प्रकाशन दिनांक :- 10/08/2003
हिंदुस्थानला जगाच्या पाठीवर एक अद्भुत देश म्हणून ओळखले जाते. ‘अद्भुत’ हे विशेषण आपल्या देशापुढे लागण्याची असंख्य कारणे देता येतील. इथली संस्कृती, इथल्या परंपरा, इथली विविधता एक ना दोन शेकडो कारणे आहेत. परंतु प्रत्येक कारण आपली मान अभिमानाने ताठ करणारेच आहे, असे नाही. आपल्याला वेगळ्या अर्थाने ‘अद्भुत’ ठरविणारी कारणेसुध्दा असंख्य आहेत. जगातील इतर देशांची आणि विशेषत: अमेरिका, इंग्लंडसारख्या विकसित देशातील परिस्थिती प्रत्यक्ष डोळ्याने पाहिल्यावर आपण खरेच अद्भुत आहोत, याचा साक्षात्कार होतो.
जगाला दैवी विचाराची देण भारतानेच दिली हे निर्विवाद सत्य आहे. ज्ञान, विज्ञान, अध्यात्माची शिखरे आम्ही गाठली त्याकाळी आजची विकसित राष्ट्रे अस्तित्वातही नव्हती किंवा असली तरी त्यांचे ज्ञान शिकारीपुरते आणि विज्ञान दगडांची हत्यारे करण्यापुरतेच मर्यादित होते. बौध्दिक, सामाजिक, आर्थिक स्तराची ही दोन टोके होती. आम्ही शिखरावर होतो आणि ते पायथ्याशीदेखील नव्हते. आज नेमकी उलट परिस्थिती आहे. शिखर – पायथा या संकल्पनाच केवळ स्थिर आहेत. शिखरावरचे पायथ्याखाली आणि पायथ्याशी असलेले शिखरावर केव्हा पोहचले ते कळलेसुध्दा नाही.
आपल्या या अवनीतीची जी अनेक कारणे आहेत, त्यापैकी उक्ती आणि कृतीतला फरक हे सर्वाधिक महत्त्वाचे असावे. ‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ हे जीणे’ असे आपल्या संतांनी सांगून ठेवले. ‘आधी केले मग सांगितले’ ही आपली वृत्ती असावी असा त्यांनी उपदेश केला. परंतु त्यांची दखल घेण्याची तसदी आम्ही घेतली नाही. तसबिरी आणि मूर्त्यांमध्ये आम्ही या संतांना त्यांच्या विचारासकट कैद करून टाकले. आता केवळ ‘वाचाळणे’ हाच आमचा धर्म उरला आहे. जगाच्या पाठीवरची कोणतीही समस्या असो, त्याचे उत्तर आमच्याकडे नेहमीच तयार असते आणि विरोधाभास हा आहे की, जगात स
ळ्यात जास्त समस्या आमच्याच देशात आहेत. उगाच आम्ही अद्भुत आहोत का? आपल्याकडे मेंदूज्वर,
डायरियासारखे रोग का फैलावतात, असे
एखाद्या शेंबड्या पोरालाही विचारले तर तो सहजपणे सांगून जाईल, अस्वच्छतेमुळे! ही अस्वच्छता दूर कशी करता येईल, या प्रश्नावरदेखील तो लांबलचक भाषण देऊ शकेल. अर्थात जे एका शेंबड्या पोराला कळते ते थोरा – मोठ्यांना कळत नसेल का? परंतु हेच तर आपल्या महान देशाचे वैशिष्ट्य आहे. इथे सगळ्यांना सगळं कळते, परंतु वळत मात्र कुणालाच नाही. आमचे विचार दैवी किंवा त्याही पलीकडचे असतात. कृती मात्र मानवालाही लाज वाटणारी असते. उक्ती आणि कृतीतल्या या फरकानेच आम्ही जगाच्या पाठीवर प्रचंड हास्यास्पद ठरलो आहोत. अगदी साध्या-साध्या सामाजिक शिस्तीपासून, नियमापासून ते थेट अध्यात्मासारख्या क्षेत्रापर्यंत हा उक्ती आणि कृतीतला प्रचंड विरोधाभास पसरला आहे. नेमका हाच विरोधाभास पश्चिमेकडील विकसित राष्ट्रात दिसत नाही. त्यांच्या सामाजिक जाणिवा स्पष्ट आहेत. आपल्यासारखी परंपरा, संस्कृती किंवा दैवी विचारांचा वारसा