एखाद्या प्रांताचा विकास केवळ त्या भागात उपलब्ध असलेल्या संसाधनांवरच अवलंबून असतो का, या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर द्यायचे झाल्यास ‘नाही’ असेच द्यावे लागेल. संसाधने विकासाला पूरक ठरतात; परंतु केवळ संसाधनांवर विसंबून विकास साधता येत नाही. खरेतर विकासासाठी परिस्थिती प्रतिकूल असणे अधिक गरजेचे असते. प्रतिकूल परिस्थितीतच मनुष्याची झगडण्याची, परिस्थितीवर मात करण्याची जिद्द प्रकट होत असते. ज्यांना आपण विकसित देश किंवा प्रदेश म्हणून आज ओळखतो त्यांच्या इतिहासावर नजर टाकल्यास त्या सगळ््याच देशांनी, प्रदेशांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढल्याचे दिसून येईल. याउलट ज्या भागात नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल प्रमाणात आहे, जमीन सुपीक आहे, पाणी भरपूर आहे, एकंदरीत विकासासाठी सगळीच परिस्थिती अतिशय अनुकूल आहे त्या प्रदेशात तुलनेत तेवढा विकास झालेला दिसत नाही. याचे एकमेव कारण म्हणजे विकासाला गती देणारी मानवी शक्तीच अशा प्रदेशात निष्क्रिय किंवा आळशी झालेली दिसते. आपल्या महाराष्ट्राचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास आज विदर्भाच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्राचा भाग समृद्ध दिसून येतो. विपरीत भौगोलिक परिस्थिती हेच पश्चिम महाराष्ट्राच्या समृद्धीचे मुख्य कारण आहे. भौगोलिक परिस्थिती अनुकूल नसल्याने त्या भागातील लोकांना कष्ट करण्यावाचून पर्याय नव्हता. या कष्टाला परिस्थितीवर मात करण्याच्या जिद्दीची जोड मिळाली आणि अक्षरश: मुरमाड जमिनीतून हिरवे सोने बाहेर आले. विदर्भातील जमीन सुपीक, नैसर्गिक अनुकूलता अगदी रस्त्याने जाताजाता मूठभर बियाणे भिरकावे आणि त्यातून तरारून रोपं बाहेर यावीत इतके इथल्या काळ््या मातीत सत्त्व! परंतु त्यामुळेच विदर्भातील लोकं आळशी झाले, निसर्गाशी झगडावे लागलेच नाही. त्यामुळे झगडण्याची प्रेरणाच पिढ्यान्पिढ्या हरवत ग
ेली. मनोवृत्तीत फरक पडत गेला. त्याचा विपरीत परिणाम आज दिसून येत आहे. निसर्ग प्रतिकूल होताच वैदर्भीय शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. राज्यकर्त्यांचा पक्षपात उघड्या डोळ््याने दिसूनही प्रतिकार होताना दिसत नाही. इथले शेतकरी आत्महत्या
करतील; पण आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या लोकांना जाब
विचारणार नाहीत. ही नेभळट वृत्ती एका पिढीची देणं नाही. प्रतिकूलतेमुळे विकसित होणारी लढण्याची जिद्दच वैदर्भीय लोकांत निर्माण झाली नाही. इकडच्या शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; परंतु सरकार अद्यापही ‘पाहू, करू’ अशीच भाषा वापरत आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या दोनचार शेतकऱ्यांनीही आत्महत्या केली असती तर मंत्रालयाला आग लागली असती. संसदेची मजबूत इमारत पायापासून हलली असती. हा फरक मनोवृत्तीतला आहे आणि तो विकासाच्या माध्यमातून दिसून येतो. देशाचा विचार करायचा झाल्यास याच निकषावर पंजाबची समृद्धी डोळ््यांत भरते. महाराष्ट्राच्या तुलनेत पंजाब समृद्ध आहे त्यामागे ‘प्रतिकूलतेतून विकास’ हेच तत्त्व कारणीभूत आहे. सीमावर्ती राज्य असल्यामुळे पंजाबला सतत विदेशी आक्रमकांशी झगडावे लागले. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग,’ ही ओळ पंजाबी जनतेला शब्दश: लागू पडते. त्याचा स्वाभाविक परिणाम पंजाबी लोकांची मनोवृत्ती कणखर होण्यात झाला. या कणखर मनोवृत्तीमुळेच पंजाबी लोकांनी प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त केले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि राजस्थानपासून पश्चिम बंगालपर्यंत असे एकही राज्य नसेल की ज्या ठिकाणी पंजाबी लोकांनी आपले व्यवसाय, उद्योगधंदे थाटले नसतील. विदेशातील भारतीयांमध्येही पंजाबी, केरळी आणि तामिळी लोकांचाच अधिक भरणा आहे. त्या तुलनेत महाराष्ट्राची परिस्थिती केविलवाणीच म्हणावी लागेल. फरक पुन्हा तोच मनोवृत्तीतला! मराठी माणूस म्हटला की, ‘ठेविले अनंते…’, ‘अ
