दोन चार दिवसापूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचावयास मिळाली. बातमी क्रिकेटशी संबंधित होती म्हणून सुरूवातीला केवळ वरवर नजर टाकली, परंतु बातमीचा मथितार्थ वेगळाच असल्याचे लक्षात आले आणि पुन्हा काळजीपूर्वक नीट वाचली. न्यूझीलंड दौर्यावर गेलेल्या भारतीय संघातील हरभजन आणि सेहवाग या दोन खेळाडूंना घाणेरडे बुट सोबत आणल्याबद्दल प्रत्येकी 200 डॉलर्स दंड करण्यात आला, अशी ती बातमी होती. घाणेरड्या बुटाबद्दल दंड हा खरच आपल्यासाठी बातमीचा विषय होता, कारण घाण आणि घाणेरड्या वस्तुंसंदर्भातील आपल्या व्याख्या इतक्या सैल आहेत की प्रत्यक्ष घाण सुध्दा (मग ती भौतिकच असेल असे नाही, वैचारिक, राजकीय कोणतीही असू शकते) आपल्याला घाणेरडी वाटत नाही आणि पादत्राणे तर घाणेरडीच असतातच, ही आपली पक्की धारणा. त्यामुळे हरभजन, सेहवागचं काही चुकलं असे म्हणता येणार नाही. त्यांची चूक झाली ती एवढीच की न्यूझीलंड हा वेगळा देश आहे, तो देश अद्यापही आपले सत्त्व टिकवून आहे, ते टिकून राहण्यासाठी तो देश सर्वप्रकारची खबरदारी बाळगतो, हिंदूस्थानसारखी त्या देशाची ‘धर्मशाळा’ अद्याप झालेली नाही, हे त्यांना ठाऊक नव्हते. आपल्या देशात आपण ‘अतिथी देवो भव:’ चा अतिरेकी सन्मान करीत दानवांचे सुध्दा स्वागत केले, त्यांची पूजा केली. न्यूझीलंडमध्ये सुध्दा पाहुण्यांचा सन्मान होत असेल, त्यांना देव समजले जात असेल, परंतु त्याचवेळी या देवांना दिले जाणारे मोठेपण देशाच्या सुरक्षेला, आर्थिक स्वातंत्र्याला बाधा आणणारे ठरणार नाही, याची पुरेपुर काळजी घेतली जाते आणि वेळप्रसंगी अशा देवांना दंड करण्यासही ते मागे पुढे पाहत नाही. हा दंड शारीरिक, आर्थिक किंवा प्रवेशबंदीसारखा असू शकतो, परंतु सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की, त्या देशात राष्ट्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. हे हित जोपासतांना जग क
ाय म्हणेल, पाहूण्यांना काय वाटेल, याचा विचार
केला जात नाही. त्या पृष्ठभूमीवर आपल्याकडील परिस्थितीचा
विचार केल्यास दिसणारे चित्र किती भयानक आहे? राष्ट्रीय हिताची रक्षा करायची म्हणजे नेमके काय करायचे हेच मुळी सर्वसामान्य नागरिकांना तर सोडाच, सरकारला देखील कळत नाही. चिखलाने लडबडलेल्या बुटांच्या माध्यमातून नको त्या प्रजातींचे बीज अथवा परागकण आपल्या देशात येऊ नयेत म्हणून पाहुण्यांच्या बुटांवरही करडी नजर ठेवणारा न्यूझीलंड कुठे आणि व्यापार, तंत्रज्ञान, जागतिकीकरण यासारख्या आकर्षक परंतु फसव्या पोशाखात आपल्या देशात प्रवेश करणार्या दानवांना देव समजून पुजणारा भारत कुठे? ही तुलनाच होऊ शकत नाही.