त्यांना लाभला नसेल, किंबहुना तो तसा नाहीच, परंतु वास्तवतेच्या इष्टतम पातळीवर नेमकी कशाची गरज असते, हे त्यांना चांगले कळले आहे. केवळ विचाराने कोणतीच समस्या सुटत नाही, उलट ती चिघळतेच हे साधे सूत्र त्यांनी अंमलात आणले. परिणामी त्यांचे सामाजिक जीवन सुखकर झाले. प्रखर वास्तववादी जीवननिष्ठा हे पाश्चात्त्य देशातील विकासाचे आणखी एक प्रमुख कारण आहे. कोणतातरी एखादा देव अवतार घेईल आणि सगळं सुरळीत होईल या भ्रामक आशावादाने आमच्यातली उरली – सुरली कर्मण्यता संपुष्टात आणली. हा अवताराचा आशावाद तिकडे नाही. जे काही करायचे ते आपल्यालाच करावे लागेल याची सगळ्यांना जाणीव असते आणि ही जाणीव अगदी बालवयापासून जोपासली जाते. फुलांसारख्या टवटवीत चेहेऱ्याची लहान-लहा
मुले तिथे पाहिली आणि नकळत आपल्याकडच्या बालपण हिरावलेल्या मुलांची आठवण झाली. आपल्याकडे काहीही न कळण्याच्या वयापासून लहान मुलांवर दडपशाही सुरू होते. मूल चालायला लागत नाही तोच त्याचे अंगण, त्याचे विश्व शाळा, कॉन्व्हेंटच्या चौकोनी मर्यादेत बंदिस्त केले जाते. तिकडे असा काही प्रकार दिसला नाही. मुलांवर लक्ष ठेवलं जातंच, वेळप्रसंगी त्याला मारायलाही त्याची ‘मम्मी’ कमी करत नाही, परंतु हे लक्ष ठेवणे ‘वॉच डॉग’ सारखे नसते. त्याचं फुलणं जपलं जातं, परंतु एक मर्यादित अंतर राखून. जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन त्याच्यात अगदी नकळत्या वयापासून सुनियोजितपणे रूजवला जातो.
पाश्चिमात्य संस्कृतीत स्वातंत्र्याचा अतिरेक आहे. तरुण – तरुणी स्वच्छंद वृत्तीचे असतात. नैतिकता हा प्रकारच तिकडे नाही. मुळात संस्कार म्हणजे काय हेच त्यांना माहीत नाही. तिकडची जीवनशैलीच अति भौतिकवादी आहे, असे आणि अशाच प्रकारचे अनेक भ्रम आपण जोपासले आहेत. वास्तविकता मात्र काही वेगळीच आहे. व्यक्तिस्वातंत्र्य तिथे आहेच, परंतु त्याचा अतिरेक नाही. तिथली कुटुंब व्यवस्थाही सृदृढ आहे. आर्थिक सुबत्तेमुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असते, त्यामुळे एकमेकांवर किंवा कोण्या एकावर अवलंबून राहण्याचा प्रकार तिथे अभावानेच आढळतो. त्यामुळे स्वतंत्रपणे विचार करण्याची किंवा स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची वृत्ती त्यांच्यात स्वाभाविकपणेच विकसित झाली आहे, त्याला स्वातंत्र्याचा अतिरेक म्हणून हिणवण्याचा आपल्याला काय अधिकार? विविध नातेसंबंधातला जिव्हाळा तिथेही दिसून आला. परंतु आपल्याकडे जसे हा जिव्हाळा किंवा प्रेम बरेचदा ओझे बनल्याच्या अनुभव येतो तसला प्रकार तिथे नाही. प्रत्येकाचे वैयक्तिक आयुष्य तिकडे स्वतंत्र आहे. त्या स्वातंत्र्यावर मर्यादेपलीकडे अतिक्रमण कोणी
करत नाही आणि कोणी सहनही करत नाही. थोडक्यात तिकडची जीवनशैली पाय जमिनीवर ठेवून चालणारी आहे, वास्तवतेशी साधर्म्य साधणारी आहे. आपल्याकडची परिस्थिती वेगळी आहे. आपले पाय जमिनीवर कधीच नसतात. विचारांच्या, तत्त्वज्ञानाच्या, आदर्शवादाच्या उंच – उंच भराऱ्या आम्ही घेत असतो. ‘उीदल्ह् ींार्ीत्ग्ूब्’ ज्याला म्हणतात ती स्वीकारायला आम्ही तयारच नसतो, परंतु या विचारांचा, आदर्शाचा प्रत्यक्ष कृतीशी मेळ साधणे आम्हाला कधीच जमत नाही. वृध्द माता-पिता किंवा इतरही
वृध्दांचा सन्मान केलाच पाहिजे. एक उभं आयुष्य झिजवून त्यांनी संपादन
केलेले ज्ञान हजार पुस्तके वाचूनही आपण मिळवू शकत नाही. त्या ज्ञानाचा योग्य तो आदर राखला गेलाच पाहिजे. गात्रं थकल्यामुळे जिवंत राहण्यासाठी किमान कष्ट करण्याचे त्राण त्यांच्यात राहिलेले नाही, तेव्हा त्यांच्या उर्वरित आयुष्याची जबाबदारी आपण उचललीच पाहिजे. किती सुंदर आणि उच्चप्रतीचे आहेत हे विचार! आपणच दिले आहेत ते जगाला आणि आज आपल्याच वृध्द माता – पित्यांची अवस्था काय आहे? काही वृध्दाश्रमात खितपत पडले आहेत, काही जिवंत राहण्याची शिक्षा भोगत लाचारीने आपल्याच घरात आपल्याच लोकांच्या दयेवर जगत आहेत. काहींची अवस्था चांगली आहे. परंतु त्यापैकी बहुतेकांना हे माहीत आहे की, आपल्या नावावर बँकेत असलेल्या जाडजुड रकमेमुळेच आपली उत्तम बडदास्त ठेवल्या जात आहे. एकूण प्रेम, जिव्हाळा, आदर हा प्रकार अभावानेच आढळतो. वृध्दांना दिल्या जाणारा आदर आपल्याकडे विचारांपुरताच मर्यादित आहे. इंग्लंड – अमेरिकेत मात्र मी वृध्दांची खरी सेवा करताना अनेकांना पाहिले. बस किंवा रेल्वेत वृध्दांना बसायला जागा देण्यासाठी चाललेली अहमहमिका पाहिली. बस ड्रायव्हरने स्वत: खाली उतरून’ व्हिल चेअरवर’च्या वृध्दाला बसमध्ये चढण्यास मदत करताना पाहिले. घरीसुध्दा वृध्दांची व्यव
स्थित काळजी घेतली जाते. त्यात कदाचित प्रेमाचा ओलावा नसेलही, परंतु काळजी तर घेतली जाते ना! आपल्याकडे प्रेमाच्या ओलाव्याने किती वृध्दांची आयुष्य चिंब झालीत?
थोडक्यात आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी दुसऱ्याच्या अपयशाकडे बोट दाखविण्याचा जो प्रकार असतो तोच आपण करीत आहोत. पाश्चात्त्य राष्ट्रांनी केलेली प्रगती, पावलो पावली जपलेलं सौंदर्य, स्वच्छता, पर्यावरणाची केलेली जपणूक आपल्याला आपल्या नाकर्तेपणाची सतत जाणीव करून देत असते. परंतु हे सत्य स्वीकारायला आम्ही तयार नाही. बोट दाखविण्यासारख्या ज्या काही थोड्या फार राई एवढ्या गोष्टी तिकडे आहेत त्याचाच आपण डोंगर करतो आणि त्या राईच्या केलेल्या डोंगराआड आपला डोंगरएवढा नाकर्तेपणा झाकण्याचा प्रयत्न करतो.
इंग्लंड – अमेरिकेतील माझ्या जवळपास महिनाभराच्या वास्तव्यात मला कुठेही घाण, दुर्गंधी, अस्वच्छता आढळली नाही. पाली, डास, ढेकूण सोडा; अगदी साधी मुंगीसुध्दा कुठे कुणाच्या घरात दिसली नाही. नसेल त्या लोकांना महान संस्कृतीचा वारसा लाभलेला, नसेल केली त्यांनी अध्यात्मिक प्रगती, नसतील त्यांच्याकडे जीवनावर सखोल भाष्य करणारे महान विचारवंत, परंतु त्यांच्याकडे आहे जीवनाकडे, जगण्याकडे वास्तवतेच्या डोळ्यांनी पाहणारी स्वच्छ, आनंदी दृष्टी आणि म्हणूनच ते आपल्यापेक्षा कितीतरी चांगल्या प्रकारे जगतात.
— प्रकाश पोहरे
Leave a Reply