प्रमाणात रुजलेली असावी, ही खरे तर एक शोकांतिकाच म
्हणावी लागेल. अंधश्रद्धेच्या या पगड्यातून समाजातला एक मोठा वर्ग अद्यापही बाहेर पडू शकलेला नाही, हा शिक्षणाचा पराभव म्हणावा की प्रबोधनाचा?
यात्रेत किंवा मेळ्यात गर्दी करणाऱ्या भाविकांमध्ये ठाामीण भागातील
जनतेचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. पाप-पुण्य, दैववादाचे
भ्रामक जाळे तोडणारे शिक्षण या ठाामीण जनतेपर्यंत अद्यापही पोहचू शकलेले नाही, असेच म्हणावे लागेल. तुकडोजी महाराज, गाडगेबाबा यांच्या कार्याचा काय परिणाम झाला किंवा प्रबोधनाचे काय झाले हा पुन्हा फक्त शोधप्रबंधाचा विषय ठरावा अशीच परिस्थिती आहे. काळुबाईच्या मंदिरात गर्दी करणारे लोक तिथे गेले होते तरी कशासाठी? भक्तांना पावण्यापेक्षा भक्तांच्या वैऱ्यांचा समाचार घेणारी देवी म्हणून काळुबाई अधिक प्रसिद्ध आहे. भक्तलोक तिथे जातात, तिथल्या कोणत्या तरी झाडावर आपल्या वैऱ्याच्या नावाची चिठ्ठी किवा वैऱ्याचे प्रतीक म्हणून एक बाहुली टांगतात. अशाप्रकारे आपला वैरी देवीला दाखवून दिल्यानंतर देवी त्या वैऱ्याचा समाचार घेते, ही म्हणे भाविकांची श्रद्धा! देवीला भेटण्याचे दिवसही निश्चित असतात. पौष महिन्यात आणि त्यातही पहिल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला जाणे अधिक उत्तम. यावेळी तर पहिल्या मंगळवारी पौर्णिमा होती, म्हणजे अगदी दुग्धशर्करा योग. हा योग साधण्यासाठी जवळपास पाच लाख भाविक देवीच्या डोंगरावरील मंदिर परिसरात एकत्र आले. नारळ फोडणे, कोंबड्या- बकऱ्यांचे बळी देणे हे नित्याचे प्रकार होतेच. नारळाच्या पाण्यामुळे, बळी दिलेल्या प्राण्यांच्या रक्तामुळे आणि तेलामुळे डोंगरावरची आधीच अरुंद असलेली वाट निसरडी झाली. दर्शन घेऊन परतणाऱ्या आणि दर्शनासाठी जाणाऱ्या गर्दीचा रेटा वाढला, कुणीतरी घसरून पडले आणि पुढे चेंगराचेंगरीत वाढ होऊन तब्बल अडीचशे लोकांचा बळी गेला. हा एकूण प्रकारच शिस्तह
न, बुद्धीहीन आणि दिशाहीन म्हणावा लागेल. भाविकांच्या श्रद्धेला तर्काचे, चिकित्सेचे परिमाण लावता येत नाही. अमुक एका गोष्टीवर माझी श्रद्धा आहे असे म्हटले की, बुद्धीची कवाडे आपोआप बंद होतात. अशा झापडबंद लोकांना कुणीही समजावून सांगू शकत नाही. शिक्षणाचा अभाव आणि आर्थिक दारिद्र्यामुळे भारतात अशा बिनडोक श्रद्धेचे पीक वारेमाप येते. जीवनातील संकटाचा सामना करण्याची उमेद गमाविलेली व्यक्तीच अत्याधिक किंवा अतिरेकी श्रद्धावान बनते. कुठला तरी देव किंवा देवी आपल्या मदतीला धावून आल्याशिवाय आपल्यावरील संकट दूर होणार नाही, या विचाराने तो कमालीचा भावूक होतो आणि पुढे भाविक बनतो. या भाविकतेला तर्काचे अधिष्ठान नसते. त्यामुळेच बहुतांश लोकांच्या संदर्भात देवाचे दर्शन, नदीतले स्नान केवळ एक सोपस्कार ठरतो. यंत्रवत या क्रिया पार पाडल्या जातात. ही सगळी खरं तर पराभूत मानसिकतेची लक्षणे आहेत. ईश्वर आहे हे सत्य जर आम्ही स्वीकारले असेल तर तो चराचरात व्यापून उरला आहे, हे सत्यही आम्ही स्वीकारले पाहिजे. एका विशिष्ट दिवशी, एका विशिष्ट ठिकाणी