जैव तंत्रज्ञान शेतकी आणि बागायती उत्पादनाचे प्रमाण आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी उपयुक्तच नव्हे तर अत्यावश्यक आहे, असे समर्थन अगदी सरकार पातळीवर सुध्दा केले जाते. परंतु वस्तुस्थिती काय सांगते? जैव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या देशातील जैविक विविधातच संपुष्टात आणली जात आहे. पूर्वी आपल्याकडे प्रत्येक झाडाच्या फळाची चव वेगळी असायची. साधे गावरान आब्यांचेच उदाहरण घ्या. प्रत्येक झाडाच्या फळाची चव वेगळीच असते. याउलट निलम, तोतापुरी यासारख्या आंब्याच्या संकरित जातींच्या कोणत्याही झाडाच्या फळाची चव सारखीच असते. वेगळेपणा अजिबात नसतो. आज जनुकीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमच्या देशातील जैव विविधताच संपुष्टात आणल्या जात आहे. यासंदर्भात पपईचेच उदाहरण पुरेसे बोलके आहे. आज आपल्याकडे केवळ तैवान पपईचे उत्पादन होते. पपईच्या देशी प्रजाती लुप्त झाल्या आहेत. त्यामुळे पपईच्या उत्पादनासाठी आपल्याला तैवान पपई बीजावरच अवलंबून राहावे लागते. इतर पर्याय नसल्यामुळे 2 लाख रूपये प्रती किलो किमतीचे हे बीज घेणे आपल्याला भाग आहे. तैवान पपईमुळे पपईच्या संदर्
ातील जैविक विविधता तर नष्ट झालीच, परंतु सोबतच आर्थिक हानी आणि परावलंबित्व आपल्या वाट्याला आले. हा धोका केवळ पपईपुरता मर्यादित नाही. या देशात उत्पादित होणारे प्रत्येक धान्य आणि प्रत्येक फळ या जैविक तंत्रज्ञानाच्या विळख्यात सापडत आहे. कलम करणे हा प्रकार आपल्याकडे पूर्वीपासून होता. मात्र एका प्रजातीचे दुसऱ्या प्रजातीसोबत कलम केल्यामुळे तिसरी भलतीच गुणवैशिष्ट्ये असलेली जात निर्माण होत नाही. परंतु उत्पादनात वाढ आणि कीड व रोग प्रतिकारक शक्ती यासाठी विकसित करण्यात आलेल्या विविध पिकांच्या नर नपुंसक संकरित वाणांनी हळूहळू देशातील पारंपरिक बियाणी संपविली. आणि आता ेया देशातील शेतकरीही संपण्याच्या मार्गावर आहे. ज्वारीच्या रूपाने संकरित बियाण्यांनी भारतात प्रवेश केला. प्रारंभीची काही वर्षे या संकरित बियाण्यांमुळे होणार्या फायद्यांचे गोडवे गाण्यात गेली. मात्र नंतर हळूहळू सर्वांच्या लक्षात येऊ लागले की, या संकरित वाणांनी देशाची परंपरागत संपदा असलेली पारंपरिक बियाणी संपविण्याचे काम केले आहे. सद्य परिस्थितीत ज्वारी, भेंडी, मिरची, पपई आदींची पारंपरिक बियाणी जवळपास संपल्यातच जमा आहे. भारतातील शेती आणि शेतकऱ्यांवर एकछत्री अंमल प्रस्थापित करण्यासाठी देशी कंपन्यांना हाताशी धरून बहूराष्ट्रीय बियाणे कंपन्यांनी ज्वारीनंतर टमाटे, वांगी, बटाटे, ऊस, कापूस आदी पिकांवर आपले लक्ष केंद्रित केले आणि आता गहू आणि तांदूळ या दोन पिकांचा क्रम आहे. जैव तंत्रज्ञानाद्वारे विकसित करण्यात आलेल्या ‘गोल्डन राईस’ नामक तांदुळाच्या संकरित वाणाच्या भारतातील प्रवेशाची सिध्दता झाली आहे. एकदा का गहू आणि तांदुळाच्या परंपरागत बियाण्यांनी शेवटचा आचका दिला की, भारताला बियाण्यांकरिता इतर राष्ट्रांकडे सतत हात पसरून भीक मागण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि तेव
्हा गहू, तांदुळाच्या संकरित बियाण्यांचा भाव सुध्दा मिरची, पपईप्रमाणे लाखोच्या घरात पोहचलेला असेल. औद्योगिक उत्पादनाच्या व्यापारातील मर्यादा लक्षात आल्यानंतर लूटीचे नवीन आणि कायमस्वरूपी क्षेत्र म्हणून बहूराष्ट्रीय कंपन्यांनी बियाण्यांकडे आपले लक्ष वळविले आणि अल्पावधीतच त्यांना प्रचंड यश प्राप्त झाले. बियाण्यांच्या माध्यमातून शेती, शेतकरी आणि पर्यायाने या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे हे षडयंत्र भोळसर सामान्य शेतकर्यांपासून जागतिकीकरणाच्या प्रेमात पडलेल्या सरकारी धुरीणांच्या लक्षात आणून देण्यासाठी आम्ही विविध
स्तरावर प्रयत्न चालविले आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अकोल्यात द्विदिवसीय जनुकिय
परिषद घेण्यात आली होती. पारजनुक बियाण्यांची उपयुक्तता आणि त्यापासून उद्भवणारे संभाव्य धोके यावर परिषदेत सांगोपांग चर्चा झाली, परंतु खेद याचा वाटतो की, शासन आणि समाजातील जबाबदार घटकांनी परिषदेला पाहिजे त्याप्रमाणात प्रतिसाद दिला नाही. शासनाच्या जनुकीय अभियांत्रिकी स्वीकृती समितीचे सचिव डॉ.गोखले यांनी परिषदेला उपस्थित राहणे हेतूपुरस्सरपणे टाळले. परंतु क्षीण का होईना आवाज तर उठला आहे, हे समाधान या परिषदेने निश्चितच दिले.
सांगायचे तात्पर्य हेच आहे की, न्यूझीलंडसमोर जैविक आक्रमणाचा अतिशय मर्यादित धोका असतानाही तेथील सरकार इतकी काळजी घेत असेल तर आपण किती सावध असायला पाहिजे. ही सावधानता सरकारने बाळगणे जितके गरजेचे आहे तितकीच मोठी जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांची देखील आहे. शेवटी व्यापार मोटारगाडीचा असो अथवा बियाण्यांचा, व्यापाराला प्रभावित करणारा सर्वाधिक महत्त्वाचा घटक असतो तो ग्राहक. त्यामुळे या ग्राहकांनी आणि बियाण्यांच्या संदर्भात शेतकर्यांनी जागरूक राहाणे, देशाच्या हिताची काळजी घेणे अधिक गर
ेचे आहे. जाहिरातीच्या आकर्षक भुलभुलैय्यातून विकासाचे आभासात्मक चित्र उभे करणारे हे छुपे आतंकवादी या देशाला भकास करण्यासाठीच येथे आले आहेत. त्यामुळे कथित समृध्दीच्या वाटेवर कंगाल होण्याचा धोका टाळायचा असेल तर बहूराष्ट्रीय कंपन्यांचे स्वच्छ दिसणार्या बुटातील घाणेरडे पाय या देशात स्थिरावू न देण्याची जबाबदारी तुमची, आमची, आपल्या सर्वांची आहे.
आज मुंबई, दिल्लीसारख्या महानगरातील छोट्या मुलांना ‘दूध कोण देते?’ हा प्रश्न विचारला की ते ‘मदर डेअरी’ असे उत्तर देतात. कारण त्यांनी दूध देणारी गाय किंवा म्हैस कधी बघितलेलीच नसते. जनुकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने एकदा आमच्या देशातील जैव विविधता आणि शुद्ध पारंपरिक बियाणे संपुष्टात आणण्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांना यश आले की, मग पपईचे बीज कोठून येते तर तैवानमधून, कपाशीचे बीज कोठून येते तर अमेरिकेतून, अशी उत्तरे मिळायला लागतील. आम्ही वेळीच सजग झालो नाही तर ही वेळ यायला फार वेळ लागणार नाही आणि मग ‘शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ या ओळी केवळ तुकारामाच्या गाथेतच राहतील.
— प्रकाश पोहरे