सेल माझा हरी…,’ या ओळी हमखास आठवतात. मराठी माणसाची मनोवृत्तीच या ओळीतून स्पष्ट होते. अतिशय दैववादी, अल्पसंतुष्ट, मवाळ लोकांचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. मराठी माणसाच्या या मनोवृत्तीचा फायदा इतर सगळ््याच प्रांतातील लोकांनी घेतला. महाराष्ट्र जणू काही आज निर्वासितांची छावणी झाला आहे. एखाद्याला भारत भ्रमण करायचे असेल तर त्याने केवळ महाराष्ट्राचा दौरा केला तरी पुरेसे ठरेल. महाराष्ट्राला विदेशी आक्रमकांचा थेट सामना कधी करावा लागला नाही. त्यामुळे लढण्याची प्रवृत्ती मराठी माणसांमध्ये उरली नाही. ज्या-ज्या वेळी महाराष्ट्राला विदेशी आक्रमकांचा थेट सामना करावा लागला त्या-त्या वेळी महाराष्ट्र अतुलनीय पराक्रम गाजविणारे नरवीर निर्माण झाले याला इतिहास साक्षी आहे. लढवय्या राजपुतांना, पराक्रमी शिखांना जे जमले नाही ते याच मराठी मातीत उगवलेल्या मावळ््यांनी करून दाखविले. भारतभर पसरलेल्या मुगल सत्तेला आव्हान देऊन आपले स्वतंत्र हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची हिंमत मराठा शिवाजी राजांनीच दाखविली. दिल्लीचे तख्त फोडणारे मराठेच होते. अटकेपार झेंडे मराठ्यांनीच रोवले; परंतु पुढे परिस्थिती बदलत गेली. हातातल्या तलवारी गळून पडल्या. शत्रूचे भय नाहीसे झाल्याने लढण्याची ऊर्मी हरवत गेली आणि आज परिस्थिती अशी आहे की, महाराष्ट्रातील जवळपास सगळेच किरकोळ व्यवसाय बिगरमराठी लोकांच्या हाती गेले आहेत. मोठ्या उद्योगातही मराठी नावे अभावानेच आढळतात. ही परिस्थिती बदलायला पाहिजे. शिवरायांचे मावळे व मराठी जिद्द पुन्हा जन्माला यायला पाहिजे. शिवरायांना घडविणाऱ्या जिजाबाई घराघरांतून दिसायला पाहिजेत. आता मराठी स्त्री हळूहळू घराबाहेर पडू लागली आहे. ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’ या मर्यादित जगातून मराठी स्त्री बाहेर पाऊल टाकत आहे; परंतु अनेक मर्यादा अजूनही आहेतच. मराठ
ी स्त्रीची झेप आजही 10 ते 5 च्या नोकरीबाहेर गेलेली नाही. त्यातून तिला बाहेर निघावे लागेल. अगदी पेहरावापासून बदलायला सुरुवात करावी लागेल. पंजाबी स्त्तियांचा पेहराव त्या दृष्टीने आदर्श आहे. जुन्या काष्ट्याच्या नऊवारी लुगड्यातून तिला पाचवारीमध्ये आणि सोबत पर्सचे लोढणे देऊन व्यक्तिसंकोच करण्यात आलाय. त्यावर पंजाबी ड्रेस हा सर्वोत्तम उपाय आहे. आमच्या खानपानाच्या सवयीसुद्धा बऱ्याच अंशी आमच्या विकासात बाधा आणतात. पोळ््या हा स्त्री दास्याचा उत्तम नमुना ठरावा. अनेक बायकांची आयुष्य अगदी त्यातच गेली. त्या तुलनेत भाकर किंवा तंदुरी रोटी किंवा पंजाबातील लंगर व्यवस्था किंवा कम्युनिटी किचन या पर्यायांचा विचार ही काळाची गरज ठरावी. पुरुषांची मनोवृत्तीही नोकरीप्रधानच आहे. साहेबांचा ‘होयबा’ बाबू
बनण्यापलीकडे मराठी माणसाचे स्वप्न विस्तारत नाही. त्याला साहेब व्हावेसे, मालक व्हावेसे वाटत नाही
किंवा साहेब, मालक होण्यासाठी करावा लागणाऱ्या कष्टाला तो राजी नसतो. ही अतिशय संरक्षक किंवा संकुचित मनोवृत्ती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तरी मराठी पाऊल दमदारपणे पुढे पडणार नाही. कदाचित परिस्थिती पूर्णत: प्रतिकूल होण्याची वाट मराठी माणूस बघत असावा. कदाचित त्याच्या सोशिकतेचा अजूनही कडेलोट झालेला नसावा. महाराष्ट्रात मराठी माणूस अल्पसंख्य म्हणून ओळखला जाईल तेव्हा कदाचित मराठी माणसातला ‘मराठा’ जागा होईल. त्याचीच प्रतीक्षा सुरू असेल तर तो दिवसही लवकरच येईल हे निश्चित!
— प्रकाश पोहरे
Leave a Reply