गेल्यावरच ईश्वरापर्यंत आपली कैफियत जाऊ शकेल ही तर अंधश्रद्धेतील अंधश्रद्धा म्हणावी लागेल. अशा खोल खोल रुजलेल्या अंधश्रद्धेनेच भारतीय समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. मुळातल्या श्रद्धेला अंधश्रद्धेचे अनंत फाटे फुटून आज जे काही स्वरूप प्राप्त झाले आहे ते केवळ भयंकरच नव्हे तर विकृत म्हणावे लागेल. यात्रा आणि मेळ्यांची कल्पना रुजण्यामागे कथित श्रद्धेसोबतच चार घटका विरंगुळा म्हणून व्यतीत करण्याचा विचारही तेवढाच प्रबळ आहे. दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम मिळावा, काहीतरी वेगळे बघावे, करावे या हेतूनेही लोक यात्रेला गर्दी करतात. यात्रेचे निमित्त असते, या निमित्तातून सहल साधली जाते. भाविकांसोबतच अशा भाविक कम पर्यटकांची स
ख्यादेखील यात्रेच्या ठिकाणावर गर्दी वाढविण्यात कारणीभूत ठरत असते. अशा हौशा-गवशा-नवशांची बेशिस्त गर्दी एकत्रित झाल्यावर अपघाताची शक्यता वाढणारच. मुळात आपली समस्या ही आहे की, आपल्या कोणत्याच संकल्पना स्पष्ट नाहीत. आमच्या श्रद्धा स्पष्ट नाहीत, आमचे विचार स्पष्ट नाहीत. आम्ही थोडेबहुत आस्तिक असलेले नास्तिक किंवा थोडेबहुत नास्तिक असलेले आस्तिक असतो. मनोरंजनाच्या आमच्या कल्पनाही निश्चित नसतात. तुलनेत पाश्चात्त्य देशांमध्ये विचारातली सुस्पष्टता अधिक आढळून येते. तिकडे सुट्ट्या कशा आणि कोठे घालवायच्या याचे व्यवस्थित नियोजन केले जाते. विरंगुळा म्हणजे केवळ विरंगुळा असतो.
जाता-येता एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ, हेही पाहू, जमल्यास तेही पाहू, मौज
करू आणि शक्य झाल्यास थोडे पुण्य पदरी पाडून घेऊ, असा गोंधळ त्यांच्याकडे नसतो. त्यामुळेच त्यांच्याकडची पर्यटन स्थळेदेखील विशिष्ट हेतूने निर्माण केलेली आढळतात. जुगार खेळण्याचा शौक असलेल्यांसाठी ‘लासव्हेगास’ तर लहान मुलांच्या निखळ मनोरंजनासाठी डिस्ने-लँड, ही विविधता तिकडेच आढळते. एकाच यात्रेत सगळंच उरकून घेण्याचा प्रकार नाही.
तात्पर्य एवढेच की, शिक्षणाचा अभाव, विचारात सुस्पष्टता नसणे आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे दैववादाचा अत्याधिक पगडा याचा परिपाक आपल्याला यात्रा आणि मेळ्यांच्या बेशिस्त गर्दीत पाहायला मिळतो. मांढरदेवला ज्या भाविकांचा बळी गेला तो बळी त्यांच्यातील अंधश्रद्धेला बेशिस्तीने दिलेल्या फोडणीचा म्हणता येईल. चार-पाच लाख लोक एकत्र येतात, प्रत्येकाला दर्शनाची आणि त्याचवेळी तिथून निघण्याची एकच घाई होते. आपल्यासारखीच इतरांनाही दर्शनाची ओढ आहे, आपल्याइतकेच तेही श्रद्धावान आहेत, हे समजून घेण्याची कोणाचीच तयारी नसते. ही बेशिस्त केवळ शारीरिक नव्हे तर मानसिकही आहे. या बेशिस्त
ीनेच वेळोवेळी भाविकांचे हकनाक बळी गेले आहेत. परंतु याचा विचार करायला कोणी तयार नाही. मांढरदेवीला जे झाले त्याची पुनरावृत्ती होणारच नाही याची कुणीही शाश्वती देऊ शकत नाही, कारण एक अंतर्बाह्य बेशिस्त संपूर्ण भारतीय समाजाला व्यापून उरली आहे.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply